
पणजी: इमारतींमधील कार्यक्रमांना रात्री नियमांचे पालन करत अमर्याद वेळेसाठी तर बाह्य भागातील कार्यक्रमांना ध्वनिमर्यादेसाठी रात्री १० ऐवजी ११ वाजेपर्यंत परवानगी देण्याचा विचार करावा, असे मत पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांची संघटना ‘ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा’ने (टीटीएजी) विधानसभा चर्चेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे.
संघटनेने ध्वनिमर्यादा वाढवण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, योग्य परवानगी व ध्वनिरोधक सुविधा असलेल्या इमारतींमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून रात्री कोणत्याही वेळेपर्यंत कार्यक्रम घेण्याची परवानगी द्यावी. यामुळे निवासी भागांना कोणताही त्रास होणार नाही, असा दावा संघटनेने केला आहे.
इमारतीच्या बाह्य भागात व उघड्यावरील स्थळांसाठी मात्र सध्याची रात्री १० वाजताची मर्यादा वाढवून ती केवळ ११ वाजेपर्यंतच ठेवावी, असे मत ‘टीटीएजी’ने नोंदवले आहे. कायद्यानुसार परवानगी असलेल्या डेसिबल पातळीचे काटेकोर पालन होणे गरजेचे असल्याचेही संघटनेने नमूद केले. ११ वाजल्यानंतरची परवानगी देऊ नये. कारण त्यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो, असे ‘टीटीएजी’चे मत आहे.
हणजुणे, वागातोर व तत्सम भागांत ध्वनी प्रदूषणावरील सातत्याने येणाऱ्या तक्रारी व न्यायालयीन प्रकरणांचा संदर्भ देत, अशा ठिकाणी नियमांचे कडक पालन करण्याची मागणीही करण्यात आली. ‘टीटीएजी’ने यापूर्वीही सरकारकडे रात्री ११ वाजेपर्यंत ध्वनिमर्यादा आणि मध्यरात्रीपर्यंत
मद्यविक्रीसाठी परवानगी देण्याची मागणी केल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे कार्यक्रम, रेस्टॉरंट्स, शॅक्स तसेच इनडोअर आणि आऊटडोअर स्थळांना लाभ होईल, तसेच जवळच्या निवासी भागांच्या समस्या लक्षात घेतल्या जातील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला.
गेल्या काही वर्षांत याच काळात अनेक लहान स्वरूपाचे उत्सव आणि कार्यक्रम राज्यात सुरू झाले असून, ते विविध ठिकाणी विखुरलेले असल्याने स्थानिक व्यवसायांना लाभ मिळतो आणि गर्दीचा ताण एका भागावर पडत नाही. डिसेंबरअखेर ते नववर्ष या आधीच गजबजलेल्या काळात अशी विखुरलेली आणि लहान स्वरूपातील आयोजन पद्धतीच योग्य दिशेने जाणारा मार्ग असल्याचे ‘टीटीएजी’ने स्पष्ट केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सनबर्न उत्सवाबाबत सरकारकडून शेवटच्या महिन्यापर्यंत स्पष्ट भूमिका न घेता आयोजक आणि तिकीटधारकांना अनिश्चिततेत ठेवण्यात आल्याची टीका पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संघटना ‘टीटीएजी’ने केली आहे. हा उत्सव गोव्यातील स्थानिक व्यवसायांना आर्थिक लाभ देतो; परंतु एका ठरावीक भागात मोठी गर्दी झाल्याने तेथील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, असे संघटनेने नमूद केले. इतक्या मोठ्या प्रमाणातील उत्सवासाठी सनबर्न आणि सरकारने संयुक्तपणे नियोजन करणे आवश्यक असतानाही, ते अपेक्षेप्रमाणे झालेले नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.