
Goa minister conflict over tourism defamation toolkit
पणजी: गोव्यात ‘टूलकिट’चा वापर करून पर्यटन क्षेत्राची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप झाल्यानंतर मंत्रिमंडळातील धुसफूस सामोरे आली आहे. मंत्रिमंडळात पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आणि क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचा गट असून ते मुख्यमंत्र्यांचे समर्थक आहेत.
गोव्याकडे श्रीमंत पर्यटकांनी पाठ फिरविली असून या राज्यातील पर्यटन कोसळले असल्याची एक मोहीम डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली होती. ही मोहीम फसवी आणि बदनामीकारक असल्याचे पर्यटनमंत्र्यांचे म्हणणे आहे. स्वत: त्यांनीच ही मोहीम एका उच्चपदस्थाच्या पाठिंब्याने चालविल्याचा आरोप गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केला. त्यावेळी ही व्यक्ती म्हणजेच खुद्द मंत्री असल्याचे समजताच बाबूश मोन्सेरात यांनी त्याचे नाव जाहीर करण्याचा आग्रह बैठकीत धरला होता.
‘गोमन्तक’ने या मंत्र्यांकडे ‘हा मंत्री कोण’, असा सवाल केला असता, कोणीही त्याच्या नावाची वाच्यता केली नाही. मात्र, सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री विश्वजीत राणे यांच्यात शीतयुद्ध सुरू असून मंत्रिमंडळ बैठकीतील धुसफूस हा त्याचाच भाग होता. या बैठकीला विश्वजीत राणे उपस्थित नव्हते.
मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समर्थकांचा गट प्रबळ बनला असून समर्थकांमध्ये आता जीत आरोलकर यांचीही भर पडली आहे. जीत आणि सनबर्न आयोजकांमध्ये झालेल्या वादात मुख्यमंत्र्यांनीच समेट घडवून आणला होता. रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, गोविंद गावडे आणि जीत आरोलकर असा हा समर्थक गट आहे.
सध्या मंत्रिमंडळातील समर्थक गटात सतत वाढ होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील बदलाच्या प्रश्नाकडे संपूर्णत: काणाडोळा केला आहे. बदल झालाच तर त्यात दिगंबर कामत आणि नीलेश काब्राल यांना घ्यावे लागेल. त्यावेळी काब्राल यांचे सार्वजनिक बांधकाम खाते त्यांना द्यावे लागेल. स्वत:कडचीच काही खाती मुख्यमंत्र्यांना सोडून द्यावी लागतील.
मुख्यमंत्री नाराज असले तरी दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री विश्वजीत राणे यांच्या कोणत्याही खात्यात किंवा त्यांच्या ज्येष्ठतेत ते बदल करू शकत नाहीत, अशीच परिस्थिती आहे. पर्यटन खात्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग असल्याचा आरोप झाल्यानंतर काहींना पक्षश्रेष्ठींकडून जाब विचारला जाईल, हा तर्क फसला असून प्राप्त परिस्थितीत विश्वजीत राणे यांच्या पक्षश्रेष्ठींकडील संबंधांना अजिबात तडा गेलेला नाही, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
‘‘पक्षश्रेष्ठींचे संपूर्ण कवच विश्वजीत राणेंना लाभले असून त्यांनी संघटनात्मक कार्य, पक्षसदस्य नोंदणी व राज्याबाहेरील निवडणुकांमध्ये बजावलेली भरीव कामगिरी यांवर पक्षश्रेष्ठी खूश आहेत. वास्तविक विश्वजीत राणे सगळ्या मंत्रिमंडळाच्या बैठका किंवा अन्यत्र होणाऱ्या पक्षाच्या बैठकांनाही उपस्थित राहात नाहीत; परंतु त्यांचे आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे वैयक्तिक संबंध संपूर्ण सलोख्याचे आहेत,’’ अशी माहिती एका ज्येष्ठ सदस्याने ‘गोमन्तक’ला दिली. मुख्यमंत्र्यांशी मात्र राणेंचे संबंध ताणलेले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गेल्या आठवड्यात संपन्न झालेल्या अनुष्ठान कार्यक्रमाला अनेक मंत्री आणि भाजप सदस्य उपस्थित राहिले; परंतु राणे दाम्पत्याने हा कार्यक्रम टाळला, ज्याची चर्चा पक्षात सुरू होती.
पक्षात पर्यटन क्षेत्रातील घसरत्या लोकप्रियतेचीही चर्चा आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हॉटेलांमधील घटती संख्या हा विषय ऐरणीवर होताच; त्यासाठी ‘टूलकिट’ वापरण्याची गरज नव्हती, असे भाजपमधील अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे. गोव्यात येणाऱ्या देशांतर्गत विमानांचीही संख्या घटली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
दुसऱ्या बाजूला, मंत्रिमंडळात बदल झाल्यास आपल्याला अर्धचंद्र देण्याची शक्यता लक्षात घेऊन रवी नाईक यांनी आपले ठेवणीतले अस्त्र बाहेर काढले. त्यांनी रूद्रेश्वर यात्रेच्या निमित्ताने आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. तोही पक्षात चर्चेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बदलासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी विषय काढणेच टाळले आहे.
‘टूलकिट’च्या प्रश्नावर ज्या चर्चा किंवा बातम्या सुरू आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. हा काही प्रसार माध्यमांनी तयार केलेला मुद्दा आहे. मी काही दिवस राज्याबाहेर होतो; परंतु परतल्यानंतर मी या प्रकरणाचा शोध घेतला. ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यांच्याशी बोलून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मनातील संशय दूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे शनिवारी डिचोली येथे पत्रकारांना म्हणाले.
गोव्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे पुढची दोन वर्षे कायम राहतील, अशीच परिस्थिती आहे. डॉ. प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे या दोघांचीही पसंती त्यांना आहे व राज्यात संघटनमंत्री नसताना तानावडे यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली. गेली आठ वर्षे राज्यात वैशिष्ट्यपूर्ण कार्य केले, असा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे गेला आहे.
‘‘प्रदेशाध्यक्ष पदाच्या नेमणुकीसाठी तानावडे, ॲड. नरेंद्र सावईकर आणि दामू नाईक हेच खरे स्पर्धक आहेत, तर सहाजणांची पाठवलेली नावे ही केवळ ‘गंमत’ आहे,’’ अशी प्रतिक्रिया एका नेत्याने व्यक्त केली. २०२७ मध्ये विधानसभेची निवडणूक होईल, पुढची दोन वर्षे अध्यक्षपदी तानावडेच राहिले तर सुसूत्रता कायम राहील, असा पक्षातही विचारप्रवाह आहे, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.