Goa Tourism Minister Rohan Khaunte Interview
पणजी: गोवा पर्यटनाबाबत एका पोस्टमुळे गेल्या गेल्या आठवड्यात चांगलाच वाद झाला. "परदेशी पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली आहे," अशी आकडेवारी एका पोस्टद्वारे शेअर करण्यात आली. या पोस्टवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
अनेक युजर्सनी गोव्यातील त्यांचे वाईट अनुभव देखील शेअर केले. या वादावर गोव्याच्या पर्यटन विभागाने स्पष्टीकरण दिले आणि पोस्ट लिहिणाऱ्या उद्योजकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केले. गोव्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा प्रकारच्या पोस्ट केल्या जातात. थायलंड आणि श्रीलंका यांसारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांशी गोव्याची तुलना करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
गोवा हे नेहमीच आवडते पर्यटन स्थळ राहिले आहे. मात्र दरवर्षी कोणीतरी याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. गेल्या वर्षीही काही लोकांनी गोव्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना यश आले नाही, असे खंवटे म्हणाले.
आम्ही विधानसभेत आणि बहुधा संसदेतही गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचे आकडे मांडले होते. आता अचानक एका सोशल मीडिया पोस्टमध्ये "चायना इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन सेंटर'च्या आकड्यांबाबत चर्चा झाली.
चीन आला की धोक्याची घंटा वाजते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या राज्याबद्दल खोटा प्रचार करणे ही एक योजना किंवा छुपा अजेंडा असल्याचे दिसते, असे खवंटे मुलाखतीत पुढे म्हणाले.
व्हायरल पोस्टमध्ये 2019 मध्ये गोव्यात 8.5 दशलक्ष परदेशी पर्यटक आल्याचा दावा केला होता, जो पूर्णपणे खोटा आहे, असे मंत्री खंवटे म्हणाले.
2019 मध्ये, महामारीपूर्वी, गोव्यात 71,27,287 देशी आणि 9,37,113 परदेशी पर्यटक आले होते. 2023 मध्ये देशी पर्यटकांची संख्या 81,75,460 आणि विदेशी पर्यटकांची संख्या 4,52,702 होती. कोरोनानंतर हे आकडे चांगले असल्याचा दावा खंवटे यांनी केला.
अशा खोट्या प्रचारामुळे स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आणि त्यामुळे सरकारला कारवाई करावी लागली. गोव्यात काही समस्या असल्याचे खंवटे यांनी कबुल केले पण, कोणत्याही पर्यटन राज्यात अशा समस्या सामान्य आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
खंवटे यांनी यावेळी राज्यातील बेकायदेशीर दलाल, टॅक्सी माफिया, विमान तिकीटदर आणि हॉटेल दर याबाबत देखील भाष्य केले. सरकार यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
काही सोशल मीडिया युझर्सनी गोव्याची श्रीलंका, थायलंड, मलेशिया आणि व्हिएतनाम सारख्या देशांशी तुलना केली, यावर बोलताना मंत्री खंवटे म्हणाले, “गोवा एक लहान राज्य आहे, ज्याची लोकसंख्या 15 लाख आहे.
परंतु राज्यात दरवर्षी 1 कोटी पर्यटक येतात. पण खोट्या आकडेवारीच्या आधारे गोव्याची इतर देशांशी तुलना केली जाते, हे गोव्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे दिसते, असे खंवटे यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.