Port Captain Terminal Building: पणजीतील बंदर कप्तान धक्क्यावर बांधमकाम करण्यात येणारी अत्याधुनिक टर्मिनल इमारात ही बंदर हाताळणी आणि पर्यटनदृष्ट्या राज्यासाठी लाभदायी ठरणार आहे. इमारतीत बंदर हाताळणीसाठी लागणारी सर्व साधनसुविधा आणि उपकरणे असणार आहेत. तसेच पर्यटकांच्या आकर्षणासाठी देखील सुविधा निर्माण केली जाणार आहे, अशी माहिती बंदर कप्तान खात्याचे सागरी अभियंता आणि जहाज सर्वेक्षक ऑक्टाव्हियो रॉड्रिग्स यांनी ‘ दै. गोमन्तक’ला दिली.
नवीन धक्का बांधल्यानंतर त्याचा भाग म्हणून टर्मिनल इमारत बांधली जात आहे. इमारतीचे 65 टक्के काम झाले असून डिसेंबर 2022 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जहाजाचा आकार असलेली दोन मजली इमारत असणार आहे, तसेच एक लहान मेझानाइन मजला देखील असणार आहे.
प्रवाशांसाठी विश्रामगृह आणि एक रेस्टॉरंट इमारतीत येणार आहे. एकदा इमारत कार्यरत झाल्यानंतर येथे जकात, इमिग्रेशन आणि बंदर कप्तान खात्यांची कार्यालये असतील, असे रॉड्रिग्स यांनी सांगितले.
टर्मिनल इमारत कार्यरत झाल्यानंतर बंद पडलेला गोवा-मंबई जलमार्ग पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. अगोदर हा जलमार्ग सुरू असताना राज्यातील किनाऱ्यांचे सौंदर्य पाहण्याची संधी जलमार्गातून प्रवास करणाऱ्यांना मिळत होती. तेव्हा गोवा-रत्नागिरी-मंबई या जलमार्गाने जहाज जात होते. ही सेवा सुरू केल्यास पर्यटनदृष्ट्या त्याचा फायदा होणार आहे.
किनारा सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर
टर्मिनल इमारतीला आंतरराष्ट्रीय जहाज आणि बंदर सुरक्षा संहिता (आयएसपीएससी) मान्यता प्राप्त होणार असून आयात आणि निर्यात करणाऱ्या जहाजांमध्ये समन्वय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
इमारतीत बंदर सर्व्हेलन्स प्रणाली, रडार, दिवस आणि रात्री सीसीटीव्ही, हवामान निरीक्षण, स्वयंचलित ओळख प्रणाली, व्हीएचएफ संचार संपर्क प्रणाली असल्याने राज्यातील बंदर हाताळणी आणि किनारी सुरक्षेसाठी फायदेशीर ठरणार आहे.
सरकारला महसूल प्राप्त होईल
टर्मिनल इमारतीत लाँच आणि बार्ज मालक संघटनेची, तसेच गोवा खनिज निर्यात संघटन यांची कार्यालये भाडेेपट्टीवर असणार आहेत. येथे अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली असून तिकीट प्रणालीही असणार आहे. ज्याने सरकारला महसूल प्राप्त होईल. तर रेस्टॉरंटमध्ये येऊन मांडवी नदीच्या किनाऱ्यावर जेवण्याची संधीदेखील पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.