Govind Gaude: 'भाजपचे पदाधिकारी माझ्याविरोधात वावरत होते', गावडेंचे पुन्हा फुत्कार; कला अकादमीच्या त्रुटी दाखवल्याचा दावा
पणजी,: ‘भाजपचेच पदाधिकारी माझ्याविरोधात वावरत होते’, असा आरोप आमदार गोविंद गावडे यांनी आज एका मुलाखतीत केला. योग्य वेळी त्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करेन, असे म्हणत कला अकादमीच्या दुरवस्थेला सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. त्रुटी निदर्शनास आणूनही वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा त्यांनी केला.
कला अकादमीचे प्रकरण लावून धरणाऱ्यांपैकी एका संपादकाने मला तुमचेच लोक हे प्रकरण लावून धरा असे सांगतात, असा गौप्यस्फोट माझ्याशी बोलताना केला होता. ते लोक कोण हे आज मी सांगतो. ते आमच्याच पक्षाचे पदाधिकारी आहेत. ते पदाधिकारी व ते संपादक कोण हे सांगण्यासाठी योग्य काळ, वेळ येण्याची मी वाट पाहत आहे, असेही गावडे यांनी नमूद केले.
कला अकादमीच्या वास्तूची दुरुस्ती हवी, एवढीच मागणी करणे आमच्या हाती होते. ते काम आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपवल्यानंतर कंत्राटदार नेमणे, कामावर लक्ष ठेवणे, गुणवत्ता तपासणे ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची होती.
कला व संस्कृती मंत्री या नात्याने मी तसाच शेरा त्यावेळी मारला होता. कला अकादमी प्रकरणावरून माझ्यावर टीका करणाऱ्यांनी ही बाब समजून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी कल्याण खात्याच्या अकार्यक्षमतेविषयी मी बोललो होतो, ते अधिकाऱ्यांसंदर्भात होते. यंदाच नव्हे, तर गेल्या वर्षीही मी तेच बोललो होतो.
तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मला त्याविषयी विचारणाही केली होती. तद्नंतर आमच्या (उटा) दोन-तीन बैठका मुख्यमंत्र्यांसोबत झाल्या. पत्रव्यवहार केला. जी कामे झाली नाहीत, त्यावर मी बोललो होतो. प्रेरणा दिन दिवसात अधिकाऱ्यांचा सत्कार करावा असे काम त्यांनी करावे, असे माझे म्हणणे होते. कृषिमंत्री रवी नाईक व आदिवासी कल्याण संचालकांकडे विचारणा सरकारने केली होती का?, असा सवाल गावडे यांनी केला.
न्याय देण्याची क्षमता दामूंकडे हवी
दामू नाईक यांना भेटलो, तेव्हा मी त्यांना जे काही घडले ते सांगितले. माझे भाषण यू-ट्युबवर उपलब्ध आहे. चित्रपट निर्माते असलेल्या दामू यांना कोकणी बऱ्यापैकी समजते. जो आरोप शब्दांची गफलत करून, अर्थाचा अनर्थ करून आलेल्या बातम्या गृहित धरून कोणत्या आधारे वक्तव्य केले, अशी विचारणा दामू यांना मी केली. त्यावेळी दामू गोव्यात नव्हते. त्यांनीच मला नागपूरची विमान तिकीटे दाखवली. पदाला न्याय देण्याची क्षमता दामू यांच्याकडे हवी. त्यांनी मला झाले ते झाले, माझ्याकडे मागितलेला अहवाल देणार, असे दामू यांनी मला सांगितले.
१८ जून रोजीचा घटनाक्रम
वेळेच्या बाबतीत मी वक्तशीर. त्यामुळे कोणाचा फोन आला, हे मला ठाऊक असते.
मी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ९.२६ वाजता गेलो होतो, हे त्याचमुळे सांगू शकतो.
मुख्यमंत्र्यांचा १८ जून रोजी फोन आला तेव्हा, मला तो सर्वसाधारण फोन असेल असे वाटले.
त्याआधी मुख्यमंत्र्यांवर याबाबत कोणी दबाव आणला असेल तर त्याच्याशी १० मिनिटे भेट घालून द्या, असे मुख्यमंत्र्यांना मी सांगितले होते.
मात्र, ते काही झाले नाही. मुख्यमंत्र्यांनीही १८ जून रोजी मला राजीनामा द्या, असे सांगितले नाही.
त्याचदिवशी सव्वासहाच्या दरम्यान एका माध्यमावरील बातमीद्वारे तो निर्णय मला समजला, अशी माहिती त्यांनी दिली.
गावडे उवाच...
१. शिरोडा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांपेक्षा ४ हजार कमी मते विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराला मिळाली. भाजप उमेदवाराविरोधात मतदान करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कोणती कारवाई पक्षाने केली, या प्रश्नाचे उत्तरही अद्याप मिळायचे आहे, असा टोला त्यांनी लगावला.
२. आक्रमकता हीच माझी शक्ती आहे. मी अहंकारी नाही. राग हा प्रत्येकाला येतो. त्याला अहंकार म्हणता येणार नाही. निवडून दिलेल्यांसाठी आवाज उठवणे यात वावगे काहीच नाही. एक-दोनदा सांगून कामे होत नसतील तर गरम होणे साहजिक आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला.
३. मंत्रिमंडळातून काढून टाकण्याच्या प्रकरणाबाबत ते म्हणाले, खरे तर काही गोष्टी या अकस्मातच घडल्या आहेत, त्याची पूर्वकल्पना मला नव्हती. २५ मे ते १८ जून यादरम्यान बरेच कार्यक्रम मी घेतले. मंडळ संकल्प दिवस केरी येथेही साजरा केला. सुरळीतपणे सारे सुरू होते. अकस्मात १८ जून रोजी पावणे पाच वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन आला. पुढे सर्व काही झाले.
शहानिशा न करताच कारवाई
एक-दोन माध्यमांनी दिलेल्या चुकीच्या बातमीच्या आधारे शिस्तभंगाची कारवाई होण्याचा हा देशातील एकमेव प्रकार असावा. सरकार कोण चालवतो, हा प्रश्न आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या म्हणण्याला किंमत आहे की नाही. भाजप मला नवा नव्हे. १९९४ मध्ये आताचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक निवडून आणण्यासाठी मी खारीचा वाटा उचलला होता. ‘मी म्हणजे सर्व काही’ वाटणारेच ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे म्हणतात. केंद्रीय नेत्यांना याची काही कल्पना नसावी, असे गावडे म्हणाले.
जनतेने अर्थ समजून घ्यावा
पणजीतील एका बैठकीत महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विचारणा केली होती, की पक्षाने सांगितलेले प्रत्येक काम मार्गी लावण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी ती कामे केली आहेत. मात्र, मंत्र्यांवर टीका होत असताना भाजप पक्ष मंत्र्यांच्या समर्थनार्थ पुढे का आला नाही? मीही त्यावेळी तशीच विचारणा केली होती. याचा अर्थ जो आहे तो जनतेने आज समजून घ्यावा, असे गावडे म्हणाले.
मंत्रिपदासाठी लॉबिंग नाही
२८ मे रोजी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, तेव्हा राजीनामा द्या किंवा अशा तऱ्हेचा सूर होता; पण नंतर तसे काही नव्हते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांशी माझी एक तास ४० मिनिटे चर्चा झाली. विषय संपला होता. त्यानंतर गोमेकॉचा विषय उफाळून आला. मी मंत्रिपदासाठी कधीच लॉबिंग केले नाही. माझी मनाची तयारी मात्र सदोदित होती. कारण मी कणखर आहे.
‘ती’ माझी चूक झाली!
१ माझ्याविरोधात कला अकादमीचे प्रकरण लावून धरा, असे सांगणारे भाजपचे पदाधिकारी हे साधे पदाधिकारी नव्हेत, तर पक्ष चालवणारे पदाधिकारी आहेत. मी या विषयावर थांबणार नाही.
२ विरोधकांनी मला सांगितले, की तुमचेच लोक आम्हाला माझ्याविरोधात बोलण्यासाठी माहिती पुरवतात. त्या पदाधिकाऱ्यांवर अद्याप का कारवाई झाली नाही. याप्रकरणी दुसऱ्याचे खापर माझ्यावर घेतले आहे, असे समजा. ती माझी चूक झाली, असे आमदार गोविंद गावडे यांनी नमूद केले.
अकादमीतील त्रुटी मीच दाखविल्या
आदिवासींचे प्रश्न २००३ पासून प्रलंबित आहेत. साध्या कामांसाठी दीड वर्षे हेलपाटे मारावे लागतात. याला अधिकारी जबाबदार असतात. त्यांना जाब विचारला तर कुठे चुकले, अशी विचारणा त्यांनी केली. कला अकादमीचा पाहणी करण्यासाठी पथक आले असतानाच मीच त्रुटी दाखवून दिल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यालाही या विषयावरून मी जाब विचारला होता. पावलोपावली मी सर्व काही दाखवून देत होतो, पत्रव्यवहार आहे, असे गावडे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.