Vasco Crime: झुंडशाहीचे प्रत्यंतर; फा. बोलमॅक्स परेरांच्या आक्षेपार्ह वक्‍तव्‍यामुळे जमाव आक्रमक

शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य : दोन्ही बाजूंनी विषय ताणल्यास राज्यातील स्थिती स्फोटक बनण्याची भीती
FIR registered
FIR registeredDainik Gomantak
Published on
Updated on

Controversial statement about Shivaji Maharaj फा. बोलमॅक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत हा प्रश्‍न मिटल्याचे निवेदन केले.

तरीही वास्को पोलिस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला व दुसऱ्या बाजूला सांकवाळ चर्चने घंटा वाजवून हजारो लोक जमा केले. त्यामुळे गोव्यात स्फोटक वातावरण निर्माण झाले आहे.

वास्को पोलिस ठाण्यासमोर जमलेल्या जमावाने फा. परेरा यांच्या अटकेची मागणी केली होती, परंतु त्यानंतर सामंजस्याने हे लोक परतले व कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

दुसऱ्या बाजूला वास्कोतील जमाव चर्चवर चालून येत असल्याची माहिती पसरली व चिखली चर्चने घंटा वाजवून लोकांना जमविले. हा जमावही आक्रमक होता. दोन्ही जमावांच्या ताठरपणाचे चित्रीकरण झाले आहे.

वास्को पोलिस ठाण्याचे निरीक्षक कपिल नायक यांच्या मते, आम्ही एफआरआय दाखल करून घेतला आहे व या प्रकाराची संपूर्ण चौकशी करण्याचे ठरविले आहे. तशी माहिती देताच पोलिस ठाण्यासमोरील जमाव पांगला.

किंबहुना, वास्को शहरातील शिवप्रेमी संध्याकाळी पोलिस निरीक्षकाची भेट घेऊन गेले होते, परंतु आपल्या मागणीनुसार गुन्हा नोंद करून फादरना अटक का केली नाही हे विचारायला जमाव पुन्हा जमला.

कपिल नायक यांनी ही माहिती देऊन पुढे सांगितले, की या प्रकरणात लागलीच अटक केली जाऊ शकत नाही. आम्ही चौकशी केल्यानंतर नक्की कारवाई करू असे आम्ही लोकांना समजावून सांगितले.

चिखली चर्चने घंटा वाजवून हजारो लोकांना एकत्र जमविले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वास्तविक मोठे अरिष्ट येते तेव्हाच चर्चच्या घंटा वाजवून लोकांना जमविले जाते, परंतु काल्पनिक भीतीने असे हजारो लोकांना जमविणे, तेही धार्मिक संस्थेने हे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

जराशा चिथावणीने वास्को शहरात हिंसाचाराची ठिणगी पडू शकली असती. पोलिसांनी अशावेळी तातडीने दोन्ही ठिकाणी धाव घेऊन सामंजस्याचे उपाय योजायचे असतात. दुर्दैवाने चिखली चर्चमधील प्रकाराची पोलिसांनी अद्याप दखल घेतलेली नाही. किमान या चर्च परिसराला भेट देऊन तेथे असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू करणे आवश्‍यक होते.

तत्पूर्वी, गोवा विधानसभेत विजय सरदेसाई यांनी हा मुद्दा उपस्थित करून देव हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर फा. परेरा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

काही लोकांचे समाधान झाले नसल्यास मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा अशी मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना प्रश्‍न सामंजस्याने मिटविण्यात आल्याची माहिती दिली होती.

मणिपूर येथील हिंसाचाराचे लोण देशात काही ठिकाणी पसरले व गुडगाव येथे अशांत वातावरण निर्माण झाले आहे. चर्च धर्मसंस्थेच्या एका मुखपत्रात गोव्याचेही मणिपूर होऊ शकते अशा आशयाची भीती व्यक्त करणारा एक लेख प्रसिद्ध झाला आहे.

त्याची चर्चा गोव्यात समाज माध्यमांवर सुरू आहे. तेथे हिंदूंनी अल्पसंख्याकांच्या भागातून मिरवणूक काढल्याचे गुडगावला निमित्त झाले होते.

FIR registered
Salaulim Dam : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर साळावली धरणावर विद्युत रोषणाई

दरम्यान, समाज कार्यकर्ते डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी गोव्यात शांततेचे आवाहन केले आहे. फा. परेरा यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेली तेढ संपविणे आवश्‍यक असून दोन्ही बाजूंनी सुसंवादातून हा विषय संपवावा असे आवाहन त्यांनी केले.

गोव्यात असे स्फोटक वातावरण तयार होणे घातक आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी दिली. दै. ‘गोमन्तक’शी बोलताना ते म्हणाले, हे प्रकरण पेटत राहिल्यास गोव्यात ठिकठिकाणी फा. पेरेरा समर्थक व शिवप्रेमी असे परस्पर विरोधी गट तयार होऊ शकतात व तेच धोकादायक आहे. त्यामुळे सामंजस्याने प्रकरण सोडविले पाहिजे.

FIR registered
Panaji police station attack : पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी तहकूब

कलावृंदतर्फे फा. परेरा यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी समाजात दुफळी निर्माण करण्‍याचे जे वक्‍तव्‍य फा. बोलमॅक्‍स परेरा यांनी केले आहे, ते एका धर्मगुरूला शोभण्‍यासारखे नाही.

प्रेमाची भाषा वापरून सर्व लोकांमध्‍ये प्रेम आणि शांती प्रस्‍थापित करावी ही जी येशूने शिकवण दिली आहे त्‍याच्‍या विरोधात हे कृत्‍य आहे, असे कलावृंद मडगाव या संस्‍थेने म्‍हटले असून फा. परेरा यांच्‍या वक्‍तव्‍याचा त्‍यांनी निषेध केला आहे.

...तर कठोर कारवाई ः मुख्यमंत्री

राज्यातील धार्मिक सलोखा कोणत्याही स्थितीत बिघडवू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रात्री दै. ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, कोणीही चिथावणीखोर वक्तव्ये करू नयेत. ज्यांनी तसे केले असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही.

सारे काही नियंत्रणात आहे. समाजकंटकांनी या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही. शांतताप्रिय प्रदेश अशी गोव्याची ओळख आहे. ती टिकवण्यासाठी सारे प्रयत्न सुरू आहेत.

आत्ताच्या घडीला दोन्ही बाजूच्या नेत्यांची बैठक घ्यावी असे वाटत नाही. मी विधानसभेतही सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. क्रिया झाली की प्रतिक्रिया उमटते, यामुळे प्रत्येकाने (दोन्ही बाजूंकडील) जबाबदारीचे भान ठेवावे.

FIR registered
Goa Crime News : सात वर्षांच्या अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक

फा. परेरा यांची न्यायालयात धाव

फा. बोलमॅक्स परेरा यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून शिवप्रेमींच्‍या भावना दुखावल्‍याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्याने त्यांनी दक्षिण गोवा सत्र न्‍यायालयात धाव घेऊन आपल्‍याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. त्यांच्याविरुद्ध वास्को, कुंकळ्‍ळी, काणकोण व कुडचडे पोलिस स्थानकात शिवप्रेमींनी तक्रारी नोंद केल्‍या आहेत.

फा. परेरा यांनी जरूर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव ते एक थोर लढवय्ये व सर्वसमावेशक प्रशासक म्हणून केला असेल, परंतु हिंदू समाजाने त्यांना देव मानू नये, हे त्यांनी केलेले आवाहन विशेषतः ख्रिस्ती चर्चमधून करणे अत्यंत चुकीचे आहे.

असे कोणत्याही अन्य धर्मगुरूला सांगण्याचा मुळीच अधिकार नाही. शिवप्रेमींनीही हे प्रकरण शांततेने, सामंजस्याने संपवावे.

- डॉ. ऑस्कर रिबेलो, समाज कार्यकर्ते

लोक घरी बसून तमाशा बघणार नाहीत आणि व्हॉट्सॲपवर खेळणार नाहीत, तर वेळ पडल्यास जमिनीवर येतील. फादर बोलमॅक्स परेरा यांना प्रेम दाखवण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी चिखली येथे बऱ्याच लोकांचा पाठिंबा पाहून खूप आनंद झाला.

आमचे वकील या मुद्यावर चर्चा करीत आहेत आणि तार्किक निष्कर्षापर्यंत येऊन कायदेशीर कारवाई करतील.

- कॅप्टन विरियातो फर्नांडिस, काँग्रेसचे नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com