

पणजी: गोव्यातील हिवाळी पर्यटनाला सुरुवात झाली अजून, रविवारी रशियातून मॉस्को शहरातून दुसऱ्या आंतरराष्ट्रीय चार्टर विमानाचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले. एरोफ्लोटद्वारे संचालित या विमानातून २८५ हून अधिक प्रवासी गोव्यात दाखल झाले आहेत. याआधी याआधी रशियातील येकातेरिनबर्ग येथून पहिले चार्टर विमान गोव्यात आले होते. त्याद्वारे १६२ पर्यटक राज्यात आले आहेत. गोव्याच्या पर्यटनात रशियन पर्यटकांची संख्या महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे दरवर्षी रशियातून पर्यटकांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू असतात. मॉस्कोहून थेट विमानसेवा
सुरू झाल्याने रशियातील प्रमुख शहरांशी गोव्याची थेट हवाई वाहतूक अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील पर्यटन क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या २३ ऑक्टोबरपासून अल्माटी ते दाबोळी आणि ३० डिसेंबरपासून अस्ताना ते मोपा अशी नवी चार्टर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती पर्यटन संचालक केदार नाईक यांनी दिली. कझाकस्तानशी असलेली हवाई संपर्क व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी स्कॅट एअरलाईन्स अल्माटी ते दाबोळी चार्टर सेवा २३ ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे. ही सेवा २५ डिसेंबरपर्यंत आठवड्यातून दर शुक्रवारी चालवली जाईल.
त्यानंतर २९ डिसेंबर ते २ एप्रिल या कालावधीत ती आठवड्यातून दोनदा म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी कार्यान्वित राहील. याशिवाय एअर अस्ताना ही कंपनी ३० डिसेंबरपासून अस्ताना आणि मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी नवी सेवा सुरू करणार असून ती ३१ मार्चपर्यंत दर बुधवारी चालवली जाणार आहे.
‘‘जगभरातील अधिकाधिक पर्यटकांना गोव्याकडे (Goa) आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय चार्टर प्रोत्साहन कार्यक्रमाअंतर्गत दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे’’, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी रविवारी पत्रकारांना दिली. ‘‘देशी-विदेशी पर्यटकांना राज्याकडे आकर्षित करून पर्यटनाला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
पर्यटन हंगाम सुरू होण्याआधी पर्यटन खाते विविध देशांमध्ये रोड शो तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळावे, यासाठी प्रयत्न करते. विविध देशांतील पर्यटकांची चार्टर विमाने गोव्यात दाखल व्हावीत, यासाठी आंतरराष्ट्रीय चार्टर प्रोत्साहन कार्यक्रमाअंतर्गत दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे अधिकाधिक चार्टर विमाने गोव्यात दाखल होतील’’, असा विश्वास मंत्री खंवटे यांनी व्यक्त केला. दरम्यान, ‘‘या हंगामात रशिया, पोलंड आणि कझाकस्तानसोबत नवीन विमान संपर्क सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. तसेच, नोव्हेंबरपासून इंग्लंडमधूनही विमाने सुरू होतील’’, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.