Goa Christmas 2023: वर्षअखेरीस देशी पर्यटकांची ‘गाज’; किनारे हाऊसफुल्‍ल

Goa Christmas 2023: हॉटेल-विमानांचे दर गगनाला; ‘सेकंड होम्स’चीही चलती
Goa Christmas 2023
Goa Christmas 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

धीरज हरमलकर

Goa Christmas 2023: ख्रिसमस व नववर्षाच्‍या पार्श्वभूमीवर गोवा हाऊसफुल्‍ल होत असून, किनारी भागांत पर्यटकांची गर्दी वाढली आहे. हॉटेल्‍सच्‍या दरांत दोन ते तीन पटींनी वाढ झाली आहे, तर विमानांच्‍या तिकिटांतही वृद्धी झाली आहे.

पंचतारांकित हॉटेल्‍सचे बुकिंग अनपेक्षितपणे वाढले आहे, तर मध्‍यम श्रेणीतील हॉटेल्‍सना तुलनेत कमी प्रतिसाद आहे. उत्तर गोव्‍यात फ्‍लॅट्स आणि सेकंड होम्‍सचाही भाडे तत्त्वावर वापर होत आहे.

आंतरराष्‍ट्रीय पर्यटक घटले असले तरी देशी पर्यटकांमुळे यंदा वर्षअखेरीला राज्याला दिलासा मिळाला आहे.

डिसेंबरमध्ये आतापर्यंत ६ लाख पर्यटकांनी गोवा दर्शन केले असून, जानेवारीच्‍या पहिल्‍या आठवड्यात ही संख्‍या १२ लाखांचा आकडा ओलांडेल, असा पर्यटन क्षेत्रातील जाणकार अंदाज वर्तवतात.

पर्यटकांची संख्‍या वाढत असली तरीही कोविडपूर्व काळाप्रमाणे अद्याप गती नाही, असाही सूर काही व्‍यावसायिक व्‍यक्‍त करत आहेत.

दाबोळीवर ६५ ते ७० उड्डाणे

दाबोळी विमानतळाचे कार्यकारी प्रभारी संचालक जयरंजन सांगतात, डिसेंबरात दररोज ६५ ते ७० उड्डाणे होत आहेत. बहुतांश देशांतर्गत उड्डाणे मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद येथून येत आहेत.

तर दर आठवड्याला दुबई, दोहा, बहरीन, शारजाह आणि रशिया येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत आहेत. दाबोळीवर दरदिवशी सरासरी १० ते ११ हजार पर्यटक येतात.

टॅक्‍सी व्‍यावसायिकांना धास्ती

पर्यटन टॅक्सीमालक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत म्हणाले की, हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत. त्यावर पर्यटन विभागाचे नियंत्रण नाही. साधारणत: ४ हजार रुपये प्रतिदिन भाड्याच्या खोलीसाठी आता तिप्पट दर आकारला जात आहे.

वागातोरमध्ये ‘सनबर्न’साठी बहुसंख्य देशी पर्यटक आले आहेत. पण खाण्या-पिण्याचे दर खूपच आहेत. याचा अप्रत्यक्षपणे टॅक्सी व्यवसायावर परिणाम होत आहे. तरीही या आठवड्यात चांगला व्यवसाय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

यंदा चार्टर्ड नव्‍हे, शेड्यूल फ्लाईट्स

सेराफिन कोता म्हणाले की, यावर्षी बहुसंख्य रशियन पर्यटक चार्टर्ड फ्लाईट्सने नव्हे, तर शेड्यूल फ्लाईट्सने प्रवास करत आहेत. यापूर्वी पर्यटक परतीच्या फ्लाईटसह दीर्घ कालावधीसाठी हॉटेलचे बुकिंग करत.

त्यामुळे राज्याला चांगला महसूल मिळत असे. गोव्याच्या शॅक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून गोव्याच्या किनाऱ्यांवर फारसे पर्यटक नव्हते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून गर्दी वाढली असून पर्यटक शॅक्सला भेट देत आहेत.

लग्नांचे बेत

जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात अनेकांनी गोव्यात लग्नाचे बेत आखले आहेत. अनेक पर्यटक रस्तामार्गे गोव्यात येत आहेत.

डिसेंबर महिन्यात आतापर्यंत सुमारे ६ लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही संख्या १२ लाखांहून अधिक होण्याची शक्यता आहे.

- नीलेश शहा, टीटीएजी.

Goa Christmas 2023
Nitin Gadkari: नेहरूंचे मॉडेल अपयशी, त्यातून केवळ विदेशी कंपन्यांची भरभराट झाली; मात्र आमचे मॉडेल सर्वोत्तम!

हॉटेल्‍सची स्‍थिती आणि नवे पर्याय

दक्षिण गोवा हॉटेल्स असोसिएशनचे संचालक सेराफिन कोता यांनी माहिती दिली की, दक्षिण गोव्यातील पंचतारांकित हॉटेल्सना पर्यटक मिळत आहेत. मात्र मध्यम हॉटेल्स अर्धी रिकामी आहेत.

जे रशियन पर्यटक दक्षिण गोव्यातील मध्यम दर्जाच्या हॉटेल्समध्ये राहण्यासाठी येत असत ते आता फ्लॅट्स आणि सेकंड होम्सकडे वळले आहेत. ते ऑनलाईन शुल्क घेतात आणि त्यांची जागा परदेशी लोकांना भाड्याने देतात.

त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. सोमवारपासून दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी वाढेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

Goa Christmas 2023
Goa Police: हणजुणेत 1 लाखाचे ड्रग्ज जप्त; राजस्थानच्या युवकास अटक

‘मोपा’वर दिवसाला १५ हजार पर्यटक :

मोपावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, तेथून दररोज सरासरी १०० उड्डाणे होत आहेत. वर्षाच्या अखेरीस दररोज सुमारे १५ हजार पर्यटक येतील. हे बहुतेक देशी पर्यटक आहेत.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर युनायटेड किंगडम, यूएई आणि कझाकीस्तान येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतात आम्हाला २४ ठिकाणांहून देशांतर्गत उड्डाणे मिळत आहेत. विशेषत: दिल्ली, मुंबई येथून, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रविवारपासून देशांतर्गत आणि विदेशी विमानांचे दर चढेच

ऑनलाईन आकडेवारीनुसार, रविवारी इकॉनॉमी क्लासचे देशांतर्गत फ्लाईटचे असे दर होते

दिल्ली ते गोवा- १० हजार ५०० ते २२ हजार ५००

मुंबई ते गोवा - ७ हजार ५०० ते २४ हजार ५००

बंगळुरू ते गोवा- ४ ते ११ हजार ५००

कोलकाता ते गोवा- ८ हजार ५०० ते २९ हजार ५००

रविवारी इकॉनॉमी क्लासचे आंतरराष्ट्रीय

विमान दर असे होते (ऑनलाईन)

लंडन ते गोवा- १ लाख ३ हजार ५०० ते २ लाख १४ हजार

दुबई ते गोवा - १२ हजार ५०० ते ७१ हजार ५००

न्यूयॉर्क ते गोवा- ८७ हजार ५०० ते ८ लाख ४५ हजार

सिंगापूर ते गोवा- २० हजार ५०० ते ७३ हजार ५००

दक्षिण आफ्रिका ते गोवा - ५८ हजार ते १ लाख ५ हजार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com