पणजी: गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. आपल्या लाडक्या गणेशाचे स्वागत करण्यासाठी सारे गणेशभक्त आतुर झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्यासाठी परिस्थिती सुधारल्याने लोक सुस्कारा सोडून तयारीला लागले आहेत.
गणेशमूर्तींच्या शाळाही गजबजू लागल्या आहेत. घरोघरी महिला करंज्या व इतर गोडधोड पदार्थ करण्यात मग्न आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या भीतीने सर्वांनाच ग्रासले होते. दरवर्षी गोवा व कोकण भागांतील लोक जे मुंबई व इतर ठिकाणी नोकरीधंद्यानिमित्त स्थायिक झालेले आहेत ते ‘गाववाले’ न चुकता गणपती उत्सवाला आपल्या गावातील घराकडे परतायचे. मात्र गेल्यावर्षी सर्वच बंद होते. भीतीचे सावट होते. त्यामुळे प्रथमच चतुर्थीच्या सणाला त्यांना मुकावे लागले होते. यंदा मात्र रेल्वेगाड्या सुरु असल्याने व वातारवण बऱ्याच प्रमाणात निवळल्याने चाकरमान्यांना गावी येण्यास तशी अडचण नाहीय. ते गावी येऊन आपल्या आवडत्या उत्सवाचा आनंद लुटणार आहेत. मुलेही फटाके फोडायला मिळणार म्हणून आनंदी आहेत.
गोवा व कोकणातील चतुर्थी हा सर्वांत मोठा, ला़डका आणि कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला जाणारा सण. या सणाचा आनंद हा अवर्णनीयच असतो. यंदा कोरोनामुळे आपल्या उत्साहावर पाणी पडू द्यायचे नाही असे लोकांनी ठरविलेले असल्याचे एकंदर वातावरण पाहून जाणवते. गतसाली बहुतेक जणांनी दीड दिवसातच गणेश विसर्जन केले होते. शेजाऱ्यांकडे, वाड्यावर, नातेवाईकांकडे जाणेसुद्धा लोकांना टाळणे भाग पाडले होते. मात्र यंदा ती कसूर भरुन निघणार आहे.
बाहेरगावी असलेले चाकरमानी आपापल्या गावी यायला लागले आहेत. रेल्वेच्या ज्यादा गाड्या चतुर्थीनिमित्त सोडल्या जात असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळत आहे. एकूणच काय तर यंदाचा चतुर्थी उत्सव उत्साहाने साजरा केला जाणार आहे आणि विघ्नहर्ता गणपती उत्सव साजरा करण्यात कुठलीच विघ्न येऊ देणार नाही अशी गणेशभक्तांची भावना आहे. म्हणूनच ‘आधी वंदू तुज मोरया...’चे स्वर भक्तांच्या कानी गुंजू लागले आहेत. सजावटीचे साहित्य घरोघरी नेले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.