
नुकत्याच प्रकाशित झालेल्या गोव्यातील पक्ष्यांच्या अद्ययावत सूचीप्रमाणे, आतापर्यन्त गोव्यात सापडलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींचा आकडा ४९७ पर्यन्त पोहोचला आहे. ३७०२ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या छोट्याशा गोवा राज्यात एकूण भारतात सापडणाऱ्या पक्षी प्रजातींमधील जवळपास ४०% प्रजाती गोव्यात सापडणे ही गोवेकरांसाठी एक विशेष गोष्ट आहे.
जानेवारी २०१८ साली डॉ. प्रणय बैद्य व मंदार भगत ह्यांनी तेव्हापर्यंतच्या ४४९ गोव्यातील पक्ष्यांची प्रबंधरूपी सूची बनवली होती, जिची पहिली आवृत्ती 'इंडियन बर्डस' ह्या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाली होती. त्याच वर्षी दुसऱ्या गोवा पक्षीमहोत्सवाच्या व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ह्याच्या हस्ते प्रबंधाची छापील प्रत अनावरीत केली गेली होती.
त्या सूचीत दरवर्षी भर पडून गेल्या वर्षापर्यंत प्रकाशित सहाव्या आवृत्तीपर्यंत एकूण ४८९ प्रजातींची नोंद झाली होती. मे २०२५ सालच्या सातव्या आवृत्तीमध्ये ८ नवीन प्रजातीची नोंद झाल्याने गोव्याचं पक्षीवैभव ४९७ पर्यन्त पोहोचले आहे. ही सूची २०२५च्या प्रवीण जयवर्धने आणि डॉ. राजा जयपाल ह्या भारतातील विख्यात पक्षीतज्ज्ञांनी घालून दिलेली पक्षी वर्गीकरण मार्गदर्शक तत्वांवर आधारित आहे. देशपातळीवरील पक्ष्यांची सूची प्रकाशित झाल्यानंतर, गोवा हे पक्ष्याची राज्य स्थरावर सूची बनवणारं पहिलं राज्य ठरले आहे.
नवीन 8 पक्षी प्रजातील 5 प्रजाती ह्या समुद्री पक्ष्यांच्या असल्यामुळे त्यातून गोव्याच्या समुद्री जैविविधतेचं महत्व कळून येते. नवीन सापडलेल्या सामुद्रिक पक्ष्यांमध्ये 'शॉर्ट टेल्ड शीयरवॉटर' आणि 'व्हाईट टेल्ड ट्रॉपिकबर्ड' ह्या दोन प्रजाती वादळामुळे किनाऱ्यावर वाहून आलेल्या व गोवा वनविभाग, दृष्टी मरीन व रीफ वॉच ह्या संस्थेच्या संयुक्तरित्या बचाव व नोंद केल्या गेल्या.
सागरी पक्ष्यांपैकी 'लेसर नॉडी' हा पक्षी सागर नाईक व शुभम राणे ह्या गोवा विद्यापीठातल्या संशोधक विद्यार्थ्यांना गाल्जीबाग समुद्रकिनारी जखमी अवस्थेत सापडला. ज्याला पुढे पक्षी बचावदलाने ताब्यात घेऊन उपचार केले. संशोधक आणि बचावदलाचे संयुक्त प्रयत्नांचं हे एक चागंलं आणि महत्वाचं उदाहरण आहे. 'ग्रेट फ्रिगेटबर्ड' हा पक्षी आग्वाद किल्ल्यावरून समुद्रीपक्षी पाहायला गेलेल्या गटाला उडताना सापडला.
अजून एक उल्लेखनीय पक्षी 'श्ट्रीकड शीयरवॉटर', जलमेश कारपूरकर आणि डॉ. प्रणय बैद्य ह्यांच्या नेतृत्वाखाली 'गोवा बर्ड ऍटलास' ह्या उपक्रमाखाली खोल समुद्रात पक्षीनिरीक्षण करायला गेलेल्या गटाला दिसला. उर्वरित तीन प्रजातीमध्ये 'जेर्डन्स बुशलार्क’ ओंकार दामले ह्यांना सुकूर पठार येथे तर पराग रांगणेकर व कुलदीप टोपो ह्या पक्षीनिरीक्षकांना 'येलो रुम्पड फ्लायकॅचर' तांबडी सुर्ल येथील श्री महादेव मंदिराच्या परिसरात सापडला.
सातवा पक्षी 'आफ्रिकन ओपेनबिल' हा जरी २०२१ साली अपर्णा लाड ह्यांनी माजोर्डा येथे बघितला होता तरी काही वैज्ञानिक संभ्रमामुळे भारतीय पक्ष्यांच्या सूचीमध्ये त्याचा समावेश झाला न्हवता. २०२३ मध्ये परत त्याची केरळ येथे नोंद झाल्याने तज्ज्ञांनी त्याचा समावेश राष्ट्रीय सूचीमध्ये जागतिक हवामान बदलांमुळे भटकत येणाऱ्या पक्षामधील एक असा केला. त्या अनुषंगाने गोव्याचा सूचीमध्ये त्याला स्थान मिळालं.
गोव्यातील पक्षीसूची बनवण्यामागे गोव्यातील तसेच गोव्यात येणाऱ्या इतर पक्षिनिरीक्षकांच्या नोंदीचा हातभार लागला आहे. पुढे ह्या उपक्रमाचा संशोधन व जैविक संवर्धनासाठी निश्चीतच उपयोग होईल. पक्षी हा नैसर्गिक वातावरणाच्या बदलांचा महत्वाचा सूचक मानला जातो. एखाद्या ठिकाणी पक्ष्यांच्या संख्येतील चढउतार चांगला किंव्हा वाईट नैसर्गिक बदल दर्शवतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.