

फोंडा: बेतकी-खांडोळा हा जिल्हा पंचायत मतदारसंघ प्रियोळ विधानसभा क्षेत्रात येतो. सातपैकी पाच पंचायतींचा समावेश त्यात असल्याने या मतदारसंघाला विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भोम-अडकोण, तिवरे-वरगाव, वळवई, केरी, बेतकी-खांडोळा या पंचायतींचा त्यात समावेश आहे. दरम्यान, युती असलेले भाजप आणि मगो हे दोन पक्ष आमनेसामने आले आहेत.
सध्या हा मतदारसंघ भाजपकडे आहे. आमदार गोविंद गावडे यांचे कट्टर समर्थक श्रमेश भोसले हे विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य आहेत. भाजपने यावेळीही भोसले यांच्यावरच विश्वास ठेवला आहे. मात्र भोम येथील विद्यमान सरपंच तथा मगोचे नेते सुनील भोमकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा करताच या लढतीत मोठी रंगत आली आहे. स्थानिक पातळीवर त्यांचे बळ वाढल्याचे दिसत आहे.
मगो-भाजप युती असली तरी भोम पंचायतीत नुकत्याच झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर भोमकरांच्या समर्थकांची उभारी मोठी असल्याचे त्यांच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी दिसून आले. भोमकर यांच्या सभोवती मगो कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसल्याने ही लढत फक्त भोसले-भोमकर इतकीच मर्यादित राहिलेली नाही. विशेषतः या पाच पंचायत क्षेत्रात मगोचा प्रभाव असल्याने भोमकरांची उमेदवारी भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, अशी चर्चा आहे.
दरम्यान, भाजपनेही प्रचाराला वेग दिला आहे. आमदार गोविंद गावडे स्वतः उमेदवाराबरोबर मतदारांच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे विरोधकांच्या गोटात शांतता असली तरी बेतकी-खांडोळा पंचायतीचे माजी पंचसदस्य आणि ‘आप’चे माजी सहसचिव तसेच प्रियोळमधील मागील विधानसभा लढतीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार नोनू नाईक यांनी ‘परिवर्तनासाठी सज्ज व्हा’ असे फलक लावून रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे.दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप-मगो संघर्ष टाळता येणार नाही, हे चित्र अधिक ठळक झाले आहे. या लढतीची अंतिम परिणती २२ डिसेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे.
गावडे विरुद्ध ढवळीकर सामना!
बेतकी-खांडोळा झेडपी निवडणुकीकडे आगामी प्रियोळ विधानसभा निवडणुकीची ‘नांदी’ म्हणून पाहिले जात आहे. सध्या प्रियोळ हा मतदारसंघ भाजपकडे असला तरी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांची या मतदारसंघावर विशेष नजर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ढवळीकर यांचा फक्त २१३ मतांनी पराभव झाला होता.
त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत ते असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सुनील भोमकर हे ढवळीकरांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यामुळे बेतकी-खांडोळ्याची झेडपी निवडणूक म्हणजे आमदार गोविंद गावडे विरुद्ध दीपक ढवळीकर यांच्यातील लढतीची ‘रंगीत तालीम’ ठरण्याची शक्यता आहे.
विरोधकांमध्ये ‘आरजी’चा प्रभाव अधिक
काँग्रेस-गोवा फॉरवर्ड-आरजी युतीचा संभाव्य उमेदवार नोनू नाईक असू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. मात्र युतीने अद्याप आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. ‘आप’ची भूमिकाही स्पष्ट नाही. तरीही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा निर्धार नाईक यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रियोळ मतदारसंघातील मतदारसंख्येचे चित्र पाहता विरोधकांमध्ये ‘आरजी’चा प्रभाव सर्वाधिक दिसून येतोय. त्यावेळी काँग्रेसला ३०३, ‘आप’ला २४५ तर ‘आरजी’ला तब्बल २५१७ मते मिळाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.