
जमिनीवर जसे आम्ही वाघाला श्रेष्ठ पद देतो तसेच किनारपट्टीवरचे श्रेष्ठ पद व्हाईट बॅलीड सी- ईगल या पक्ष्याला दिले गेले आहे. किनारपट्टीचा वाघ म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी जीवनभर एकपती/एकपत्नी व्रत बाळगतो. आपला जीवनसाथी निवडल्यानंतर आयुष्यभर हे पक्षी त्याच्याप्रती निष्ठा वाहून जगतात.
ज्या प्रकारे माणूस आपले घर बांधतो तसेच हे पक्षी देखील एक घरटे बांधून त्यात आपला संसार थाटतात. ज्या जागी योग्य प्रमाणात आपल्याला खाद्य मिळू शकेल अशीच जागा धोरणीपणाने निवडून ते आपले घरटे बांधतात. त्यामुळे सहसा हे पक्षी समुद्राकाठी असलेल्या मोठ्या झाडांवर आढळून येतात. अपवाद म्हणून आगशी नदीकाठी असलेल्या दलदलीत वाढलेल्या एका झाडावर देखील या पक्ष्याचे घरटे आढळले आहे.
(खरे तर तेथील त्या पक्ष्याचे आणि त्याच्या तिथल्या घरट्याचे जतन, संवर्धन व्हावे या उद्देशाने हा विषय आणि प्रकल्प सुरू झाला.) आतापर्यंत गोव्यात व्हाईट बॅलीड सी- ईगलच्या 60 घरट्यांची नोंद करण्यात आली आहे. याचाच अर्थ या पक्ष्यांच्या 60 जोड्या गोव्यात आहेत हे सिद्ध होते. व्हाईट बेलिड सी ईगल संबंधित डेटा अशाप्रकारे तयार व्हायला लागला आहे.
राज्यातील विविध ठिकाणच्या जैवविविधता समितीनींही या पक्ष्याच्या संवर्धनाच्या बाबतीत सकारात्मकता दाखवली आहे. याचाच भाग म्हणून मोरजी येथील जैवविविधता समितीचे अध्यक्ष धनंजय शेटगांवकर यांच्या पुढाकाराने तेथील व्हाईट बेलिड सी ईगल पक्षाच्या घरट्याजवळ हा फलक उभारण्यात आला.
खरे तर सुरूचे झाड हे व्हाईट बेलिड सी ईगल पक्ष्याच्या घरट्यासाठी योग्य नसले तरी कदाचित त्या झाडाच्या उंचीमुळे या पक्षाने तिथे घरटे बांधले असावे. मोरजी किनाऱ्यावर असलेल्या सुरूच्या वृक्षराजींमध्ये (कॅसुआरिना इक्विसेटिफोलिया) मध्ये एका भव्य शिकारी, पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाचे (व्हाईट बॅलीड सी ईगल) घरटे आहे. हे घरटे २०२० पासून येथे आहे.
हा पक्षी किनारी शिकारी मासे आणि सागरी साप यांसारख्या सागरी जीवांना खातात. उंच झाडांवर काठ्यांचा वापर करून हे पक्षी मोठी घरटी बांधतात व त्याच घरट्याचा सातत्याने काही वर्षे वापर करतात. हा एक प्रमुख शिकारी पक्षी असून जैवविविधता राखण्यास आणि प्रजातींच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. किनाऱ्यावरील त्याची उपस्थिती किनारी परिसंस्था निरोगी असल्याचे दर्शवते. १९७२ वन्यजीव कायद्याअंतर्गत या पक्ष्याला वाघाप्रमाणेच सर्वोच्च पातळीचे संरक्षण देण्यात आलेल्या आहे. गोव्यात सुमारे 495 प्रजातींचे पक्षी आहेत. या प्रत्येक प्रजातीचे विश्व वेगळे आहे. हे पक्षी आपल्याही विश्वाचा भाग आहेत हे समजून घेणे ही खचितच रोचक बाब असू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.