

कुर्टी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत यावेळेला उमेदवार प्रितेश गावकर यांच्या प्रचारासाठी दोन्ही रवी पुत्रांनी कंबर कसली आणि दोन्ही बंधूंनी बहुतांश ठिकाणी एकत्रित प्रचार केला. प्रितेश गावकर हे रवी पुत्र रितेश नाईक यांच्या जवळचे असून यावेळेला कुर्टीत भाजपचा झेंडा उभारायचाच, असा निर्धार रितेश नाईक यांनी केला आणि त्यासाठी कार्यरत राहिले. कुर्टी जिल्हा पंचायतक्षेत्रातील डोंगरावरील अवघड वाटा तुडवताना मतदारांशी रितेश नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत संपर्क साधला, तेव्हा रवी पात्रावच आल्याचा भास आम्हाला झाला, असे बहुतांश मतदारांनी बोलून दाखवले. एनकेनप्रकारेण रवी पुत्र रितेश आणि रॉय यांनी एकत्रित प्रचार करून आम्ही दोघे बंधू एकसंध आहोत, उगाच कुणीतरी वावड्या उठवत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका, असा अप्रत्यक्षरित्या इशाराच दिला. ∙∙∙
मागच्या आठवड्यात खोल मतदारसंघात भाजप उमेदवार तेजल पागी यांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची बैठक ठेवण्यात आली होती. मात्र या बैठकीला फारसे लोक उपस्थित नसल्याने शेवटी ही बैठक रद्द करण्यात आली असे सांगितले जाते. वास्तविक खोल मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचे पारडे जड असे सांगितले जात होते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बैठकीला लोकच आले नाहीत याचा राजकीय अर्थ काय बरे असेल? ∙∙∙
जिल्हा पंचायतीच्या उमेदवारीसाठी एका आमदाराने मोठ्या आत्मविश्वासाने दोन महिलांना बोलावलं. तुम्हालाच उमेदवारी देतो, कार्यकर्त्यांना घेऊन अर्ज भरा, असा शब्दही दिला. कार्यकर्ते खूश, महिलांच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य, आणि सगळं सेट वाटत असतानाच... प्लॅन बदलला! अर्ज भरायची वेळ आली आणि आमदारांनी थेट तिसऱ्याच नावाची घोषणा केली. त्या क्षणी महिला आणि कार्यकर्ते गप्प बसले, आमदार आहेत म्हटल्यावर तोंड उघडणं अवघडच! पण राजकारणात ‘गप्प’ म्हणजे ‘गेम ओव्हर’ नसतं, हे आमदार विसरले बहुतेक. आता निवडणूक जवळ येताच त्या नाराज गटाने आपला पाठिंबा शांतपणे काढून घेतला आणि थेट अगदी नवख्या, अनपेक्षित महिलेला बाहेरून पाठिंबा जाहीर केला. यामुळे आमदारांना बसलेला धक्का चेहऱ्यावर लपवता आला नाही, अशी चर्चा आहे. सध्या मतदारसंघात एकच प्रश्न फिरतोय, ‘ती महिला कोण?’ उमेदवारी जाहीर करण्याआधी शब्द पाळले नाहीत, तर मतदानाच्या दिवशी ‘शब्द’च फिरतात, असे मतदार आता बोलू लागलेत. ∙∙∙
उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी ‘एक्स''वर एक पोस्ट केली आहे. त्यात शीर्षक ‘गोव्यातील कायद्याच्या राज्याची स्थिती’ असे असून, त्याखाली ‘बर्च बाय रोमिओ लेन'' या नाईट क्लबच्या प्रवेशद्वाराबाहेर पहारा करणाऱ्या पोलिसांच्या पोस्ट खाली आयएएस अधिकाऱ्यांची गाडी अडवल्याच्या घटनेविषयी मतप्रदर्शन आहे. त्यात म्हटले आहे की, ‘गोव्यात आयएएस अधिकाऱ्याची गाडी थांबवल्याबद्दल पोलिसांना उठाबशा काढायला लावल्या. ‘उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी एका तपासणी नाक्यावर आयएएस अधिकाऱ्याची गाडी अडवल्याबद्दल पोलिसांना उठाबशा काढायला लावल्याचा आरोप आहे. तपासणीदरम्यान, त्या अधिकाऱ्याने आपला परवाना दाखवण्यास नकार दिला आणि तो तेथून निघून गेला. नंतर तो रागाने परत आला, गाडीतील वस्तू रस्त्यावर फेकल्या आणि म्हणाला, ‘आता गाडी तपासा.’ त्यानंतर त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, ज्यानंतर पोलिसांना शिक्षा करण्यात आली.’ अशी ही पोस्ट आहे. उत्पल यांना जे काय म्हणायचे आहे, ते नक्कीच राजकर्त्यांना आणि सत्ताधाऱ्यांना समजले असणार आहे. ∙∙∙
जिल्हा पंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच हळदोणा मतदारसंघातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्याची बातमी काहीच दिवसांपूर्वी उत्तर गोव्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले होते. परंतु, काँग्रेसचे हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी मात्र ही बातमीच खोटी असल्याचे आणि भाजपने ती जाणीवपूर्वक पसरवली असल्याचा दावा केला आहे. ज्यांनी भाजपात प्रवेश केल्याचा फोटो भाजपने व्हायरल केला, त्या फोटोत दिसणारे सगळेच सुरुवातीपासूनच भाजपचे सदस्य होते आणि हे सर्वांनाच माहीत होते. त्यांना काँग्रेसमधून भाजपात आणल्याचे भासवून भाजप जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. फेरेरांच्या या दाव्यानंतर हळदोण्यातील मतदार भाजपने व्हायरल केलेला फोटो पुन्हा पुन्हा पाहात त्यातील चेहरे भाजपात होते की काँग्रेसमध्ये? याचा शोध घेत आहेत. ∙∙∙
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे ‘पक्षांतरा’च्या मुद्द्यावर ठाम आहेत. याच मुद्द्यावरून गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसमध्ये बराच खल झाला. परंतु काँग्रेसचे नेत्यांनी पक्षांतर करून येणाऱ्या नेत्यांना उमेदवारी न देण्याचा आणि काँग्रेसच्या गोटातूनच उमेदवार शोधण्याविषयी खासदार विरियातो यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ आणि भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या उमेदवारांच्या मतप्रदर्शनाचे व्हिडिओ जोडून आता व्हायरल होत आहेत. एकीकडे पाटकर पक्षातील आणि पक्षाबाहेरील आव्हांनांना तोंड देऊन पक्षाचे काम पुढे नेत आहेत, पण गिरदोलीच्या जिल्हा पंचायत जागेवरून सध्या पक्षातीलच जुने कार्यकर्ते कार्यकारिणीच्या कामावर बोट ठेवू लागले आहेत. जिल्हा पंचायत निवडणूक प्रचारात हाच मुद्दा अधिकतर चर्चिला गेला आहे, त्यावरूनच काँग्रेसच्या विरोधात व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंवा केले जात आहेत. एकंदर सध्या काँग्रेसची कोंडी झाली आहे, हे यावरून दिसते. ∙∙∙
‘कोणाच्या म्हशी आणि कोण काढतो उठाबशी’ ही म्हण आपल्या राज्यातील पोलिसांना परवाच्या एका घटनेमुळे चांगलीच समजली असणार. जिल्हा पंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे संपूर्ण गोव्यात ‘हाय अलर्ट’ आहे. निवडणूक आयोगाने रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी खास पथके तैनात केली आहेत. सांताक्रूझ भागात काही पोलिसांनी बंदोबस्ताचा वेळी एका मोठ्या पदावर असलेल्या आयएएस अधिकाऱ्याच्या वाहनाची तपासणी केली म्हणून त्यांना म्हणे मोठ्या साहेबांना उठाबशा काढण्याची सजा फर्मावली. खरे म्हणजे चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावणाऱ्या त्या पोलिसांना साहेबांनी बक्षीस देणे गरजेचे होते. बड्या अधिकाऱ्याच्या गाडीची तपासणी केली तर त्यात गैर ते काय आहे? मिळालेल्या पदाची घमेंड दाखवणे व सामान्य पोलिस कर्मचाऱ्यांना नाहक शिक्षा देणे अशा गोष्टींना लोकशाहीत स्थान नसते, हे त्या पोलिस अधिकाऱ्याला व आयएएस अधिकाऱ्यांना कळायला हवे. देशातली ‘व्हीआयपी’ संस्कृती बंद होण्याची गरज आम जनता व्यक्त करतेय! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.