
गोविंद गावडे यांना हटविण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या आदेशाअंती घेण्यात आला आहे. गावडे यांच्या जागी मंत्रिमंडळात कुणाला घ्यावे, यासंदर्भात यथावकाश ठरवले जाईल’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फोन करून गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यासंदर्भात कळविले. नंतर तसे पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिले.
परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी देशात परततील. त्यानंतर गोव्यातील फेरबदलाबाबत निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. गावडे यांना ‘नारळ’ दिल्यानंतर आणखी तिघा मंत्र्यांना दूर करून फेरबदल केला जाईल, अशी शक्यता आहे. गोविंद गावडे यांच्याकडील क्रीडा, कला व संस्कृती, ग्रामविकास या खात्यांचा कारभार आता मुख्यमंत्र्यांकडे आला आहे.
गोविंद गावडे यांच्या मंत्रिमंडळातील जबाबदाऱ्या
मार्च २०१७ ते जानेवारी २०२२: कला व संस्कृती, आदिवासी कल्याण, नागरीपुरवठा
मार्च २०२२ ते जून २०२५ : कला व संस्कृती, क्रीडा व युवा व्यवहार, ग्रामीण विकास
राजकीय प्रवास
२०१७ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून प्रियोळ मतदारसंघातून निवडणूक जिंकली. भाजपचा पाठिंबा. मगोचे दीपक ढवळीकर पराभूत.
२०२२ मध्ये वर्षाच्या सुरूवातीलाच भाजपमध्ये प्रवेश. मंत्रिपदही मिळाले.
वादग्रस्त प्रसंग आणि टीका
कला अकादमीच्या नूतनीकरण कामावर प्रश्नचिन्ह
तवडकर यांच्यासह अन्य नेत्यांवर बेधडक टीका
अधिकाऱ्यांना धमकी देतानाचा ऑडिओ व्हायरल
आदिवासी कल्याण खात्यावर केले भ्रष्टाचाराचे आरोप
कारवाई भाजपला जड जाईल
गावडे मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर बोलले तर भाजपला खटकले. स्वतःच्या हिमतीवर आपले नेतृत्व तयार केले आहे. भाजपने केलेली ही कारवाई आगामी विधानसभेत त्यांनाच जड जाऊ शकते. गावडे हे काही स्वस्त बसणाऱ्यांपैकी नाहीत. ते नक्कीच किमान पाच मतदारसंघांत भाजपला आपली ताकद दाखवतील. - अॅड. महेश राणे, समाजकार्यकर्ते
आम्हाला आनंदच...
गावडे यांना मंत्रिपदावरून हटविले, याचा आम्हाला आनंदच आहे. परंतु कला अकादमीच्या प्रकरणावरून ही कारवाई नसून, इतर खात्यांबाबत निर्माण झालेल्या वादावरून आहे, हे समजून घेतले पाहिजे. गावडे यांची वागणूक बरोबर नव्हतीच, किंबहुना त्यांचा रुबाब वेगळा होता. ते कला अकादमीला नेहमीच कमी लेखायचे. - फ्रान्सिस कुएल्हो, कलाकार
प्रामाणिकपणाचा फटका
गावडे यांना प्रामाणिकपणाचा फटका बसला. यापूर्वी काही मंत्र्यांनी डॉक्टरांचा अपमान केला, मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही. उलट मुख्यमंत्र्यांच्या खात्याशी निगडित भाष्य केले म्हणून गावडेंना डच्चू दिला. आता भाजपला गावडे यांची गरज नसेल. त्यांनी दुसरा नेता तयार केला असावा. - संजय बर्डे, समाजकार्यकर्ते
सत्याचा की असत्याचा विजय?
आज क्रांतिदिनी स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या अध्यक्षांनी आझाद मैदानावर सरकारला आरसा दाखवला. त्याचा परिणाम किंवा योगायोग समजा, मंत्री गोविंद गावडे यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले. आम्ही सर्व मंत्र्यांना हटवण्याची मागणी केली होती. कारण सर्व खात्यांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. गावडे काय बोलले, हे सर्व गोव्याने पाहिले आहे. त्यामुळे हा सत्याचा की असत्याचा विजय, हे जनता आता नक्कीच जाणून असेल. - अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
तेव्हा मुख्यमंत्र्यांनीच दिले होते संरक्षण
मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे व कोणाला काढायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढण्याचे कारण मुख्यमंत्री, हायकमांड व भाजप पक्ष स्पष्ट करत नाही, तोपर्यंत लोकांना बोलण्यास व त्यामधून आपापला निष्कर्ष काढण्यास मोकळीक असेल.
मी जेव्हा गावडे यांचा कला अकादमीतील भ्रष्टाचार घोटाळा बाहेर काढला व उच्च न्यायालयातही गेलो, तेव्हा सरकारने काही केले नाही. इतके करूनही मुख्यमंत्र्यांनी तेव्हा गावडे यांना संरक्षण दिले. मात्र जेव्हा गावडे सरकारमधील भ्रष्टाचारावर बोलू लागले तेव्हा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले. याचा अर्थ जो मंत्री सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवतो त्याच्यावर कारवाई केली जाते व जो भ्रष्टाचार करत राहतो त्याच्याविरोधात कोणतीच कारवाई होत नाही. - विजय सरदेसाई, आमदार (गोवा फॉरवर्ड)
भाजपने आपला खरा चेहरा दाखविलाच
गोवा क्रांतिदिनाला भाजपने आपला खरा चेहरा दाखवला. गोविंद गावडे हे केवळ खरे बोलले होते. पण भाजपमध्ये सत्य बोलणाऱ्यांना जागा नाही हेच यातून अधोरेखित होते.
गावडे हे बेधडक व सडेतोड बोलणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला होता. परंतु भाजपला ते सहन झाले नाही. मुळात गोविंद गावडे यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक होते. परंतु स्पष्टीकरण आलेच नाही. यातूनच भाजपचा खरा चेहरा दिसतो. - विजय भिके, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस
आम्ही भाजपबरोबर, आम्ही युतीत
कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्याची मला कल्पना नाही. मी घरी आहे. एवढेच सांगू शकतो की, आम्ही भाजपबरोबर आहोत आणि आम्ही युतीतही आहोत. गावडेंच्या विषयावर मी अधिक भाष्य करू शकत नाही. - दीपक ढवळीकर, अध्यक्ष (मगो)
तूर्तास आणखी बदल नाहीत : दामू
मंत्रिमंडळ बदल हा पूर्णतः मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणारा मुद्दा आहे. गोविंद गावडे यांच्या जागेवर दुसऱ्या कोणाला मंत्री करायचे, हा निर्णयसुद्धा मुख्यमंत्रीच घेतील. पण असे असले तरी हा एक बदल वगळता तूर्तास तरी आणखी कुठलाही बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री सांभाळत असलेल्या आदिवासी कल्याण खात्यावर मंत्री गोविंद गावडे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यावर ‘गावडे यांच्यावर कारवाई करणार’ अशी सर्वप्रथम प्रतिक्रिया दामू नाईक यांनीच व्यक्त केली होती.
त्यानंतर त्यांनी भाजपचे केंद्रीय नेते बी. एल. संतोष यांचीही भेट घेतली होती. गावडे यांच्याविरोधात तुम्ही कोणती तक्रार केली होती का? असे विचारले असता, मी कोणाविरोधात तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे मी केंद्रीय नेत्यांना सांगितले होते, असे दामू नाईक यांनी सांगितले. भविष्यात मंत्रिमंडळात आणखी काही बदल होणार का? असा प्रश्न त्यांना केला असता, माझ्या माहितीनुसार आणखी काही बदल आताच होणे शक्य नाही.
परिणामांची फळे भोगावीच लागतात
खरे म्हणजे गोविंद गावडे यांचे मंत्रिपद अगोदरच काढून घेणे गरजेचे होते. कला अकादमी ही राज्यातील कलाकारांचे भूषण. पण गावडे यांच्या काळात या वास्तूची वाट लागली. त्यामुळे कलाकार व रसिक प्रेक्षकांचाही हिरमोड झाला. असे असतानाही गावडे यांची वागण्याची, बोलण्याची भाषा उद्धट होती. मनाला येईल ते बोलायचे. बहुजन समाजातील एक व्यक्ती मंत्रिपदापर्यंत पोहोचते, पण आपल्या स्वभावापायी मंत्रिपद गमावते याचे एका बाजूने दुःखही होत आहे. पण उपाय नाही. परिणामांची फळे भोगावीच लागतात. - यतीन साळकर, इब्रामपूर-पेडणे
मी आहे तिथेच समाधानी याबाबत सभापती रमेश तवडकर यांना विचारले असता ते म्हणाले, गावडे यांना मंत्रिपदावरून काढले त्याबद्दल मला भाष्य करायचे नाही. माझ्या बाबतीत सांगायचे झाल्यास मी ज्या ठिकाणी आहे तिथे मी समाधानी आहे. भाजपमध्ये सर्व निर्णय वरिष्ठ नेते घेतात आणि त्यांनी घेतलेले सर्व निर्णय मला मान्य असतील, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. - रमेश तवडकर
प्रकाश वेळीप म्हणतात ‘नो कमेंट्स’
नव्या राजकीय घडामोडींबद्दल ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ‘नो कमेंट्स’ असे उत्तर दिले. ज्यावेळी गावडे यांच्यावर कारवाई केली जाणार असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिला होता, त्यावेळी सर्वप्रथम ‘उटा’ संघटनाच गावडे यांच्या समर्थनार्थ उभी राहिली होती.
क्रीडामंत्री म्हणूनही कामगिरी अपयशीच
गोव्यात २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन झाले. ही स्पर्धा गोविंद गावडे क्रीडामंत्री असताना झाली खरी, पण खात्याचे मंत्री या नात्याने स्पर्धा आयोजनात ते अपयशीच ठरले. त्यांचा सारा कारभार सैरभैर होता.
गावडे यांच्या क्रीडामंत्री या नात्याने अधिकाराअंतर्गत येणाऱ्या गोवा क्रीडा प्राधिकरणाला २०२२ मध्ये नियोजित ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी वेळेत करणे शक्य झाले नाही. परिणामी या स्पर्धेचे यजमानपद गुजरातला बहाल करण्यात आले व गोव्यात २०२३ साली ३७वी स्पर्धा घेण्याचे भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) निश्चित केले.
स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नियोजित होती, पण सप्टेंबर २०२३ पर्यंत राज्यातील क्रीडा प्रशासन या प्रतिष्ठेच्या स्पर्धा आयोजनाबाबत चाचपडताना दिसले. त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा लांबणीवर टाकण्याची नामुष्की गोव्यावर येण्याची शक्यता होती.
अखेर स्पर्धा आयोजनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लक्ष घातले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे सरसावले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सारी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतली. मुख्यमंत्री सावंत यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली गोवा सरकारने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.