Water Conservation: फक्त सक्ती नको, लोकसहभाग हवा! मांद्रेच्या ‘धवरुख’ संस्थेचा जलसंवर्धन उपक्रम ठरतोय राज्यासाठी आदर्श

Dhawarukh Water Conservation: राज्यात वाढत्या पाणीटंचाईची समस्या आणि सातत्याने खालावत चाललेली भूजल पातळी यामुळे जलस्रोतांचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.
Dhawarukh Water Conservation
Water ConservationDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: राज्यात वाढत्या पाणीटंचाईची समस्या आणि सातत्याने खालावत चाललेली भूजल पातळी यामुळे जलस्रोतांचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. अंजुणे आणि साळावलीसारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात झालेली घट, बदलते हवामान आणि संभाव्य कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व बोअरवेलधारकांसाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे करण्याच्या दृष्टीने विशेष अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यातील मांद्रे येथील ‘धवरुख’ ही पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली स्वयंसेवी संस्था गेल्या दशकभरापासून राबवत असलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरत आहे.

संस्थेचे अध्यक्ष रुदेश म्हामल यांच्या नेतृत्वाखाली ६० हून अधिक स्वयंसेवक या मोहिमेत सक्रियपणे सहभागी आहेत.

Dhawarukh Water Conservation
Goa Water: गोव्यासाठी गुड न्यूज! पावसाने पाठ फिरवली तरी ‘इतके’ दिवस पुरेल इतका पाणीसाठी; मंत्र्यांचे स्पष्टीकरण

याशिवाय मांद्रे, पर्वरी आणि परिसरातील सहापेक्षा अधिक शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थीही या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत स्वयंसेवक डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर ‘ट्रेंचेस’ अर्थात समांतर चर खणण्याचे काम करतात. आतापर्यंत हजारो ट्रेंचेस तयार करण्यात आले असून, या चरींमुळे पावसाचे वेगाने वाहून जाणारे पाणी अडविले जाते आणि ते संथपणे जमिनीत मुरते.

त्यामुळे भूजल पुनर्भरणाला मोठी मदत होते. याचबरोबर डोंगराळ भागात वृक्षारोपण करून मृदसंधारण आणि पर्यावरण संरक्षणालाही चालना दिली जाते.

धवरुख संस्थेच्या या कामामुळे काही महत्त्वपूर्ण पर्यावरणीय परिणामही समोर आले आहेत. ट्रेंचेसमुळे माती भुसभुशीत बनते. त्यामुळे लहान प्राणी, उंदीर आणि इतर जीव त्यामध्ये बिळे तयार करतात. पावसाळ्यात चरींमध्ये साठलेले पाणी या बिळांमधून जमिनीच्या अधिक खोल थरांपर्यंत पोहोचते.

Dhawarukh Water Conservation
Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

परिणामी, पाण्याचा साठा केवळ एका ठिकाणी मर्यादित राहत नाही, तर विस्तृत परिसरात भूजल पुनर्भरणाची प्रक्रिया घडून येते. ही नैसर्गिक साखळी जलसंवर्धनासाठी अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे संस्थेच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.

संस्थेच्या पुढाकारातून आणि जनसहभागातून आतापर्यंत सुमारे ८६ घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

या प्रकल्पांमुळे घरगुती वापरासाठी पावसाच्या पाण्याचा साठा करण्याबरोबरच भूजल पातळी टिकवून ठेवण्यासही मदत होत आहे. ग्रामीण भागात जलव्यवस्थापनाची शाश्वत पद्धत रुजविण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे.

निसर्गाच्या नियमांशी सुसंगत जलव्यवस्थापन.

Dhawarukh Water Conservation
Goa Dams Water storage: जून अर्धा संपला, धरणे मात्र रिकामीच! राज्यातील जलसाठ्यांची चिंताजनक स्थिती, साळावली धरणात फक्त 28 टक्के पाणी

छतावरील पाण्याचे संकलन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि धवरुख संस्थेच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या यशस्वी मॉडेलचा व्यापक अवलंब केल्यास गोव्याला भविष्यातील भीषण पाणीटंचाईचा सामना करण्यास मोठी मदत होऊ शकते. जलसंवर्धन ही केवळ सरकारी योजना नसून लोकचळवळ बनणे आवश्यक असल्याचा संदेश धवरुख संस्थेच्या कार्यातून अधोरेखित होत आहे.

भूजल पुनर्भरणाची प्रक्रिया

पावसाचे वाहून जाणारे पाणी नैसर्गिकरीत्या स्वच्छ आणि हलके असल्यामुळे ते जमिनीत मुरविल्यास भूजलाची गुणवत्ता आणि पातळी दोन्ही सुधारण्यास मदत होते. यासाठी बोअरवेल परिसरात ‘रिचार्ज पीट’ तयार करणे हा अत्यंत परिणामकारक उपाय मानला जातो. बोअरवेलजवळ योग्य आकाराचा खड्डा करून त्यात दगड, वाळू आणि कोळशाचे थर भरले जातात. या नैसर्गिक गाळणीमधून पावसाचे पाणी स्वच्छ होऊन जमिनीत झिरपते. त्यामुळे माती, कचरा किंवा गाळ थेट बोअरवेलमध्ये जाण्याचा धोका टळतो आणि भूजल पुनर्भरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी बनते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com