पणजी: अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने (Anti-drug cell squad) काल मध्यरात्री उशिरा हरमल - पेडणे येथील हरमल पंचक्रोशी हायस्कूलच्या फुटबॉल मैदानाजवळ दिल्लीतील व्हिकी बच्चू यादव (26) या तरुणाला अटक करून त्याच्याकडून सुमारे 3 किलो गांजा जप्त केला. त्या गांजाची किंमत सुमारे तीन लाख रुपये असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक महेश गावकर यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक आले असल्याने किनारपट्टी परिसरात पुन्हा अंमलीपदार्थाच्या व्यवसायाने गती घेतली आहे त्यामुळे अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने गस्त सुरू केली आहे. काल गस्तीवर असताना एक तरुण संशयास्पदरित्या हरमल येथील फुटबॉल मैदानाजवळ उशिरा फिरताना दिसला. त्याच्या हातात पिशवी होती व तो कोणाची तरी वाट पाहत होता. पथकाने या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याजवळ गांजा सापडला. त्याच्याविरुद्ध अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित व्हिकी यादव गेल्या एक वर्षापासून गोव्यात आहे व हरमल येथील ब्ल्यू हाऊस गेस्ट हाऊसमध्ये भाडेपट्टीवर राहत आहे. तो तरुण - तरुणींसाठी नृत्य शिकवत असल्याची माहिती त्याने
पोलिसांना दिली. तो मूळचा दिल्लीतील मुतलानी - धांडा, पहरा गनी येथील आहे. गोव्यात नोकरीनिमित्त आला होता व त्याने नृत्य वर्ग सुरू केले होते. या नृत्य वर्गाच्या नावाखाली तो अंमलीपदार्थ विक्रीतही गुंतला असल्याचा पोलिसांना संशय आहे. अधिक चौकशी पोलिस करत आहेत.
मडगावात सापळा रचून कारवाई
मडगाव येथील कदंब बस स्थानकाजवळ गांजा विक्रीसाठी आलेला संशयित मंतेश नेवर्गी (वय 26, रा. झुवारीनगर) याला फातोर्डा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 2 लाखांचा गांजा जप्त केला. फातोर्डा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काल (गुरुवारी) मडगाव कदंब बस स्थानकाजवळ घडली. संशयित गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला अटक करून त्याच्याकडून 2 किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी संशयिताविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फातोर्डा पोलिस करीत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.