

‘नरकासुराच्या साक्षीने केलेली युती?’
सध्या गोव्यात नाही म्हटले तरी भाजपच्या विरोधात लोकांमध्ये असंताेष आहे. पण त्याचा फायदा घेण्यास विरोधक वारंवार अपयशी ठरत आहेत, हेही तेवढेच खरे. भाजप विरोधात असलेल्या असंतोषाचा फायदा घेता यावा यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येस फातोर्डा येथे झालेल्या एका कार्यक्रमात विजय सरदेसाई यांनी सर्व विराेधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणून युतीचा संकल्प जाहीर केला होता. मात्र, ‘आरजी’ने शेवटच्या क्षणी त्यातून अंग काढून घेतल्याने ही महायुती झालीच नाही. त्यावर आता भाजपचे नरेंद्र सावईकर यांनी ‘नरकासुराला साक्ष ठेवून केलेली युती कशी टिकणार?’ अशा आशयाची फेसबुकवर मल्लीनाथी केली आहे. अशी महायुती न झाली याचा आनंद भाजपाला हाेणे साहजिकच. पण भाजपात असलेल्या नरकासुरावर कोण अंकुश आणणार? याचे उत्तर सावईकरांकडे आहे का?
पाटकर यांच्यावर खापर
कॉंग्रेस आरजी सोबत आघाडी करू न शकल्याचे खापर आता प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यावर फोडण्यात येत आहे. आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनीच तसे म्हटले आहे. कॉंग्रेसचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासोबत सौदार्हपूर्ण चर्चा झाली पण पाटकर यांनी मोडता घातल्याचे मनोज यांचे म्हणणे आहे. त्यांनी आता पाटकर यांना बदला असा नवा मुद्दा पुढे आणला आहे. याआधी पाटकर यांना केवळ पक्षांतर्गत नाराजांकडून होणाऱ्या अशा मागणीला तोंड द्यावे लागत होते, आता पक्षाबाहेरूनही तशी मागणी होऊ लागल्याने पाटकर हेच अधिक सक्षम होत जातील, अशी चर्चा आहे.
मनोज अन् पत्रकार परिषद
आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी आपल्या पक्ष कार्यालयात युती धर्म कसा पाळला गेला नाही. आपला विश्वासघात कसा केला ? याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. दुपारी बारा वाजता सुरू झालेली पत्रकार परिषद तब्बल दुपारी २ वाजेपर्यंत चालली. परंतु अशी तासनतास परिषद घेण्याची ही परब महाशयांची पहिलीच वेळ नाही... यापूर्वी २.३० तास पत्रकार परिषदेत बोलण्याचा विक्रम त्यांनी केल्याची चर्चा देखील आहे... एकंदरीत जे पत्रकार परिषद म्हणजे प्रचार सभा नव्हे, हे या प्रादेशिक पक्षाच्या सूज्ञ नेत्याला कळत कसे नाही ? अशी चर्चा सध्या सुरू आहे... सर्वाधिक काळ पत्रकार परिषदेत बोलणारा नेता म्हणून मनोज परब यांच्या नावाची नोंद निश्चित होणार असल्याची चर्चाही सुरू आहे.
दीपकना विश्वास नाही?
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप–मगो युती झाल्यानंतर मगोच्या दोन आमदारांनी जितक्या जागा मागितल्या, तितक्या भाजपकडून मिळाल्याचे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मगो पक्षाकडे पैसे नसल्यामुळे आम्हाला जास्त उमेदवार नको आहेत असे म्हणतानाच, समजा आम्ही जास्त उमेदवार घेतले तर त्यांना फोडण्यात येणार नाही कशावरून? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि काँग्रेसच्या आठ फुटीर आमदारांचाही संदर्भ दिला. यातून आम्ही राजकारणासाठी युतीत आहे पण आमदार, उमेदवार फोडण्याबाबत मात्र आमचा तुमच्यावर विश्वास नाही, असे दीपक यांना भाजपला सांगायचे असेल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मांद्रेत ‘त्या’ उमेदवाराची चर्चा
जिल्हा पंचायत निवडणुकीत हरमल मतदारसंघातील लढतीकडे सध्या अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. मोठी आर्थिक ताकद असलेला उमेदवार त्या मतदारसंघातून आपले नशिब आजमावत आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून ही सारी तयारी सुरू असल्याचे दिसून येते. समाज बांधव मिळवावा हे ब्रीद आहेच. या अनुषंगाने पेडण्यात हुबळी दौऱ्यावर कोण कोण गेले होते, याची चर्चा सुरू आहे. त्या दौऱ्यात सहभागी झालेल्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्याचे सांगण्यात येते. आता जिल्हा पंचायतीला एवढे तर विधानसभेला काय, असा हिशेबही काहीजण आताच करू लागले आहेत.
केंद्राकडून कानपिचक्या?
हडफडे येथे झालेल्या अग्नितांडवानंतर कुणाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत तर ती गोव्यातील सत्ताधारी भाजप पक्षाची. गोव्यात भ्रष्टाचार माजला असून त्यामुळेच सगळीकडे मनमानी चालू आहे, असा आरोप विरोधक करत होते. मात्र हडफडे येथील या दुर्घटनेने यावर शिक्कामोर्तब केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामुळे भाजपचे नाव फक्त गोव्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही खराब झाले आहे. भाजपचे सरकार असताना पैसे फेकले तर काहीही होऊ शकते अशा आशयाचा एक संदेश संपूर्ण देशात गेला आहे. त्यामुळे भाजपच्या ‘न खाऊंगा, न खाने दुगाँ’ या प्रतिमेवर गंभीर असे प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. याची दखल म्हणे केंद्र सरकारनेही घेतली आहे. त्यामुळेच गोव्यात कारवाई जलदगतीने सुरू केलेली आहे. केंद्रीय नेते गोव्यातील नेत्यांना कानपिचक्या देणार का? आणि त्यामुळे गोव्यातील नेते सुधारणार का? सध्या सामाजिक माध्यमावर याचीच चर्चा मोठ्या प्रमाणावर चालू आहे.
परब कुणाला झुलवताहेत?
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्यूशनरी गोवन्स (आरजी) या तीन पक्षांमध्ये युतीची चर्चा सुरू असतानाच ‘आरजी’चे अध्यक्ष मनोज परब यांनी सोशल मीडियावरून आपला आणि आमदार वीरेश बोरकर यांचा विमानातील एक फोटो शेअर केला. शिवाय आम्ही युतीच्या चर्चेसाठी दिल्लीला जात असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्यानंतर आमदार बोरकर यांनी आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेलो होतो, असे स्पष्ट केले. या राजकारणात मनोज आणि वीरेश ‘आप’च्या वरिष्ठांशी चर्चेला गेल्याचा कयासही काही जणांनी बांधला होता. पण, आता मात्र आम्ही दिल्लीला गेलोच नव्हतो. सोशल मीडियावर जुना फोटो शेअर केला होता, असे स्पष्टीकरण मनोज परब देत आहेत. यातून ते नेमके कुणाला झुलवत आहेत? आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना की, ‘आरजी’ला मते देणाऱ्या मतदारांना? असाही प्रश्न अनेकजण विचारू लागले आहेत.
देसाई, प्रभुदेसाईंचा मार्ग कोणता?
जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचे जाहीर समर्थन केल्याबद्दल पार्से येथील देवेंद्र प्रभुदेसाई व प्रदीप देसाई या चुलत बंधूंना कॉंग्रेसने आपली कवाडे अपेक्षेप्रमाणे बंद केली. मांद्रेत २०२७ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक रंगतदार ठरणार आहे. त्यासाठी अनेकजण तयारी करत आहेत. काहींनी त्यासाठी अनेकांचा आग्रह असूनही जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. देवेंद्र हे अलिकडे बरेच सक्रीय झाले होते. त्यांना पाठींबाही मिळत होता. यामुळे त्यांचा पुढील मार्ग कोणता यावर मांद्रेतील राजकीय समीकरणे अवलंबून असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
देसाई, प्रभुदेसाईंचा मार्ग कोणता?
जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचे जाहीर समर्थन केल्याबद्दल पार्से येथील देवेंद्र प्रभुदेसाई व प्रदीप देसाई या चुलत बंधूंना कॉंग्रेसने आपली कवाडे अपेक्षेप्रमाणे बंद केली. मांद्रेत २०२७ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक रंगतदार ठरणार आहे. त्यासाठी अनेकजण तयारी करत आहेत. काहींनी त्यासाठी अनेकांचा आग्रह असूनही जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. देवेंद्र हे अलिकडे बरेच सक्रीय झाले होते. त्यांना पाठींबाही मिळत होता. यामुळे त्यांचा पुढील मार्ग कोणता यावर मांद्रेतील राजकीय समीकरणे अवलंबून असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
‘आयपीएस’ सरकार चालवतात का?
हडफडेतील त्या क्लबमधील अग्नितांडव व त्यात पंचवीस जणांचा मृत्यु झाल्यानंतर आता त्या क्लबबाबतचे अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे यापुढे आणखी किती गाडले गेलेले सांगाडे बाहेर येतील, त्याबाबत आडाखे बांधले जाऊ लागलेत. सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती त्या क्लबवरील कारवाई रोखण्यासाठी प्रयत्नरत एका माजी आयपीएस अधिकाऱ्याची. त्यामुळे गोव्यातील सरकार स्थानिक नेते चालवतात की, बाहेरून आलेले आयपीएस अधिकारी असे सवालही समाजमाध्यमांवर केले जाऊ लागले असून त्यामुळे स्थानिक राज्यकर्त्यांसाठी सदर क्लबचे प्रकरण अवघड जागेचे दुखणे ठरू लागले आहे खरे. सदर माजी आयपीएस अधिकाऱ्याने म्हणे या क्लबवरील कारवाई रोखली होती, तशा सूचना स्थानिक पोलिसांना केल्या होत्या. आता सरकारने नियुक्त केलेली तपास समिती याची दखल घेईल का? अशी विचारणाही होऊ लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.