Mormugao Municipal News: वास्को शहरातील भाजी मार्केटमध्ये रस्त्यावर अतिक्रमणे सहन केली जाणार नाहीत असा इशारा देणाऱ्या मुरगाव नगरपालिकेसमोर तेथील विक्रेत्यांनी अतिक्रमणे न हटविता आव्हान उभे केले आहे. हे आव्हान पेलण्यास मुरगाव पालिका सध्या तरी समर्थ ठरल्याचे दिसत आहे.
त्यामुळे तेथील विक्रेत्यांची संख्या व मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान, वास्को रेल्वेस्थानकासमोर चिकन रस्सा, ऑम्लेट पाव आदी खाद्यपदार्थांचे हातगाडे लावणाऱ्यांनी पदपथ व रस्ता व्यापून टाकला आहे. तेथेही कारवाई करण्यास पालिका अधिकारी असमर्थ ठरलेले आहेत.
भाजी मार्केटमध्ये विक्रेत्यांनी रस्ता गिळंकृत केला आहे. त्यांना पालिका निरीक्षक व अधिकाऱ्यांची कोणतीच भीती राहिलेली नाही. त्यामुळे ते बिनधास्तपणे वागत आहेत. त्यांच्यात एवढी हिंमत येण्यामागे कारण काय?, त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? आदी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या विक्रेत्यांनी आपली दुकाने रिकामी ठेवली आहेत. दुकानात माल मांडण्याऐवजी दुकानासमोरच्या रस्त्यावर ''क्रेट्स'' ठेवून त्यावर मालाची विक्री करण्यात येत आहे.
दरम्यान या तसेच वास्को रेल्वेस्थानकासमोरील विक्रेत्यांना वास्को पोलिसांनी समज देऊन तेथून हटविले होते. त्यांना साहित्य दुकानांमध्ये मांडण्यास सांगितले होते. याप्रकरणी वास्कोवासीयांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु ही कारवाई एका दिवसाची ठरली. त्यानंतर त्या विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमणे करून मालविक्री सुरू केली आहे.
त्यांच्याविरोधात अद्याप कारवाई होत नसल्याने ग्राहक मुरगाव पालिकेच्या नावाने बोटे मोडत आहेत. परंतु मुरगाव पालिका आमच्याकडे कामगार नाही, आमच्याकडे पोस मशिन (पॉईंट ऑफ सेल) नाही, असे थातूरमातूर कारणे देऊन वेळ मारून नेत आहे.
फलाटासह पदपथही केले गिळंकृत
वास्को रेल्वेस्थानकासमोर काही विक्रेते हातगाड्यांवर चिकन रस्सा, ऑम्लेट पाव, चहा, भजी वगैरे विकत आहेत. तेथे पूर्वी विविध वस्तू, शीतपेये वगैरे विकणारे गाडे होते. परंतु त्यांनी पदपथावर गाडे थाटल्याने त्या विक्रेत्यांना तेथून हटवून बसस्थानक परिसरात त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
त्यानंतर तेथे हातगाड्यावाल्यांनी अतिक्रमण केले. पदपथांवर अतिक्रमण केल्याने मुरगाव पालिकेने पदपथाच्या समांतर सिमेंट काँक्रीटचा फलाट बांधून तेथे त्या हातगाडीवाल्यांची सोय केली. काही दिवस त्यांनी तेथे व्यवसाय केला. आता त्यांनी ते पदपथही आपल्या ताब्यात घेतले व तेथील रस्त्यावरही अतिक्रमण केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.