Vedanta Bicholim Mines: 'कामावर घेत नसाल, तर आमच्या शेती परत द्या'- शेतकऱ्यांचा एल्गार

Vedanta Bicholim Mines: डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
Vedanta Bicholim Mines
Vedanta Bicholim MinesDainik Gomantak
Published on
Updated on

Vedanta Bicholim Mines: स्थानिकांना काम देत नसाल, तर खाण व्यवसायामुळे उद्धवस्त झालेली शेती सुपीक करुन पूर्ववत आम्हाला द्या. अशी पिळगावमधील शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे.

ही मागणी पदरात पाडून घेण्यासाठी संघटीत झालेल्या पिळगावमधील शेतकऱ्यांनी आज (बुधवारी) डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.

आमची शेती आम्हाला मिळाली नाही, तर खाण कंपनी विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेताना सारमानस-पिळगाव रस्त्यावरुन खनिज वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात येईल. प्रसंगी न्यायालयात दाद मागण्यात येईल. असा स्पष्ट इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

वेदांता (सेझा) खाण कंपनीने स्थानिक कामगारांना घरी पाठवल्याने पिळगावमधील शेतकरी आता आक्रमक बनले आहेत. स्थानिकांना कामावर घेत नसाल, तर आमच्या शेती पूर्ववत आम्हाला द्या. अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.

पिळगावमधील कामगारांना खाण कंपनीने घरी पाठविल्याने कामगारांसह स्थानिक शेतकरी आता संघटित आणि आक्रमक झाले आहेत. शेतीच्या मागणीसाठी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी सारमानस येथे धरणे धरले होते.

Vedanta Bicholim Mines
गोव्यातील शास्त्रज्ञाकडे रामायणावर आधारीत 300 टपाल तिकिटांचा संग्रह; 50 वर्षांपासून जपतायेत आगळावेगळा छंद

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:-

रमेश कवळेकर आणि सुधाकर वायंगणकर यांच्या नेतृत्वाखाली पिळगावमधील शेतकऱ्यांनी आज सकाळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. कार्यालयीन कामाकाजामुळे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर कार्यालयात अनुपस्थित होते.

त्यांच्या अनुपस्थितीत संयुक्त मामलेदार श्रीपाद माजिक यांनी निवेदन स्वीकारले. वेदांता कंपनीने कामावरून कमी केलेले आणि बेकरीची कुऱ्हाड कोसळलेले स्थानिक कामगारही शेतकऱ्यांबरोबर होते.

Vedanta Bicholim Mines
Goa Drugs Case: शिवोलीत 3.5 लाखांचे अमली पदार्थ जप्त; मुंबईचा एकजण अटकेत

कामगारांच्या पोटावर पाय:-

गावातील लोकांना रोजगार मिळणार या आशेने खाण व्यवसाय सुरु झाल्यानंतर आम्ही शेतजमिनीवर पाणी सोडून खाण कंपनीला सहकार्य केले होते. मात्र आता खाण कंपनीने गावावरच अन्याय केला आहे. खाण व्यवसायामुळे आमच्या शेतजमिनी नष्ट झाल्या आहेत.

खाणमाती आदी गाळ साचून शेतजमिनी बुजल्या आहेत. त्यामुळे गेल्या बऱ्याच वर्षांपासून शेती पडीक पडल्या आहेत. खाण कंपनीकडून नुकसान भरपाईही धड मिळत नाही. आता तर वेदांता (सेझा) खाण कंपनीने स्थानिक कामगारांना काढून त्यांना वाऱ्यावर टाकले आहे.

अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. खाण व्यवसायामुळे शेती व्यवसायावर संक्रांत आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शेती व्यवसाय बंद झाला आहे. असे या शेतकऱ्यांनी सांगितले. 30 हजाराहून अधिक चौरस मीटर शेती उध्वस्त झाली आहे. अशी माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली आहे.

...तर खनिज वाहतूक रोखणार:-

नुकसान भरपाई सोडाच, उलट आता खाण कंपनीकडून स्थानिक कामगारांच्या पोटावर पाय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता आम्ही करायचे काय0 असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या शेतजमिनी आम्हाला हव्या आहेत.

शेतीतील गाळ काढून आमच्या शेती आम्हाला द्या. अशी मागणी सुधाकर वायंगणकर, रमेश कवळेकर आणि अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास सारमानस रस्त्यावरुन खनिज वाहतूक करायला देणार नाही. असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. वेळप्रसंगी न्यायालयात मागण्यात येईल. असे सुधाकर वायंगणकर यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com