Goa ZP Election: कुर्टीमुळे फोंड्यात नवी समीकरणे! हरमलमध्‍ये आणले सौभाग्‍यवतींना पुढे; जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी

Goa Zilla Panchayat reservation: फोंडा मतदारसंघातील एकमेव कुर्टी जिल्हा पंचायत (झेडपी) मतदारसंघ यावेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे.
Election
ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंडा मतदारसंघातील एकमेव कुर्टी जिल्हा पंचायत (झेडपी) मतदारसंघ यावेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आगामी झेडपी निवडणुकीवरच नव्हे तर फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीवरही परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कुर्टी झेडपीमध्ये कुर्टी-खांडेपार पंचायतीचा समावेश असून हा मतदारसंघ फोंडा विधानसभा क्षेत्राच्या जवळपास ५० टक्के भाग व्यापतो. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.

मगो पक्षाच्या विद्यमान झेडपी सदस्या प्रिया च्यारी या यावेळी आरक्षणामुळे निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यामुळे भाजप-मगो गटातील गणिते बदलणार आहेत. अनेक इच्छुकांच्या आशा धुळीस मिळाल्याने नवीन समीकरणे तयार होण्याची हालचाल सुरू झाली आहे.

दरम्यान, फोंड्यात लवकरच होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या झेडपी निवडणुकीकडे ‘सेमी फायनल’ म्हणून पाहिली जात आहे. भाजपकडून या निवडणुकीत पूर्ण ताकद पणाला लावली जाणार असल्याचे बोलले जातेय.

भाजपला मगोची साथ मिळण्याची शक्यता असल्याने पक्षाचा पगडा जड राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फोंड्याचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर भाजपची उमेदवारी ठरविण्याची जबाबदारी नगरसेवक विश्‍‍वनाथ दळवी आणि गटाध्यक्ष हरेश नाईक यांच्यावर येणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे दळवी यांचा सल्ला या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून माजी सरपंच जॉन परेरा आणि कार्यकर्ते प्रवीण बोंद्रे ही नावे चर्चेत होती; मात्र आरक्षणामुळे दोघेही स्पर्धेबाहेर गेले आहेत. त्यामुळे पक्षाला आता नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

प्रियोळ मतदारसंघातील वेरे-वाघुर्मे पंचायत या झेडपी क्षेत्रात असली तरी तिथे हालचाली अद्याप शांत आहेत. त्यामुळे उमेदवार कुर्टी-खांडेपार पंचायतीतूनच असण्याची शक्यता अधिक आहे. आमदार गोविंद गावडे यांची भूमिकाही अद्याप स्पष्ट झालेली नाही. आगामी आठ-दहा दिवसांत चित्र स्पष्ट होईल, एवढे मात्र निश्चित आहे.

आरक्षणामागे राजकारण?

कुर्टी झेडपी अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यामागे राजकीय हेतू असल्याची चर्चा फोंड्यात रंगली आहे. गेल्या वेळी हा मतदारसंघ इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित होता. आता अनुसूचित जातीसाठी राखीव असल्‍याने विद्यमान झेडपी प्रिया च्यारी या निवडणुकीबाहेर पडल्या आहेत. मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांच्या त्या निकटवर्तीय असल्याने हा निर्णय भाटीकरांना राजकीय शह देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

सांकवाळ, कुठ्ठाळीत धावपळ

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी कुठ्ठाळी मतदारसंघाचा महिला आरक्षणातून सर्वसाधारण गटात तर सांकवाळ मतदारसंघाचा सर्वसाधारण गटातून महिला आरक्षणात समावेश करण्यात आल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. भाजप, काँग्रेस, ‘आप’ तसेच अपक्ष उमेदवार आपापले डावपेच आखू लागले आहेत.

२०२०च्या निवडणुकीत सांकवाळ मतदारसंघातून भाजपच्या अनिता थोरात या पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या पाठिंब्यामुळे बिनविरोध निवडून आल्या होत्या. सध्या त्या दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष आहेत. येणाऱ्या निवडणुकीतही अनिता थोरात भाजपच्या उमेदवार असतील, असे गुदिन्हो यांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात स्पष्ट केले.

अनिता थोरात यांनी जिल्हा पंचायत निधीचा योग्य वापर करून सांकवाळ मतदारसंघात अनेक विकासकामे केली असल्याचा दावा गुदिन्हो यांनी केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना पुन्हा पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या वेळी बिनविरोध निवडणुकीची शक्यता कमी असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस, आप व अपक्ष उमेदवार मैदानात उतरतील अशी शक्यता आहे.

कुठ्ठाळी मतदारसंघात २०२०मध्ये आमदार आंतोनियो वाझ यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. त्यांना ५८५५ मते मिळाली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी जिल्हा पंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी मर्सियना वाझ यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला. त्यांना भाजपचा पाठिंबा होता. पती आमदार आंतोनियो वाझ यांच्या सहकार्याने त्‍यांनी काही विकासकामे केली आहेत.

हरमलमध्‍ये अनेकांनी आणले सौभाग्‍यवतींना पुढे!

जिल्हा पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर हरमल मतदारसंघात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्‍या आहेत. हा मतदारसंघ यंदा महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक इच्‍छुकांनी आपापल्‍या सौभाग्‍यवतींना निवडणुकीच्‍या रिंगणात उतरविण्‍याची तयारी सुरू केली आहे.

गेल्या दोन कार्यकाळात हा मतदारसंघ खुल्या गटासाठी तर एकदा ओबीसीसाठी राखीव होती. मात्र यंदा महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक पुरुष इच्छुकांची ‘विकेट’ गेली असून त्यांनी आपल्या अर्धांगिनींना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

या मतदारसंघात कोरगाव, हरमल, केरी-तेरेखोल आणि पालये या चार पंचायतींचा समावेश आहे. एकूण मतदारसंख्या सुमारे १६ हजार असून पुरुष आणि महिला मतदार जवळपास समसमान आहेत. मागील निवडणुकीत कोरगावचे रंगनाथ कलशावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपचे अनंत गडेकर यांचा पराभव केला होता.

भाजपच्या तिकिटासाठी हरमलच्या माजी सरपंच मनीषा कोरकणकर यांनी दावा केला आहे. आमदार दयानंद सोपटे यांच्या सहकार्याने त्यांनी सरपंचपदाच्या काळात अनेक विकासकामे हाती घेतली होती. त्यांचे पती संतोष कोरकणकर हे भाजपचे माजी मंडळ पदाधिकारी असून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहेत. कोरगावचे उद्योजक आणि कमलेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन श्याम शेट्ये यांच्या पत्नी श्रुतिका शेट्ये यांनीही निवडणुकीची तयारी दर्शवली आहे. त्या म्हणाल्या, कोरगावच्या क्रीडा संकुलाचा लाभ सर्वसामान्य क्रीडापटूंना मिळावा यासाठी मी प्रयत्न करीन.

शिवाय भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या व कोरगावच्या माजी सरपंच स्वाती गवंडी यांनाही उमेदवारीची अपेक्षा आहे.

Election
Goa ZP Election: बहुतांश ठिकाणी ‘झेडपीं’ची पळापळ सुरू, डिचोली वाढणार रंगत; पेडणे तालुक्यातून अनेकांचा पत्ता कट!

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या पत्नी ॲड. सिद्धी

आरोलकर यांना हरमल (महिला) किंवा मोरजी (ओबीसी) या दोन मतदारसंघांपैकी एकीकडून निवडणूक लढवण्याची संधी मिळू शकते. त्यांचे पती मगो पक्षात असल्याने त्या युतीकडून उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जाते. तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते ॲड. अमित सावंत यांच्या पत्नीही कोरगाव क्षेत्रातील असून त्या देखील मैदानात उतरू शकतात.

Election
Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

सध्याचे ‘झेडपी’ आणि राजकीय समीकरणे

सध्याचे झेडपी सदस्य रंगनाथ कलशावकर यांनी चारही पंचायतींमध्ये विकासकामे केली असून त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अनेक इच्छुक प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर कलशावकर यांनी अन्य मतदारसंघांतून उमेदवारी मिळवण्याची शक्यता नाकारलेली नाही. महिलांसाठी राखीव जागेमुळे अनेक पुरुष इच्छुकांना माघार घ्यावी लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com