

वास्को: वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका भाड्याच्या जागेतून चालविण्यात येणाऱ्या मोठ्या अवैध कॉल सेंटरचा वेर्णा पोलिसांनी पर्दाफाश करत २६ जणांना अटक केली.
अमेरिकन बँक अधिकाऱ्यांची बनावट ओळख धारण करून अमेरिकन नागरिकांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वेर्णा पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पहाटे ३ ते ६.१५ दरम्यान मिलाग्रीस ॲक्वा प्रा. लि. येथील प्लॉट क्रमांक ९८ वर छापा टाकला.
यावेळी बेकायदेशीर कॉल सेंटर चालविले जात असल्याचे उघड झाले. हे संशयित अमेरिकन नागरिकांना फोन करून स्वतःला बँक अधिकारी असल्याचे सांगत गिफ्ट कार्डद्वारे पैसे भरण्यास भाग पाडत होते. छाप्यावेळी १४५ लॅपटॉप, ४५ मोबाईल फोन, राउटर, हेडफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले.
जप्त मालमत्तेची किंमत सुमारे ५५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले संशयित नागालँड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतील रहिवासी असून ते सांकवाळ येथील ओशन व्ह्यू अपार्टमेंटमध्ये राहत होते.
संशयित व्हीपीएन कॉलिंग आणि स्पूफिंग तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधत होते. त्यांच्याविरोधात बीएनएस आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फसव्या कॉल्सपासून सावध राहावे आणि संशयास्पद कॉल्सची माहिती सायबर हेल्पलाइन १९३० किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.