Goa ZP Election: गुंता सुटेना! बैठक झाली तरी यादी जाहीर नाही! काँग्रेस हतबल; भाजपचे उर्वरित उमेदवार होणार जाहीर

Goa Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायत निवडणुकीत आघाडी करण्यासाठी गोवा फॉरवर्ड व रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षांनी घेतलेली ताठर भूमिका कॉंग्रेसला बोटचेपी भूमिका घेण्यास भाग पाडत आहे.
Goa Zilla Panchayat Election
Goa ZP ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीत आघाडी करण्यासाठी गोवा फॉरवर्ड व रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षांनी घेतलेली ताठर भूमिका कॉंग्रेसला बोटचेपी भूमिका घेण्यास भाग पाडत आहे. यामुळे प्रदेश निवडणूक समितीच्या बैठकीनंतरही उमेदवार जाहीर न करण्याइतपत कॉंग्रेस हतबल झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे, भाजपची उर्वरित उमेदवारांची यादी उद्या, मंगळवारी जाहीर होणार आहे.

पक्ष कार्यालयात सोमवारी काँग्रेसची उच्चस्तरीय समितीची सायंकाळी बैठक झाली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उमेदवारांची यादी रात्री प्रसारमाध्यमांना मिळेल, असे सांगितले. मात्र, उशिरापर्यंत काँग्रेसकडून उमेदवार यादी निश्चित झाली नसल्याने उद्या, मंगळवारी सकाळी ती जाहीर केली जाईल, असे पाटकर यांनी सांगितल्याने काँग्रेस पूर्णतः हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

गोवा फॉरवर्ड-आरजीपीशी युती जाहीर करण्यातही काँग्रेस अजूनही तळ्यात-मळ्यात करीत आहे. आरजीपीने ज्या जागांवर दावा सांगितला आहे, त्या जागांवर काँग्रेसची गोची होऊन बसली आहे.

त्यामुळेच युतीही जाहीर करता येईना आणि उमेदवार यादीही जाहीर करता येईना, अशा कात्रित काँग्रेस पक्ष सापडला आहे. भाजपने आपले पहिल्या टप्प्यातील १९ उमेदवार जाहीर केले, त्यांतर आम आदमी पक्षाने आत्तापर्यंत २९ उमेदवार जाहीर केले.

दरम्यान, एका बाजूला सत्ताधारी व विरोधातील आपने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. त्याशिवाय गोवा फॉरवर्ड हा युतीतील पक्षानेही आपल्या उमेदवारांचा प्रचार सुरू केला आहे, त्यांनी त्या जागा काँग्रेस आपल्या पक्षाला सोडणार, हे निश्चित धरून प्रचार सुरू केला आहे, हे स्पष्ट दिसते.

परंतु ‘आरजीपी’ ने जेथे दावा केला आहे, त्याच जागा काँग्रेससाठी कळीचा मुद्दा बनल्या आहेत. त्यावर तोडगा काढण्यात काँग्रेस नेत्यांना सोमवारपर्यंततरी यश आले नाही. परंतु आता आरजीपीने मागितलेल्या जागांविषयी पक्षाचे नेते वरिष्ठांशी चर्चा करूनच मंगळवारी यादी जाहीर करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसचे ज्याठिकाणी प्राबल्य आहे, त्याठिकाणी इच्छुक उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. यावरून युतीच्या जागा वाटपाचाच मुद्दा यादी जाहीर करण्याआड असल्याचे स्पष्ट आहे. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रभारी सचिव अंजली निंबाळकर यांनी जिल्हा पंचायत उमेदवार निवडीविषयी सर्वस्वी निर्णय पक्षाच्या उच्चस्तरीय समितीकडे सोपविला आहे.

लाटंबार्सेत भाजप विरोधात सर्वमान्य

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी लाटंबार्सेत भाजप विरोधात सर्वमान्य उमेदवार उभा करण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला असून, गत विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या उमेदवारीवर लढलेले साळ गावचे समाजकार्यकर्ते मेघ:श्याम राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवारी सायंकाळी साळ येथे घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत माजी आमदार नरेश सावळ यांनी मेघ:श्याम राऊत यांच्या नावाची घोषणा केली.

Goa Zilla Panchayat Election
Goa ZP Elections: 'कमळ' फुलवण्यासाठी 'त्रिसूत्री' रणनीती! मित्रपक्ष मगोसह अपक्षांनाही संधी; मुख्यमंत्र्यांना विजयाची खात्री

‘आप’ची तिसरी यादी; आत्तापर्यंत २९ जणांची नावे निश्चित

आम आदमी पक्षाने सोमवारी आणखी सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आत्तापर्यंत ‘आप’ने २९ उमेदवार जाहीर केले असून, उर्वरित २१ उमेदवार जाहीर होणे बाकी आहेत. उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येक २५ अशा एकूण ५० जागांवर ही निवडणूक होत आहे.

‘आप’ने सुरुवातीला १७, दुसऱ्या फेरीत आठ आणि आता तिसऱ्या फेरीत सात उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात शिवोलीतून डिओनिझिया जॉयसी फर्नांडिस बित्रो (बुना), चिंबल- मारिया ख्रिस्टालिना आंतो, सेंट लॉरेन्स- रतिष्मा विश्वजीत शिरोडकर, बार्से- संजिवी शशांक वेळीप, रिवोना- तेजस्विनी गावकर, धारबांदोडा- शशिकांत वेळीप, खोल- ॲड. समिक्षा खोलकर यांचा समावेश आहे.

 उमेदवारी जाहीर झालेल्या मतदारसंघांतून उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. याशिवाय काहीठिकाणी ‘आप’मध्ये पक्षप्रवेशही सुरू आहेत. त्याचबरोबर पक्षाचे दोन्ही आमदारांनी व पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारांसाठी प्रचारात सहभाग घेतल्याचे दिसत आहे.

Goa Zilla Panchayat Election
Goa ZP Election: 'हे राजकारण मान्य नाही!' कुर्टी-फोंडा जागेवरून केतन भाटीकर आक्रमक; भाजपला थेट इशारा

पहिला दिवस कोरा; एकही अर्ज नाही!

जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्‍याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. पण, सोमवारी राज्‍य निवडणूक आयोगाकडे एकही अर्ज दाखल झाला नाही. भाजप, आपने उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्‍या असल्‍याने मंगळवारपासून उमेदवारांकडून अर्ज भरण्‍यास सुरुवात होण्‍याची शक्‍यता आहे.

२०२७ मध्‍ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाणाऱ्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी २० डिसेंबरला मतदान होणार असून, निवडणुकीचा निकाल २२ डिसेंबर लागणार आहे. या निवडणुकीसाठी १ ते १० डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येतील आणि ११ रोजी अर्ज मागे घेता येईल, असे वेळापत्रक राज्‍य निवडणूक आयोगाने जारी केले होते.

भाजपच्यावतीने १९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यातील उर्वरित उमेदवारांची यादी उद्या, मंगळवारी जाहीर केली जाणार आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली त्या उमेदवारांची आज कार्यालयात बैठक झाली. आठ ते दहा जागांवर अपक्ष उमेदवारांना भाजप पाठिंबा देईल.

दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com