Vishwajit Rane ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते क्लॉड आल्वारिस यांचा उल्लेख ‘फ्रॉड’ असा केल्यानंतर नंतर आपलेच शब्द मागे घेणारे गोवा सरकारातील मंत्री विश्वजीत राणे हे पुन्हा एकदा त्याच शब्दामुळे वादात आले आहेत.
ज्येष्ठ आर्किटेक्ट डीन द क्रूझ यांचाही उल्लेख विधानसभेत ‘फ्रॉड’ असा केल्याने गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील असंख्य आर्किटेक्टस्नी त्याला आक्षेप घेतला असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच सभापती रमेश तवडकर यांच्याकडे या संबंधात तक्रार दाखल केली आहे. विधानसभेच्या हक्कभंग समितीनेही याची गंभीर नोंद घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील अशा एकूण 288 आर्किटेक्टस्च्या सह्या असलेले निवेदन आज मुख्यमंत्री व सभापती यांना सादर केले असून नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या या वक्तव्याने गोव्यातील तमाम आर्किटेक्टस् चिंतित झाले आहेत.
त्यांना सरकारी धोरणाबद्दल चिंता वाटते, असे या निवेदनात म्हटले आहे. काल विधानसभेत मंत्री राणे यांनी डीन द क्रूझ यांना ‘फ्रॉड’ असे समजले होते. त्याशिवाय त्यांचे नाव काळ्या यादीत टाकणार आणि आपण असेपर्यंत त्यांच्या कुठल्याही प्रकल्पांना मान्यता देणार नाही, असे म्हटले होते.
यावर युवा आर्किटेक्ट ताहीर नोरोन्हा यांनी तीव्र आक्षेप घेणारे पत्र सभापती तसेच हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांना पाठविले आहे.
राणे यांचा हा उल्लेख पाहता ते सूडबुद्धीने वागतात असे वाटते, असा उल्लेख करून या गोष्टीची गंभीर दखल घेत त्यांच्याकडून हे खाते काढून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर गोव्यातील शंभर आर्किटेक्टस्च्या सह्या आहेत, तर गोव्याबाहेरील पण गोव्याशी संबंध असलेल्या अन्य आर्किटेक्टस्चाही त्यात समावेश आहे.
कामे अडवली जातात!
‘गोमन्तक’शी बोलताना, नोरोन्हा म्हणाले, आम्ही कित्येक आर्किटेक्टस् असे आहोत, जे सामाजिक मुद्यांवर भाष्य करत असतात. आम्हाला असाही अनुभव आला आहे, की आमची कित्येक कामे नगरनियोजन खात्यात अडवून ठेवली आहेत.
या वेळकाढूपणामागे आमचे हे समाजमाध्यमांवरील भाष्य तर कारणीभूत नाही ना, असे वाटू लागले आहे. आमची कामे मुद्दामहून अडवून ठेवली जातात, असेही आम्हाला वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.