मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कुंकळ्ळी लढ्याच्या स्मरणदिनाची निमंत्रणपत्रिकांच्या केवळ छायाप्रतींचे वाटप करून गोव्याला बदनाम केले असून, निमंत्रण पत्रिकेत आमदारांचा तसेच नगराध्यक्षांचा उल्लेख न करून कुंकळ्ळीकरांचा अपमान केला आहे अशी घणाघाती टिका कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.
राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडे योग्य आमंत्रणे छापण्यासाठी पैसे नाहीत आणि कुंकळ्ळी लढ्याच्या स्मृतीदिन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार आणि नगराध्यक्षांचा साधा उल्लेख करण्याचे सौजन्य नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे असे आमदार युरी आलेमाव यांनी सांगितले.
मला आजच गोवा सरकारने 16 जुलै 2022 रोजी कुंकळ्ळी लढ्याच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या अधिकृत समारंभाचे "फोटोकॉपी" स्वरूपात आमंत्रण मिळाले आहे. या निमंत्रण पत्रीकेवर मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री यांचा उल्लेख आहे. परंतु, आमदारांचा व कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष यांचा उल्लेख नाही. या एकंदर प्रकारावरुन भाजप सरकारचा खोटा राष्ट्रवाद आणि बेगडी देशभक्ती समोर येते, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
भाजप सरकारने 18 मिनिटांच्या शपथविधी सोहळ्यावर सुमारे 6 कोटी खर्च केले जे प्रति मिनिट 33.33 लाख इतके होते. दुर्दैवाने, त्याच सरकारकडे राष्ट्रीय युद्ध स्मारक दिनाच्या कार्यक्रमाची योग्य निमंत्रणे छापण्यासाठी पैसे नाहीत, असे युरी आलेमाव म्हणाले.
मी गोव्यातील ऐतिहासिक महत्त्वाच्या अधिसूचित ठिकाणांचा तपशील मिळवण्यासाठी गृह खात्याकडे तारांकित प्रश्न मांडला होता. हा प्रश्न माझ्या नावासमोर सूचीबद्ध करण्यात आला होता पण तो प्रश्न चर्चेत येण्याच्या दिवशीच क्रमांकीत यादितून गायब करण्यात आला. पुरातत्व खात्याने दिलेल्या एका अतारांकीत प्रश्नाच्या उत्तरात आहे गोव्यातील 51 स्थळे संरक्षित स्थळे म्हणून अधिसूचित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
योगायोगाने, सदर यादीत ऐतिहासिक लोहिया मैदान, आझाद मैदान, असोळणा आणि पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारके आणि इतर स्मारकांचा समावेश नाही, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
जर पुरातत्व विभागाने या ऐतिहासिक स्थळांना अधिसूचित केले नसेल, तर त्याबाबत कार्यवाही करून त्या अधिसूचित करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. गृहखात्याच्या मागण्यांवर मी विधानसभेत हा मुद्दा मांडला, पण मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही.
स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आदर नसलेल्या भाजप सरकारचा खरा चेहरा आणि खरा अजेंडा गोव्यातील जनतेला कळला पाहिजे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.