
गोव्यातील पर्यटनाबद्दल कर्नाटकातील काँग्रेस प्रवक्ते टायगर अली यांनी हल्लीच आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. गोव्यात जे पर्यटक येतात, ते फक्त दारु पिण्यासाठी येतात आणि दारु प्यायलेल्या पर्यटकांना अडवून गोव्यातील वाहतूक पोलिस त्यांना दंड ठोठावतात, असे त्यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे. यामुळेच गोव्यात पर्यटक येत नसून ते थायलंड आणि व्हिएतनाममध्ये जाताहेत. गोव्यात जर काँग्रेस सत्तेवर आला तर कुठेही दारु पिण्याची मोकळीक असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. आता या ‘टायगर अली’ला गोव्याची संस्कृती म्हणजे फक्त बेवड्यांची संस्कृती असे वाटले आहे का?, की त्यांना गोवाही थायलंड आणि व्हिएतनामसारखा करायचा आहे? या व्हिडिओमध्ये गोव्यातील पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्यावरही दुगाण्या झाडल्या आहेत. खवंटे यांची बदनामी करण्यामागे आणखी काही प्लॅनिंग लपलेले आहे का?, की खवंटे यांना पर्यटन मंत्रिपदावरून हटवून आणखी कुणाला बसवायचे, हे षडयंत्र यामागे आहे का? ∙∙∙
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राजधानी पणजीत विविध ठिकाणी खोदकामे सुरू आहेत. त्यामुळे धूळ प्रदूषण वाढले आहे. त्यावर पाणी फवारण्याची हमी संबंधित अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाला दिली आहे. मात्र ही फवारणी क्वचितच पणजीत केली जाते. मात्र मिरामार येथे आमदारांच्या कार्यालयासमोर धूळ उडू नये, म्हणून दिवसभर टँकरने फवारणी होताना दिसते. त्यामुळे मिरामार वगळता इतर भागात धूळ प्रदूषण होत नाही का? अशी चर्चा होत आहे. काही भागात कमी पाणी पुरवठा होत असताना या आमदारांच्या कार्यालयासमोर मात्र संंबंधित अधिकाऱ्यांकडून धूळ उडू नये म्हणून टँकर तैनात असतो. आमदारांकडून फोन येईल, याची या अधिकाऱ्यांना भीती असते. पणजी महापालिका ही याच आमदाराच्या सत्ताधारी गटाकडे आहे. त्यामुळे त्यांना समस्या होऊ नये याची बडदास्त ठेवताना इतर भागामधून जाताना चालकांना तसेच पादचाऱ्यांना या धुळीचा त्रास सोसत पुढे जावे लागते. ∙∙∙
‘कर नाहीं त्याला डर कशाला ?’ अशी एक म्हण आहे. वीज खात्याचे अधिकारी काशिनाथ शेट्ये यांच्या कामाची स्टाईल मंत्री आमदारांना जरी पचनी पडत नसली, तरी आम जनता मात्र त्यांच्या कार्याची तोंड भरून स्तुती करत आहे. काशिनाथ यांनी इंटरनेट केबलवाल्यांना आपला इंगा दाखवलाच.आता मंत्री आमदारांनी केबलवाल्यांपुढे गुडघे टेकवले त्याला काशिनाथ काय करणार? काशिनाथ यांनी लगेच वास्को येथील वीज खात्याच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेतल्यावर जनतेचा कैवारी म्हणवणाऱ्या संकल्प आमोणकरांनी रोडा टाकला. मात्र, शेट्ये डगमगले नाहीत.एक मात्र खरे काशिनाथ शेट्येंसारखे अधिकारी सगळ्या खात्यात असल्यास गोवा आदर्श राज्य बनण्यास वेळ लागणार नाही. जनतेला आदर्श प्रजेचे डोस पाजववणाऱ्या राजकारण्यांनी स्वतः आपल्या पायाकडे पहावे व चांगल्या अधिकाऱ्यांना मुक्त हात द्यावा, अशी टिपणी नेटिझन्स सोशल मीडियावर करताहेत. ∙∙∙
काल कार्निव्हल मिरवणुकीच्या निमित्ताने मडगाव पालिकेच्या आयोजन समितीने पत्रकार परिषद आयोजित केली असता नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आयाेजन समितीचे अध्यक्ष असलेले नगरसेवक कामिल बार्रेटो यांचे काैतुक करताना ते धडाडीचे आयाेजक आहेत, असे सांगितलेच. त्याशिवाय कधी कुणाच्या नशिबी काय आहे हे सांगता येत नाही, असे सूचक बोलही काढले. यापूर्वी हेच कामिलबाब आपल्याला मडगावचे नगराध्यक्ष करा म्हणून भाजप पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणे घालत होते. पण आता ते शांत आहेत. अशीही एक वावडी पसरली आहे, ती म्हणजे, पुढच्या निवडणुकीच्यावेळी फाताेर्डा मतदारसंघ हा एसटीसाठी राखीव असणार. कामिल हे स्वत: एसटी समाजाचेे असल्याने भाजपच्या उमेदवारीवर त्यांचा डाेळा आहे. कामिल जरी नगराध्यक्ष झाले नाहीत, तरी आमदार होऊ शकतात, असे शिराेडकर यांना म्हणायचे आहे का? ∙∙∙
म्हापसा पालिकेतील गेल्या चार वर्षांत चौथा नगराध्यक्ष शहरवासीयांनी शुक्रवारी पाहिला. अशातच, पायउतार झालेल्या डॉ. नूतन बिचोलकरांनी पदभार सोडतेवेवळी सत्ताधारी गटाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही असा आरोप केला होता. सध्या भाजप गटाचे वर्चस्व पालिकेवर आहे. परंतु, बिचोलकरांनी विरोधी पॅनेलकडून निवडणूक लढविली होती. नंतर त्या भाजपवासी झाल्या. अशातच बिचोलकरांनी केलेल्या विधानावर टीका करताना, नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकरांनी म्हटले की, कदाचित त्या आमच्या कंपनीत असत्या तर स्थिती वेगळी असती. शेवटी कंपनी मॅटर करते. त्यांनी आम्हाला सोडून राजकारणच केले. आणि राजकारणात टीका करण्यासोबत ती सोसण्याची क्षमता प्रत्येकात असावी. त्यामुळे आगामी पालिका निवडणूकीत बिचोलकर या नक्की कुणासोबत थांबतात की सक्रिय राजकारणापासून दूर राहणे पसंत करतात, हे भविष्यात समजेलच. ∙∙∙
कार्यकारी अभियंता काशीनाथ शेटये यांनी वास्कोत वीज खात्याच्या मालमत्तेतून जाणाऱ्या चारपैकी एक मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यांना संतप्त जमावाला सामोरे जावे लागले आहे. या प्रकरणाची वीज खाते आता कशी दखल घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वीज खांबांवर बेकायदेशीरपणे लोंबळणाऱ्या केबल कापणे सुरु केल्यावर शेटये यांच्या वाट्याला काय आले ते सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे आताही वास्को प्रकरणातून त्यांना दूर केले जाणार आहे का, असा प्रश्न चर्चेत आला आहे. शेटये यांची आजवरची कामगिरी पाहता ते वास्को प्रकरण हलक्यात घेणार नाहीत, हे स्पष्टच आहे. तरीही खाते त्यांना कारवाईसाठी किती मोकळीक देईल यावरच सारेकाही अवलंबून आहे. ∙∙∙
राज्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम घिसाडघाईने सुरू आहे. हे काम करताना स्थानिक पंचायत किंवा नागरिकांना विश्वासात घेतले जात नाही, त्यामुळेच अनेक प्रश्न उद्भवत आहेत. बेतोडा भागातील मुख्य रस्त्यावर तर कायम अपघातांचे सत्रच सुरू आहे. या ठिकाणी सिग्नल्स बसवण्यासाठी स्थानिक पंचायत आपल्यापरीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे सरपंचांनी सांगितले, पण त्याला आज, उद्या असे करत वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जात आहेत. केरये - खांडेपार येथील चौपदरी रस्त्याचे कामही तसेच आहे. या ठिकाणी किती रस्ते आणि किती वाटा तेच कळेनासे झाले आहे. प्रत्येक ठिकाणी मन मानेल, तसे काम सुरू आहे, पण सरकारही कान, नाक, डोळे बंद करून आहे, मग सर्वसामान्यांनी करायचे तरी काय? ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.