Goa University गोवा विद्यापीठात आज गुरुवारी (ता.14) विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया सकाळी 11 ते दु. 1च्या दरम्यान पार पडणार आहे तसेच त्याचवेळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यापीठ निवडणुकीसंदर्भातील मागील महिन्याभरातील काही घटना पाहता विद्यापीठात निवडणूक प्रक्रियेदरम्यान किंवा निकालावेळी तणाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोवा विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने निवडणूक रद्द करण्यात आली होती. मात्र, पुन्हा निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकाऱ्यांनी घोळ घातला असून कुलसचिव प्रो. विष्णू नाडकर्णी तसेच कुलगुरू प्रो. हरीलाल मेनन प्रशासनावर वचक ठेवण्यात निष्क्रिय ठरत असल्याची टीका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संयोजक धनश्री मांद्रेकर यांनी केली आहे.
अभाविप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मांद्रेकर बोलत होत्या. यावेळी पणजी संयोजक वैभव साळगावकर उपस्थित होते.
दरम्यान, मांद्रेकर म्हणाल्या, निवडणूक अर्ज भरण्याचा कालावधी संपल्यानंतर एमबीए करणाऱ्या एका विद्यार्थ्याचे नाव घेण्यात आले आहे. अशा प्रकारचा घोळ निवडणूक यंत्रणेद्वारे घालण्यात आल्याने गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीत सगळा गोंधळ उडणार आहे.
‘राजकारणी प्राध्यापक’ : निवडणुकीच्या नावाखाली राजकीय पक्षांशी संबंधित असणारे काही ‘राजकारणी प्राध्यापक’ प्रसिद्धीच्या झोतात येऊ पाहत आहेत, त्यांनी विद्यापीठात राजकारण आणू नये.
विद्यार्थी कल्याण मंडळ निवडणूक प्रक्रियेत घोळ घालत आहे. ‘अभाविप’चा कार्यकर्ता असलेल्या विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक टार्गेट करून त्याचे करियर खराब करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप मांद्रेकर यांनी केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.