Goa Rain: गोव्यात गेल्या चार दिवसांपासून सत्तरी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. काल संध्याकाळी पाचच्या दरम्यान विजांच्या लखलखाट आणि वादळी वाऱ्यांसह आज सत्तरीतील अनेक भागाला पावसाचा तडाखा बसला. अर्धा तास पडलेल्या पावसामुळे वाळपई शहर जलमय झाले होते. पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.
ओवळे पिसुर्ले सत्तरी येथील वीज वाहिनीवर रानटी झाड पडलेल्या काही प्रमाणात वीज तारांचे नुकसान झाले आहे. तसेच वाळपई बीएसएनएल कार्यालया जवळ एका नागरिकाचा घरावर झाडाची फांदी पडल्याने छप्पराचे नुकसान झाले. यावेळी वाळपई (Valpoi) अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.
वांते येथे रस्ता गेला वाहून
रविवारी जोरदार पावसामुळे भिरोंडा पंचायत क्षेत्रातील वांते वरचावाडा येथे जवळपास 100 मीटर रस्ता वाहून गेल्याने या भागातील नागरिकांची मोठी अडचण झाली. रस्त्यावरून वाहणारा पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला मात्र तो अपयशी ठरला. पाण्याचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की नागरिकांचे प्रयत्न यासाठी अपुरे पडले.
पंचायतीचे सरपंच (Sarpanch) उदयसिंग राणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या संदर्भाची पाहणी केली व पाऊस संपल्यानंतर स्थानिकांनी या संदर्भात पुढाकार घेऊन तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. मातीचा भरावही टाकण्यात आला. रस्ता दुरुस्तीचे काम सुरु होते.
बागायतींचे नुकसान: सत्तरी तालुक्यात अनेक भागांमध्ये झेंडू फुलांची लागवड करण्यात आलेली आहे. सध्या झेंडू फुलण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे फुले कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
नाणूस येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे नागरिकांची दैनावस्था झाली. तेथील काही घरांमध्ये पाणी घुसून किरकोळ प्रमाणात नुकसानही झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.