

मुरगाव मतदारसंघातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत, ती समस्या आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. येत्या एप्रिल २०२६ पर्यंत मुरगावमधील पाणीटंचाई पूर्णपणे दूर केली जाईल, असं ठोस आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेत दिलं. ४४३ कोटी रुपये खर्चून राबवला जाणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रगतीपथावर असून, यामुळं तालुक्याच्या पाणी पुरवठ्यात मोठी सुधारणा होणार आहे.
विधानसभेच्या कामकाजादरम्यान मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी आपल्या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. अनेक भागांत अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याकडे त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री फळदेसाई यांनी आकडेवारीसह सविस्तर स्पष्टीकरण दिले. मुरगाव तालुक्याला दररोज ८१ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाण्याची आवश्यकता असते, त्यापैकी सध्या ७७ ते ७८ एमएलडी पाणी पुरवले जात असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
पाणी असूनही काही भागांत टंचाई का जाणवते, याचे कारण सांगताना मंत्री म्हणाले की, मुरगावचा बराचसा भाग हा डोंगराळ आणि उंचावर वसलेला आहे.
तांत्रिक कारणांमुळे उंचावर असलेल्या घरांपर्यंत पाणी पोहोचवताना अनेक अडचणी येतात. सध्या जो पाणीपुरवठा खंडित होतो, तो केवळ तांत्रिक बिघाडामुळे होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
सरकारने मुरगावसाठी ४४३ कोटी रुपयांचा विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन आधुनिक वाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुरगावसाठी एक स्वतंत्र जलकुंभ (रिझर्व्होअर) बांधला जात आहे. एप्रिल २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर उंचावरील भागांनाही पूर्ण दाबाने पाणी मिळेल. या प्रकल्पामुळे भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले असून, मुरगाववासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या संपूर्ण गोव्याची दैनंदिन पाण्याची गरज ७०० एमएलडी (दशलक्ष लिटर) इतकी आहे. मात्र, सध्याची यंत्रणा ६३० एमएलडी पाणी शुद्ध करून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. येत्या सहा महिन्यांत राज्याच्या पाणीपुरवठा क्षमतेत तब्बल ३२५ एमएलडीची मोठी भर पडणार असून, यामुळे पाणीटंचाईच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.