
नंदकुमार कामत
आज गोव्यात व भारतभर गोवा क्रांतिदिनाच्या ८०व्या वर्धापनदिनाचे स्मरण होत आहे. जर्मनीत शिक्षण घेत असताना डॉ. राममनोहर लोहियांचा गोव्याशी संबंध आला तो दुसरे विद्यार्थी डॉ. जुलियांव मिनेझीस यांच्यामुळे. परंतु जर्मनी सोडल्यानंतर तब्बल १३ वर्षांनीच लोहिया प्रथम गोव्यात आले.
ब्रिटिश भारतातील व पोर्तुगीज भारतातील दोन विद्यार्थी जर्मनीत एकत्र असताना त्यांच्या त्या काळातील वास्तव्यासंबंधी माहिती शोधताना जोआखिम ओस्टरहेल्ड यांचा एक उत्कृष्ट लेख सापडला ‘लोहिया अॅज अ डॉक्टोरल स्टुडंट इन बर्लिन’ (Economic and Political Weekly, ऑक्टोबर २—८, २०१०). ओस्टरहेल्ड हे बर्लिनमधील हम्बोल्ट विद्यापीठात समकालीन दक्षिण आशियाई इतिहासाचे संशोधक आहेत.
याच विद्यापीठात, जेव्हा ते फ्रिडरिक-विल्हेल्म्स-युनिव्हर्सिटेट म्हणून ओळखले जात होते, तिथे डॉ. लोहिया १९२९च्या शरद ऋतूपासून फेब्रुवारी—मार्च १९३३पर्यंत अधिक काळासाठी डॉक्टरेट करत होते.
२४ जानेवारी १९३३ रोजी लोहियांनी ‘भारतामधील मीठ कर’ या विषयावर आपले प्रबंध सादर केले. ओस्टरहेल्ड यांनी त्या प्रबंधाची प्रत विद्यापीठाच्या अभिलेखागारात शोधण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही. विद्यार्थी असतानाच लोहिया व डॉ. जुलियांव मिनेझीस यांची मैत्री झाली होती.
मिनेझीस त्वचारोगतज्ज्ञ होण्यासाठी एमडी करत होते आणि लोहिया अर्थशास्त्रात पीएचडी करत होते. गोव्यातील मीठ उद्योग आणि १८७८मधील अँग्लो-पोर्तुगाल करार यासंबंधी माहिती मिनेझीस यांनीच लोहियांशी निश्चितच शेअर केली असे मानणे वावगे ठरणार नाही.
या करारामुळे ब्रिटिश भारतातील बॉम्बे प्रेसीडन्सी सरकारला पोर्तुगीज भारतात मीठ तयार करण्याचा आणि व्यापाराचा मक्तेदारी अधिकार मिळाला होता. त्यांना गोव्यातली मिठागरे बंद करण्याचेही अधिकार होते.
त्यामुळे, मिनेझीसनी ते मुंबईत असताना आरामासाठी आणि विश्रांतीसाठी असोळणा (मीठ उत्पादनाचे तेव्हाचे महत्त्वाचे गाव) येथे बोलावल्यानंतर लोहिया गोव्याच्या राजकीय व आर्थिक परिस्थितीची आणि वरील कराराची नीट माहिती घेऊनच आले असावेत.
त्यांच्या प्रबंधात महात्मा गांधींच्या मीठ सत्याग्रहावर भर होता. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत असतानाच भारतातील मीठ कराविरुद्ध आंदोलन केले होते. गांधीजींचे पोरबंदर हे पोर्तुगिजांच्या दीव वसाहतीजवळ होते. त्यामुळे, एक हुशार कायदेपंडित म्हणून त्यांना वरील करार व गोव्यातील मीठ उद्योग यांची माहिती नसावी, असे मानणे अशक्य आहे.
काही काळ डॉ. लोहिया ’हिंदुस्थान असोसिएशन ऑफ सेंट्रल युरोप’ या जर्मनीतील भारतीय संघटनेचे सचिव होते. विद्यार्थी म्हणून लोहिया आणि मिनेझिस दोघेही जर्मनीत सक्रिय होते आणि त्यांनी या संघटनेच्या कार्यात सहभाग घेतला होता.
परंतु लोहिया यांनी फारच मोजक्या लोकांशी मैत्री का केली, याचे कारण शोधताना ओस्टरहेल्ड म्हणतात की, ‘आपल्याला लोहिया यांनी जर्मनीत विद्यार्थिदशेत डाव्या राजकीय कृतींत सक्रिय सहभाग घेतल्याचे फारसे पुरावे सापडत नाहीत,
शिवाय त्यांनी १९३०मध्ये जिनिव्हा येथे लीग ऑफ नेशन्सच्या अधिवेशनात आणलेला व्यत्यय आणि ब्रिटिश भारताच्या धोरणाविरुद्ध केलेल्या निदर्शनाशिवाय फारशी उल्लेखनीय कृती दिसून येत नाही’. ते पुढे लिहितात, ‘लोहियांच्या लेखनात काही मोजकी जर्मन व्यक्तिमत्त्वे दिसतात, पण फारसे भारतीय दिसत नाहीत.
केवळ ब्रजेश सिंग, जो मॉस्कोपासून आल्यानंतर काही काळ लोहिया यांच्याकडे राहिला आणि जुलियांव मिनेझीस ज्याने यांचाच उल्लेख आहे. जिनिव्हा अधिवेशनात व्यत्यय आणताना मिनेझिस लोहियांसोबत होते’.
१८ जून १९४६ रोजीचा गोवा क्रांतिदिन आणि जर्मनीतील संबंध यामध्ये महत्त्वाचे दुवे आहेत. जिनिव्हा येथे महाराज बिकानेर यांच्याविरोधात भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या त्यांच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करताना डॉ. लोहिया यांनी दाखवलेली निर्भयता, पुढे गोव्यातही दिसली.
त्यावेळी ब्रिटिशांनी धारासणा येथे सत्याग्रहींवर केलेल्या अमानुष अत्याचारांमुळे लोहिया संतप्त झाले होते. त्यांनी परदेशात जाऊन भारतातील प्रश्नांवर प्रकाश टाकला आणि तेथील अधिकाऱ्यांना लज्जास्पद स्थितीत आणले.
१९३०साली जिनिव्हा येथे त्यांनी केलेली ती कृती आणि गोव्यातील १८ जून १९४६ची कारवाई, या दोन्हीत फारसा फरक नव्हता. दोन्ही वेळा त्यांच्यासोबत डॉ. जुलियांव मिनेझीस होते. भारत छोडो आंदोलनादरम्यान लोहिया गोव्यात भूमिगत होण्याचा विचार करत होते, परंतु डॉ. मिनेझीस यांनी त्यांना तसे न करण्याचा सल्ला दिला होता.
१९३९ ते १९४६ दरम्यान, तुरुंगवासाचा काळ वगळता, दोघांचा संपर्क कायम राहिला. १२ ऑक्टोबर १९६७ रोजी डॉ. लोहिया यांचे निधन झाले आणि त्यांच्या मैत्रीचा शेवटही झाला. २ जुलै १९८० रोजी डॉ. जुलियांव मिनेझीस यांचे मुंबईत निधन झाले. भारत सरकार किंवा गोवा सरकारने त्यांचे काहीही दस्तऐवजीकरण न केल्याने त्यांच्या स्मृती लोप पावल्या.
अन्यथा जर्मनीतील त्यांच्या सहवासाविषयी अधिक तपशील कळला असता आणि १८ जून १९४६च्या कृतीचे लोहियांनी किती काळजीपूर्वक नियोजन केले होते ते कळले असते.
लाहोर तुरुंगातून सुटल्यावर लोहिया यांच्याकडे डॉ. जुलियांव मिनेझीस यांनी वैद्यकीय तपासणी केली होती आणि १० जून १९४६पासून असोळण्यातील त्यांच्या ‘मिनेझीस मॅन्शन’मध्ये त्यांचे आतिथ्य केले होते. १९ जूनला सायंकाळी लोहियांना गोव्यातून बाहेर पाठवण्याचा आदेश मिळाला तोपर्यंतच्या दहा दिवसांच्या घडामोडींचे आजवर कुणीही तारीखवार विशिष्ट स्वरूपात दस्तऐवजीकरण केलेले नाही.
परंतु या दहा दिवसांत गोव्याचा इतिहास बदलून गेला होता. जर्मनीत उफाळलेला साम्राज्यवाद विरोधातील आक्रोशाचा जिनिव्हा येथे उच्चार झाला आणि अखेर १८ जून १९४६ रोजी मडगाव येथे त्याचा स्फोट झाला.
लोहिया यांनी गोव्याविषयी प्रथमच १० जून १९४६ रोजी माहिती घेतली नव्हती. डॉ. जुलियांव मिनेझीसशी १९३३पर्यंत त्यांचे जर्मनीत संबंध होते आणि त्या काळात त्यांनी ब्रिटिश व पोर्तुगीज साम्राज्यवादाविषयी चर्चा केल्या असाव्यात याचा अंदाज बांधता येतो.
लुईस द मिनेझीस ब्रागांझा यांच्या राष्ट्रभक्त विचारांनी प्रेरित झालेले तरुण डॉ. जुलियांव मिनेझीस जर्मनीत शिक्षण घेत होते. लोहियांनी ही मैत्री खूप मोलाची मानली, याचेच प्रत्यंतर जीनीव्हा अधिवेशनातील त्यांच्या क्रांतिकारक कारवाईवरून येते. त्यांची नावे तरुण आशियाई क्रांतिकारकांच्या नामावलीत कोरलेली आहेत.
माझ्या वडिलांनी १९४६मध्ये पणजीतील घटना स्वत:च्या दुकानातून प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. त्यांनी मला लोहियांविषयी सांगितले होते. मी त्यावेळी कस्तुरबा मातोश्री माध्यमिक शाळेत होतो. जून १९७१मध्ये आमचे मार्क्सवादी मुख्याध्यापक एस. एस. खानोलकर यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि पत्रकार वामन राधाकृष्ण यांच्याशी भेट घडवून दिली.
नंदकुमार आमचा हुशार विद्यार्थी आहे, तो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल, असे खानोलकर म्हणाले. वामनबाब १८ जून १९४६च्या रौप्य महोत्सवी दिनासाठी विद्यार्थ्यांना असलेल्या माहितीबाबत सर्वेक्षण करत होते.
त्यांनी मला विचारले, १८ जून १९४६चे महत्त्व काय? मी त्यांना उत्तर दिले की, डॉ. लोहियांनी त्या दिवशी स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पेटवली होती. काही प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकलो नाही, पण वामनबाब समाधानी दिसले. काही दिवसांनी माझ्या काकांनी मला सांगितले की, पाहिलेस का?
वामनबाबांनी तुझी प्रशंसा वृत्तपत्रात केली आहे. मी खूप उत्साहित झालो होतो कारण पणजीतील सर्व शाळांतील मोजक्या विद्यार्थ्यांत मीच असा होतो की ज्याला १८ जून १९४६चे महत्त्व आणि डॉ. लोहियांची भूमिका माहिती होती. आता थेट १९७८पर्यंत पुढे जाऊन पाहिले, तर आम्ही ऑल गोवा स्टुडंट्स युनियन (एजीएसयू) स्थापन केली.
नंतर मला मुंबई विद्यापीठाच्या पणजीतील पदव्युत्तर केंद्रातील हिंदी विभागात कार्यरत असलेले डॉ. अरविंद पांडे भेटले जे लोहियांसोबत उत्तर प्रदेशात काम करत होते. त्यांनी लोहियांचे लेखन व त्यांच्यावरील पुस्तके वाचण्याची शिफारस केली. मी ती वाचू लागलो. यानंतर मला त्याकाळी जनता पक्षाचे पणजीचे आमदार व स्वातंत्र्यसैनिक माधव बीर भेटले.
त्यांनी मला कट्टर लोहियावादी बनवले. पण खरा लोहियावाद मला स्वातंत्र्यसैनिक व साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नागेश करमलींमुळे समजला. त्यांनी लोहियांची पुस्तके मला वाचायला दिली. १९८०मध्ये आम्ही काही नव्या पिढीतील तरुण लोहियावाद्यांनी ’लोहिया विचार मंच’ नावाचे एक धर्मनिरपेक्ष समाजवादी व्यासपीठ सुरू केले.
त्यात सिरील पाशेको, सतीश सोनक, शेखर मयेकर, राजू भडभडे आणि शशिकांत जोशी यांचा सक्रिय सहभाग होता. शशिकांत जोशी यांनी मंचाची सावर्डे शाखा स्थापन केली. मी सावर्ड्याच्या भवितव्यावर आयोजित परिसंवादात भाग घेतला होता.
लोहियांचा प्रभाव काही वर्षे टिकला, परंतु करिअरकडे लक्ष केंद्रित करत असताना लोहियांच्या स्मृतीतील उपक्रम पुढे नेता आले नाहीत. माधव बीरांमुळे मी जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, एन. जी. गोरे व भाई वैद्य अशा अनेक लोहियावादी नेत्यांना भेटू शकलो. गोव्यात विनायक नाईक, शिक्षक कॅजिटन परेरा, पत्रकार चंदू कासकर यांसारखे अनेक लोहियावादी मित्र मिळाले.
स्वातंत्र्यसैनिक डॉ. जे. एफ. मार्टिन्स यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर त्यांच्या निवासस्थानी क्रांतिज्योती, येथे समाजवादी नेते प्रा. ग. प्र. प्रधान यांच्यासाठी जे रात्रभोजन आयोजित केले होते, त्याला मीही उपस्थित होतो.
त्या रात्री उशिरापर्यंत प्रधानसाहेबांनी १९४२चे आंदोलन, काँग्रेसमधील समाजवाद्यांची भूमिका, लोहियांची अटक व सुटका झालेल्याचा अनुभव, हे सर्व सांगितले. त्यामुळे माझी लोहियांबाबतची जिज्ञासा पुन्हा जागी झाली. २०१०मध्ये प्रा. प्रधानांचे निधन झाले. त्यांच्या सल्ल्यामुळे मला चांगले आमदार कसे कार्य करू शकतात हेही कळले.
माजी राज्यपाल व लोहियांचे अनुयायी सत्यपाल मलिकांची अचानक बदली होण्यापूर्वी त्यांची राजभवनात भेट झाली व त्यांनी बऱ्याच आठवणी सांगितल्या. मी लोहियांसंबंधी लिहीत असतो हे त्यांना आवडले. ते मला भेटलेले शेवटचे लोहियावादी होते.
आजकाल बरेच नवे लोहियाप्रेमी तयार झालेले दिसतात. पण लोहियांच्या जात व भाषा ही सत्ताधाऱ्यांची तोडण्याची हत्यारे आहेत ह्या विचारांच्या विरुद्ध गोव्यातील ज्ञाती ज्ञातीतील व भाषांचे राजकारण चालले आहे.
लोहिया कुठच्या ज्ञातीतील ह्याचा विचारही कुणी केला नव्हता पण त्यांचा एक पुतळाही त्याच ज्ञातीने अभिमानाने दान केला. तो पुतळा आपण लोहियांच्या विचारांचे अवमूल्यन गोव्यात कसे केले त्याचा पुरावा आहे. असो, हे असेच पुढे चालणार.
आज आपण जे हातात सहज खेळवता येणारे तंत्रज्ञान वापरतो ते लोहियांनी अल्पप्रमाण यंत्रांची कल्पना लेखनात मांडून येणाऱ्या लघुयंत्रकेंद्रित युगाची दखल ६५ वर्षांमागे घेतली होती. असे होते माझ्या जीवनाला परिसस्पर्श करणारे डॉ. राम मनोहर लोहिया.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.