.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पणजी: राज्यात बागायती पिके, भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु गोव्यात भाजीपाल्याला जेवढी मागणी आहे त्या तुलनेत अतिशय तुरळक प्रमाणात भाजीपाला लागवड करण्यात येते. भाजीपाल्यासाठी गोव्याला शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रावर अवलंबून राहावे लागते, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा म्हणजेच २०२३-२४ वर्षात राज्यात भाजीपाला लागवडीत ३१५ हेक्टरने वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी (२०२२-२३) रब्बी आणि खरीब हंगाम धरून एकूण ८३७४ हेक्टर भाजी लागवड करण्यात आली होती. यंदा लागवडीत वाढ होऊन एकूण ८६८९ हेक्टर क्षेत्रफळात लागवड केली आहे. दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात सर्वाधिक २६४५ हेक्टर क्षेत्रफळात भाजी लागवड होते. उत्तर गोव्यातील तिसवाडी तालुक्यात ९७६ हेक्टर क्षेत्रफळात भाजी लागवड होते. सर्वात कमी भाजी लागवड ही धारबांदोडा तालुक्यात १६२ हेक्टर क्षेत्रफळात होते.
राज्यातील भाजी लागवडीच्या उत्पादनाचा आढावा घेतल्यास राज्यात रब्बी आणि खरीप असे दोन्ही हंगाम मिळून एकूण ११४५३५ टन भाजीचे उत्पादन घेण्यात येते. सर्वाधिक भाजी लागवड ही सासष्टी तालुक्यात होत असल्याने साहजिकपणे उत्पादन देखील तेथेच अधिक आहे. सासष्टी (Salcete) तालुक्यात सर्वाधिक ३१३१८ टन उत्पादन घेण्यात येते. तर सर्वात कमी उत्पादन १९६० टन उत्पादन सांगे तालुक्यात आहे.
कोविड काळानंतर गोव्यात (Goa) भाजीपाला उत्पादनात वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तसेच युवकांनी आपल्या घरातील जागेत भाजीपाला पिकवण्यास सुरवात केली. राज्याच्या काही भागात इतर राज्यातून येणाऱ्या भाजीचे उत्पादनही घेण्याचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. त्यामुळे अनेकजण स्वयंपूर्ण शेतीकडे वळले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.