गणिताच्या भक्कम पायावर विकासाची अभेद्य प्रमेय मांडणाऱ्या अभियंत्यांचे समाजावर अनंत उपकार आहेत. त्याची परतफेड करणे अशक्य आहे; परंतु त्यांच्या कार्याचा गौरव करून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न नक्कीच करता येतो. त्यासाठीच ‘गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्ड २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ‘बेस्ट गोवन इंजिनिअरिंग ब्रँड’ श्रेणीत शेखर सरदेसाई, तर ‘मनोहर पर्रीकर ऑलराऊंडर ॲवॉर्ड’ महिला क्रिकेटर शिखा पांडे हिला जाहीर करण्यात आला आहे.
१५ सप्टेंबरला अभियंता दिनी सायंकाळी ४ वा. कुजिरा-सांताक्रुझ येथील मुष्टिफंड संस्थेच्या ‘इंडिशिला’ सभागृहात रंगारंग सोहळा होणार असून, त्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. गोमन्तक टीव्ही’ने पडद्यामागील अभियंतारूपी कल्पक हातांचा सन्मान करण्याचे योजून एक आगळेवेगळे व्यासपीठ खुले केले आहे. या कार्यक्रमासाठी राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.
शिखा पांडे हिचा जन्म १२ मे १९८९ रोजी झाला. शिक्षणात तसेच क्रिकेटमध्ये तिने अग्रक्रम राखला. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. दहावी इयत्तेत सीबीएई अभ्यासक्रमात गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल तिला ‘धिरुभाई अंबानी पुरस्कार’ मिळाला होता. भारतीय हवाई दलातून स्क्वॉड्रन लिडर एटीसी ऑफिसर या पदावरून दहा वर्षांच्या सेवेनंतर शिखा निवृत्त झाली. २०१७ साली तिला हवाई दल प्रमुख यांच्या हस्ते ‘द चिफ ऑफ एअर स्टाफ कमेंडॅशन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
शेखर सरदेसाई हे ख्यातनाम उद्योजक आहेत. ते प्रसिद्ध ‘किनेको’ ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनीचा देशभर विस्तार झाला असून हजारो लोकांच्या हातांना रोजगार देण्याचे लक्ष्य कंपनीने साध्य केले. अंतराळ उड्डाणासह संरक्षण, रेल्वे, दूरसंचार, पवन ऊर्जा क्षेत्रांसाठी लागणारी दर्जेदार सामग्री बनविण्यात ‘किनेको’चे मोठे योगदान आहे. सरदेसाई यांनी पणजी अभियांत्रिकी विद्यालयातून ‘फॅब्रिकेशन’ विषयातून शिक्षण पूर्ण केले. कुशल अभियंता म्हणून अल्पावधीत त्यांना ओळख मिळाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.