Goa ZP Election: पेडण्‍यात भाजपची जोरदार चाचपणी! बेतकी-खांडोळ्‍यात चुरशीची शक्‍यता; रिवणमध्‍ये गावकरचे नाव चर्चेत

Goa Zilla Panchayat Election: दरम्‍यान, पेडणे तालुक्यातील चारही जिल्हा पंचायत मतदारसंघांत भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस वाढली आहे.
Election
ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत पेडणे तालुक्यातील चार मतदारसंघांचा समावेश आहे. या चारही ठिकाणी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. पक्षाच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांपासून ते माजी आमदारांपर्यंत सर्वजण चारही मतदारसंघांत भाजपचेच उमेदवार निवडून यावेत या ध्येयाने एकत्र काम करत आहेत.

निवडण्यासाठी चाचणी आणि चर्चा प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांची नोंद घेतली जात असून, अंतिम उमेदवारांची घोषणा लवकरच अपेक्षित आहे.

या निवडणुकीत पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी संघटन मजबुतीसाठी पुढाकार घेतला आहे. विशेषतः सोपटे यांचा धारगळ, मोरजी आणि हरमल मतदारसंघात दांडगा संपर्क असल्याने, या ठिकाणी त्यांच्या समर्थक उमेदवारांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, विद्यमान मगो आमदार जीत आरोलकर हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय असल्याने, सत्तारूढ पक्षाशी ताळमेळ राखत त्यांनी यावेळी स्वतःचे उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दरम्‍यान, पेडणे तालुक्यातील चारही जिल्हा पंचायत मतदारसंघांत भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस वाढली आहे. त्‍यामुळे भाजप विरुद्ध भाजप अशीच प्राथमिक स्‍पर्धा रंगू लागली आहे.

भाजपचे संभाव्य उमेदवार

धारगळ : माजी सरपंच भूषण नाईक, माजी सरपंच तथा उद्योजक प्रमोद साळगावकर, विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर.

मोरजी : माजी सरपंच संजीवनी बर्डे, प्राजक्ता कान्नाईक, एकता चोडणकर, तारा हडफडकर, स्नेहा तिळोजी.

हरमल : माजी सरपंच मनीषा कोरखणकर, माजी सरपंच स्वाती गवंडी.

तोरसे : जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, माजी सरपंच प्रार्थना मोटे, पत्रकार महादेव गवंडी, संजना परब.

तीन-चार दिवसांत जाहीर करणार उत्तरेतील उमेदवार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी येथील भाजप उत्तर गोवा जिल्हा कार्यालयात पक्षाची बंद दाराआड बैठक झाली. त्‍यात उत्तर गोव्यातील २५ जागांवर भाजप उमेदवार निश्चितीसाठी सविस्तर चर्चा झाली. येत्या तीन-चार दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार प्रेमेंद्र शेट, दत्ता खोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्येकर, प्रेमानंद म्हांबरे, दयानंद कारबोटकर आदी नेते मंडळी उपस्थित होती.

दामू नाईक म्हणाले, भाजपमध्‍ये लोकशाही मार्गाने उमेदवारांची निवड केली होते. स्थानिक पातळीवरून आलेल्या नावांवर बैठकीत चर्चा झाली. त्‍यातील बहुतांश नावांवर सर्वांनुमते एकमत झाले. येत्या तीन ते चार दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.

दरम्‍यान, या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्य, उत्तरेतील आमदार, सरपंच, पंच, मंडळाध्यक्ष, जि. पं. सदस्य व पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

बेतकी-खांडोळ्‍यात चुरशीची शक्‍यता

बेतकी-खांडोळा जिल्हा पंचायत मतदारसंघात मगो-भाजप युतीचे श्रमेश भोसले पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. तर त्यांच्या विरोधात भोम-अडकोणचे सरपंच सुनील भोमकर अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत.

सुनील भोमकर हे चार वेळा पंच म्हणून निवडून आले असून तीन वेळा सरपंचपद, तर एकदा उपसरपंचपद भूषविले आहे. जनसंपर्क, सामाजिक कार्य आणि विकास उपक्रमांतील त्यांच्या सक्रियतेमुळे ते जनतेच्या परिचयाचे झाले आहेत. दुसरीकडे युतीचे उमेदवार श्रमेश भोसले यांना पक्षीय पाठिंबा नक्की किती प्रमाणात मिळेल, याबाबत साशंकता आहे.

कारण भोम-अडकोण पंचायतीत नुकताच सत्ताबदल झाला असून तिवरे-वरगाव पंचायतीतही सरपंच-उपसरपंचांवर अविश्वास ठरावाची टांगती तलवार आहे. खांडोळ्यातही यापूर्वी अविश्वास ठरावाचे राजकारण गाजले होते. त्यामुळे या तिन्ही पंचायतींच्या राजकीय घडामोडींनी मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

सुनील भोमकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे जुने कार्यकर्ते असले तरी यावेळी ते अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा विचार करत आहेत. कारण प्रियोळ मतदारसंघात भाजपचा आमदार असून, मगो-भाजप युतीचा उमेदवार जवळपास निश्चित झाल्याने ते स्वतंत्र लढाईचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Election
Goa ZP Election: 'युतीचा निर्णय उद्या होणार', जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज; 50 मतदारसंघांतून अर्ज दाखल

रिवणमध्‍ये भाजप उमेदवारीसाठी गावकरचे नाव चर्चेत

रिवण जिल्हा पंचायत मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी राखीव असल्‍याने या समाजातील अनेक इच्‍छुक महिला आणि युवती पुढे येऊ लागल्या आहेत. त्‍यात वाडे-कुर्डी पंचायत क्षेत्रातील वसाहत क्रमांक एकमधील पदवीधर युवती तेजस्विनी लक्ष्मण गावकर हिचे नाव विशेष चर्चेत आहे.

तेजस्विनी हिला भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी ग्रामस्थ आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. तसे झाल्‍यास वाडे-कुर्डी ग्रामपंचायतीला प्रथमच जिल्हा पंचायत पातळीवर प्रतिनिधित्व मिळणार आहे.

Election
Goa ZP Election: तोरसेत भाजपमध्ये गटबाजी, विरोधकांनी आखली रणनीती; सर्वपक्षीय उमेदवार ठरविण्‍यासाठी रविवारी खास बैठक

‘‘आतापर्यंत वाडे-कुर्डी भागातील जनतेला एकदाही अशी संधी मिळाली नाही’’ अशी खंत सरपंच चंदन उनंदकर यांनी व्यक्त केली. एसटी महिलांसाठी राखीवता आल्याने महिलांमध्ये राजकारणाविषयी आत्मविश्वास निर्माण झाला आहे. भाजपने उमेदवारी देताना पदवीधर असलेल्या तेजस्विनी गावकर हिच्‍या नावाचा विचार करावा, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com