म्हापसा: आरोग्य क्षेत्रात (Health Department) परिवर्तन घडवून आणण्यास भाजप सरकार (BJP Government) कटिबद्ध आहे. म्हापशातील (Mapusa) जिल्हा इस्पितळ अद्ययावत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने आयसीयू (ICU) सुविधा येथे लवकरच सुरू होईल, अशी माहिती रूग्णालयाला भेट दिल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, हृदयविकारासंदर्भातील सर्व प्रकारच्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. केंद्र सरकार कोविडसंदर्भात गोव्याला 54 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याच्या मार्गावर आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गुरुवारी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील एकंदर कामकाजाची पाहणी करतानाच तेथील समस्यांबाबत काही कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच त्यांनी तेथील डॉक्टरांच्या सूचना जाणून घेऊन अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांशी समस्यांसंदर्भात चर्चा केली.
या वेळी इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती मुळगावकर, डॉ. स्वप्निल आर्सेकर, डॉ. महेंद्र घाणेकर, डॉ. सारिका आर्सेकर, डॉ. शामा शिरोडकर, डॉ. चेतना खेमानी, डॉ. वर्षा मुंज, डॉ. श्वेता गांधी व इतरांची उपस्थिती होती. आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या इस्पिळातील विविध विभागांची पाहणी केली व तेथील डॉक्टर व अधिकारिवर्गाकडून एकंदर कामकाजाबाबत व सध्या तिथे कोणत्या समस्या भेडसावत आहेत, हे जाणून घेतले. तेथील काही वैद्यकीय उपकरणे चालत नाहीत व फोनसेवाही खंडित असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
आरोग्यमंत्री राणे यांनी सर्वप्रथम त्यांनी सर्व वार्डना तसेच ओपीडी व ऑपरेशन थिएटरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी आययूआय (इंट्रायुटेरीन इंसेमिनेशन इनफर्टिलिटी ट्रीटमेंट युनिट), सीसीयू आणि आयसीयू या विभागांना भेट देऊन तेथील कामाच्या प्रगतीबाबत माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचीही पाहणी केली व त्यांच्या देखभालीसंदर्भात विविध सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी लसीकरण केंद्राची पाहणी केली. सुमारे एक तास ते त्या ठिकाणी होते.
पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, आज मी या ठिकाणी डॉक्टरांच्या काही सूचना जाणून घेण्यासाठी मुद्दामहून अचानक आलो आहे व त्या अनुषंगाने इस्पितळाच्या कामकाजाचा आढावा मी घेतलेला आहे.
या इस्पितळात कर्मचारी व डॉक्टर्स यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे; कारण त्यांच्यावरील कामाचा ताण वाढलेला आहे. येथील डॉक्टर्स व 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील कर्मचारी चांगल्यापैकी काम करीत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.