

पणजी: गोव्यातील वारकरी परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोमंतकीय वारकरी पोर्तुगीज गोव्यात येण्यापूर्वीपासून पंढरपूरची वारी करत आहेत. ही परंपरा शेकडो वर्षांची असून गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. साखळी येथील विठ्ठल मंदिर ही या समृद्ध वारकरी परंपरेची साक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंढरपूरला जाणाऱ्या गोमंतकीय वारकऱ्यांसाठी परवडणारी आणि सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन' उभारण्याचे काम सुरु आहे. पुढील वर्षीच्या आषाढी वारीपूर्वी हे भवन पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. हे भवन तयार झाल्यानंतर गोव्यातून येणाऱ्या भाविकांना कमी खर्चात सुरक्षित आणि सोयीस्कर निवासाची सुविधा मिळणार आहे.
वारकरी दिंड्यांना दिली जाणारी आर्थिक मदत आता अधिक पारदर्शक पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. नोंदणीकृत वारकरी गटांना परतीच्या प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जात आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ही रक्कम खात्यात जमा केली जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यंदा वारकऱ्यांची संख्या वाढल्यास या योजनेतील निधी वाढवण्याचाही सरकारचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक वारीला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारकडून वारकऱ्यांना कापडी पिशव्या, टोपी आणि प्रथमोपचार संच (फर्स्ट एड किट) वितरित करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवरही भर देण्यात आला.
मुख्यमंत्री सावंत यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु असलेल्या देवदर्शिनी योजनेचा विस्तार करण्याचाही मानस व्यक्त केला. तसेच अयोध्येत गोमंतकीय भाविकांसाठी 'गोवा राम निवास' उभारण्याचाही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपूरची (Pandharpur) वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून श्रद्धा, एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नमूद केले. गोव्याची ऐतिहासिक वारकरी परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत टिकून राहावी आणि भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.