Goa Crime सोनसाखळी चोरी प्रकरणातील अट्टल गुन्हेगार फैजान सय्यद (२४) याला डिचोली पोलिस व गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत डिचोली येथे अटक करण्यात आली.
संशयित मूळचा कर्नाटकचा असून तो सध्या कुडतरी येथे गेली अनेक वर्षे राहत आहेत. त्याच्याविरुद्ध सोनसाखळ्या खेचणे, ड्रग्ज प्रकरण तसेच चोरी असे ११ गुन्हे नोंद आहेत. कारवाईप्रसंगी त्याचा साथीदार दुचाकीवरून पसार झाला.
सोनसाखळ्या खेचण्याच्या प्रकरणामध्ये आणखी तिघेजण असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.
नावेली - सुर्ला येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पसार झालेला एक तरुण डिचोली येथे दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती डिचोली पोलिसांना मिळाली. त्यानुसार डिचोली पोलिस व गुन्हे शाखे पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाचा शोध घेण्यात आला.
दुचाकीवर बसलेला फैजान सय्यद सोनसाखळी खेचण्यासाठी सावजाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचवेळी त्याचा साथीदार दुचाकी घेऊन काही अंतरावर उभा होता, तो पसार झाला.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने मुळगाव - डिचोली येथे २७ जुलै २०२३ रोजी मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. हे मंगळसूत्र ११ ग्रॅमचे होते. त्याची किंमत सुमारे ५५ हजार होती. त्याने राज्यातील अनेक भागात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या व मंगळसूत्र खेचून चोऱ्या केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
उपअधीक्षक सागर एकोस्कर व निरीक्षक राहुल नाईक तसेच गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गिरीश पाडोलस्कर, इतर पोलिसांच्या मदतीने संशयिताला गजाआड करण्यात पोलिसाना यश आले. संशयित फैजान सय्यद हा राज्याबाहेरील बेरोजगार असलेल्या युवकांना गोव्यात आणत होता.
त्यांच्याशी दोस्ती करून त्यांना येथील कोकणी भाषा शिकवत होता. त्यानंतर त्यांना गुन्हेगारी करण्याचे प्रशिक्षण देत होता. मंगळसूत्र व सोनसाखळ्या खेचून पसार होण्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांना सामील करून घेत होता, असेही पोलिसांनी सांगितले.
दुचाकीचा वापर
फैजान सय्यद विरुद्ध ११ गुन्हे दाखल आहेत. त्याने पणजी, म्हापसा, पर्वरी व पेडणे येथे गुन्हे केले आहेत. तसेच मडगाव पोलिस स्थानकात २, मायणा - कुडतरी पोलिस स्थानकात ४, वेर्णा पोलिस स्थानकात २ तर सांगे व कुडचडे पोलिस स्थानकात प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकीचा शोध घेण्यात येत आहे, असे वाल्सन म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.