

पणजी: रोजगारासाठी विदेशात जाणाऱ्या गोमंतकीयांसमोर पिवळ्या तापावरील प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यामुळे नवे संकट उभे राहिले आहे. राज्यात गेल्या महिनाभरापासून लस उपलब्ध नसल्याने विदेशगमनाच्या तयारीतील नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
युरोप व आफ्रिकेतील काही देशांत जाणाऱ्या प्रवाशांना विदेशगमनापूर्वी किमान १० दिवस आधी ही लस घेणे आवश्यक असते. त्यामुळे लसीकरणाअभावी रोजगारासाठी जाणाऱ्यांचे प्रवासाचे नियोजन रखडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातील कसौली येथील केंद्रीय संशोधन संस्थेत या लसीचे उत्पादन होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने गोव्याला लस मिळालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, गोव्यात पणजी, मुरगाव आणि मडगाव येथे पिवळ्या तापाच्या लसीकरणाची अधिकृत व्यवस्था आहे. केंद्र सरकारच्या एकात्मिक आरोग्य तपासणी व बंदर आरोग्य व्यवस्थेच्या नोंदीनुसार पणजीतील अर्बन हेल्थ सेंटरमध्ये दर बुधवारी, मुरगाव येथील पोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये दर गुरुवारी, तर मडगाव अर्बन हेल्थ सेंटर, पाद्रे मिरांडा रोड, पाजीफोंड येथे दर शुक्रवारी लसीकरणाची सुविधा आहे.
प्रमाणपत्र आवश्यक
पिवळ्या तापाचा धोका असलेल्या देशांत जाणाऱ्या प्रवाशांना लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील काही देशांत रोजगारासाठी जाणाऱ्यांसाठी लस महत्त्वाची ठरते.
२७ ऑगस्टपर्यंत लस मिळण्याची शक्यता
आरोग्य सचिव यतींद्र मराळकर यांनी राज्यात लसीचा तुटवडा असल्याचे मान्य केले. आरोग्य सेवा संचालनालयाकडे पाठपुरावा सुरू असून, २७ ऑगस्टपर्यंत लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.