Goa Politics: खरी कुजबुज; पेडण्यातली भुताटकी

Khari Kujbuj Political Satire: रिव्‍होल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजी) पक्ष राज्‍यभरात पोहोचवण्‍यात पक्षाचे संस्‍थापक अध्‍यक्ष मनोज परब यांनी सुरुवातीपासूनच सोशल मीडियाचा पद्धतशीरपणे वापर केला.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

पेडण्यातली भुताटकी

पेडणे बसस्थानकाचे तळघर सध्या चर्चेत आले आहे. पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी हे तळघर आहे. मात्र तेथे भुताटकी होत असल्याची चर्चा सार्वत्रिक आहे. पेडण्याचे सुपूत्र आमदार उल्हास तुयेकर हे कदंबचे अध्यक्ष आहेत. म्हणून याची जरा जास्तच चर्चा आहे. पेडणे बसस्थानक बघितल्यावर कुणालाही शंका येते. ‘पेडण्याची माती खरेच त्यांच्या काळजाला भिडलीय का?’ बसस्थानकाखालील पार्किंग लॉट आता केवळ गाड्यांसाठी नव्हे, तर भुते आणि कुत्र्यांचाच अड्डा बनलंय, असं स्थानिकांचं म्हणणं. दिवसा सुनसान, रात्री भुताटकीचा थरार! कोणी हसत म्हणतं –‘तिकडे गाडी लावली की, परत सापडेल याची खात्री नाही!’ उल्हासबाबांची निवड झाल्यापासून सर्वांनाच आशा होती की ‘पेडण्याला न्याय मिळेल, अन् स्टँडचं रूपडं पालटेल. ‘पण आजही प्रवासी छताच्या शोधात अन् बस धावणार की नाही या चिंतेतच. ∙∙∙

वीरेशची भिस्‍त सोशल मीडियावर

रिव्‍होल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजी) पक्ष राज्‍यभरात पोहोचवण्‍यात पक्षाचे संस्‍थापक अध्‍यक्ष मनोज परब यांनी सुरुवातीपासूनच सोशल मीडियाचा पद्धतशीरपणे वापर केला. त्‍याचा फायदा होत असल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर त्‍यांच्‍या पक्षाच्‍या सर्वच पदाधिकार्‍यांनी ‘सोशल’ मार्गाने अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचेही दिसले. यात आता त्‍यांच्‍या पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकरही मागे राहिलेले नाहीत. विधानसभा अधिवेशन जसजसे जवळ येईल, तसतसे बोरकर यांनी आपण कोणते प्रश्‍न छेडणार, सरकारला कसे कात्रीत पकडणार, याची माहिती नेमक्‍या शब्‍दांत सोशल मीडियातील स्‍टेटसद्वारे देण्‍यास सुरुवात केली. आता त्‍यात किती यशस्‍वी ठरणार, हे येत्‍या सोमवारपासून कळेलच. ∙∙∙

‘त्या’ फाईलचे झाले काय?

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी झालेल्या बैठकीत हास्यविनोद करताना दिसून आल्याने पेडण्यात तो चर्चेचा विषय झाला आहे. पेडण्यातील भू वापर नियोजनावरून दोघांत यापूर्वी सार्वजनिकरीत्या वाद झाले होते. आरोलकर यांच्या दोन फाईल अडवल्या गेल्याने त्यांनी आंदोलन केले, असा आरोप यापूर्वी झाला होता. त्या फाईल आता मंजूर झाल्या असाव्यात, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. आरोलकर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. शुक्रवारी भाजप गाभा समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री जात असताना आरोलकर त्यांच्यासोबत होते. यामुळे राणे यांच्याशी त्यांच्या जवळीकीशी भाजपमधूनही नजर ठेवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ∙∙∙

काब्रालची ‘नवी छत्री’

चतुर्थी असो वा दिवाळी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्‍याकडून कुडचडेच्‍या मतदारांना ज्‍या सामानांच्‍या पिशव्‍या पोचत्‍या केल्‍या जात हाेत्‍या, त्‍यावर आतापर्यंत नीलेश काब्राल यांच्‍या नावाबरोबर भाजपच्‍या कमळाचे घसघशीत चिन्‍ह दिसायचे. मात्र यंदा पावसाळ्‍यात नीलेश काब्राल यांनी मतदारसंघातील लोकांना छत्र्यांचे वाटप केले. त्‍यावरून भाजपचे कमळ गायब तर झाले आहेच, शिवाय या छत्रीवर एक तिरंगा पट्टा रंगविण्‍यात आला आहे, जो काँग्रेसच्‍या झेंड्याशी मिळताजुळता असा वाटतो. त्‍याशिवाय ज्‍या सर्कलमध्‍ये काब्रालने आपला फोटो छापला आहे, तो पाहिल्‍यास गोवा फॉरवर्डच्‍या चिन्‍हाशी त्‍याची सांगड घालता येणे शक्‍य आहे आणि छत्रीचा भगवा रंग ‘मगो’ पार्टीच्‍या झेंड्याशी जुळणारा आहे. ही छत्री काब्राल यांनी मुद्दाम या तऱ्हेने करून घेतली जेणेकरुन कुडचडेतील बदलणारे वारे सर्वांच्‍याच सहज लक्षात यावे, की कुडचडेत भाजपपेक्षाही नीलेश काब्राल हा मोठा ‘ब्रँड’ हे त्‍यांना दाखवून द्यायचे असेल. ∙∙∙

नेमका ‘चिमटा’ कुणाला?

अधिवेशनाबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घेतलेल्‍या बैठकीला आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई न गेल्‍यामुळे अधिवेशनात ते ‘एकला चलो’ची भूमिका घेणार, असे जनतेला वाटत होते. पण, शनिवारच्‍या पत्रकार परिषदेत बोलताना त्‍यांनी लोकांचा हा संशय दूर केला. या विषयावर बोलताना ‘शत्रू केवळ चित्रपटांमध्‍येच नाही, तर विधानसभा सभागृहातही झोपतात. २०१२ पासून आपण तेच बघत आलोय’, असे विधान केले. परंतु, हे विधान करीत असताना त्‍यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. त्‍यामुळे सरदेसाईंनी असे विधान करून नेमका चिमटा कुणाला काढला? असा प्रश्‍न जनतेकडून उपस्‍थित होत आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: 'शत्रू चित्रपटातच नव्हे, विधानसभेतही झोपतात'! सरदेसाईंचा टोला; कुणाची ॲलर्जी नसल्याचा केला दावा

स्मार्ट सिटीचे ‘स्मार्ट’ बोर्ड

पणजीत ‘स्मार्ट सिटी’ने जे मार्ग दर्शविणारे उभारले आहेत, ते फलक पाहता खरोखरच इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) कौतुकच केले पाहिजे. मार्ग दर्शविणाऱ्या फलकाच्या अगोदर पादचाऱ्यांसाठी मार्ग असणारे फलक लावले आहेत. त्यामुळे लांबून हे मार्ग दर्शविणारे फलक ‘पादचाऱ्यांसाठी मार्ग’ दर्शविणाऱ्या फलकामुळे दडले जातात. परिणामी ते लांबून वाहनचालकांना दिसत नाहीत. किमान इतर स्मार्ट सिटीमध्ये ज्याप्रमाणे मार्ग दाखविणारे फलक उभारले गेले आहेत, ते तरी ‘गुगल’बाबाच्या सहकार्याने पहायला हवे होते. अगोदरच मंत्री बाबूश ंंमोन्सेरात यांनी ‘स्मार्ट बसथांबा शेड’ना आक्षेप घेतला आहे. त्यातूनही ‘आयपीएससीडीएल`ने अद्यापि काही बोध घेतलेला दिसत नाही. आता या फलकावरून राजकारण रंगू नये म्हणजे मिळवले... ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: 'शत्रू चित्रपटातच नव्हे, विधानसभेतही झोपतात'! सरदेसाईंचा टोला; कुणाची ॲलर्जी नसल्याचा केला दावा

‘स्मार्ट’ वाहतूक ठप्प!

पणजीत शनिवारी डेल्टिन कॅसिनोजवळ दयानंद बांदोडकर मार्गावर ‘स्मार्ट सिटी’ची ई-बस बंद पडली आणि सगळ्या ‘स्मार्ट’ व्यवस्थेचा गाडा रस्त्यात अडकला! शहराच्या नावात ‘स्मार्ट’ आहे, पण बसने मात्र ठरवलेले होते की ‘आज नाही चालायचे!’ वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांनी मात्र शहर प्रशासनाला मनातल्या मनात अनेक ‘स्मार्ट’ विशेषणे बहाल केली. काहींनी तर ‘बसचे चार्जिंग संपले, पण आश्वासन मात्र फुल चार्ज!’ असा टोमणाही हाणला. तासनतास थांबलेल्या वाहनांच्या हॉर्नचा ओरडा आणि धुळीत उडालेली ‘स्मार्ट सिटी’ची प्रतिमा, – बस एवढेच सांगून गेली, ‘स्वप्न मोठे होते, पण बॅटरी थोडी कमी पडली!’ ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com