Goa Feni
Goa FeniDainik Gomantak

Goa Feni: जिरा, आले, वेलचीनंतर आता घ्या ‘परिपाट’ची चव! ‘जांभूळ’ फ्लेवरची फेणी झाली दुर्मीळ

Goa Feni:डिचोली तालुक्यातील विविध भागात काजू बोंडूपासून हुर्राक आणि काजू फेणीचे उत्पादन घेण्यात येते.

Goa Feni

‘काजू फेणी’ हे गोव्याचे वैशिष्ट्य. औषधी गुणधर्म असलेल्या काजू फेणीला आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी आहे. डिचोलीत आता पारंपरिक फेणीसह वेगवेगळ्या ‘फ्लेवर’मध्ये फेणी मिळत आहे. यंदा तर काही व्यावसायिकांनी ‘परिपाट’ हा नवीन फ्लेवर बाजारात आणला असून, ‘जांभूळ’ फ्लेवरची फेणी मात्र दुर्मीळ झाली आहे.

डिचोली तालुक्यातील विविध भागात काजू बोंडूपासून हुर्राक आणि काजू फेणीचे उत्पादन घेण्यात येते. डिचोलीतील काही दारू उत्पादक व्यावसायिक स्थानिक बागायतींमधून उपलब्ध होणाऱ्या काजू बोंडूसह महाराष्ट्रातील वझरे, माटणे, दोडामार्ग आदी भागातून काजू बोंडूंची आयात करून दारू गाळतात.

डिचोलीत दरवर्षी काजू फेणीचे उत्पादन होते, त्यात ५० टक्क्यांहून अधिक उत्पादन हे राज्याबाहेरील काजू बोंडूंपासून होत असते. यंदा आता काजू पिकाचा हंगामही आटोपला आहे.

दरम्यान, सर्दी, ताप या आजारांवर मसाला आदी विविध फ्लेवरची फेणी रामबाण उपाय असल्याने ग्राहकांकडून विविध फ्लेवरच्या फेणीला मागणी आहे, तसेच जांभूळ फ्लेवरची फेणी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

मात्र, यंदा जांभळांच्या फ्लेवरची फेणी मिळणे मुश्‍कील झाले आहे. प्रतिकूल हवामानामुळे जांभूळ पिकावर परिणाम झाल्याने जांभळांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे या फ्लेवरची फेणी काढणे शक्य झाले नाही, अशी माहिती सर्वण येथील दारू उत्पादक उमेश सावंत यांनी दिली.

Goa Feni
Sea Turtle Conservation: कासव संवर्धन मोहिमेला मोरजी किनाऱ्यावर यश! 13,000 पिल्लांना सोडले समुद्रात

फेणीचे विविध ‘फ्लेवर’

गेल्या काही वर्षांपासून काही उत्पादकांनी वेगवेगळ्या फ्लेवरची फेणी उत्पादन करण्याकडे लक्ष घातले आहे. सुरवातीस मसाला, जांभूळ या फ्लेवरची फेणी गाळण्यात येत होती. नंतर हळूहळू जिरा, लसूण, आले, गंजन, वेलची या फ्लेवरची फेणी गाळण्याकडे उत्पादकांनी लक्ष केंद्रित केले.

आता तर पारंपरिक फेणीसह डिचोलीतील बहुतेक मद्यालयांतून वरील सर्व फ्लेवरची फेणी उपलब्ध होत आहे.

अन्य फेणीच्या तुलनेत वेलची आणि परिपाट फ्लेवरची फेणी महाग आहे. प्रतिलिटरमागे वेलची व परिपाट फ्लेवरची फेणी ४५० रुपये अशा दराने विकली जात आहे. मसाला व अन्य फ्लेवरची फेणी ३५० रुपये दराने विकली जात आहे.

Edited By - तुकाराम सावंत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com