Goa: मुरगाव पालिका (Mormugao Municipality) मंडळाचा कार्यकाळ संपून नविन कार्यकाळ सुरू झाला तरी मुरगाव पालिकेला वास्कोतील पालिका बालोद्यानाच्या (Vasco Children Park) दुरुस्तीकडे एकदाही लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. तथापि, येत्या निवडणुकीत त्या उद्यानाची दुरुस्ती व सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन इच्छुक उमेदवारांकडून मिळेल यात शंकाच नाही. गेल्या चार वर्षांपासून या उद्यानाची दुरुस्ती व सौंदर्यीकरण करण्यात आले नाही, यावरून पालिका मंडळाच्या विकासकामाची कल्पना येते.
वास्कोतील पालिका बालोद्यानात लहान मुलांसाठी माजी नगरसेवक कृष्णा साळकर (Former Corporator Krishna Salkar) यांनी सीएसआर अंतर्गत झुवारी ऍग्रोकेमिकल्स (Zuari Agro Chemicals) या कंपनीकडून झोपाळे, घसरगुंडीची व इतर मुलांना खेळण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची सोय करण्यात आली होती. पण या साहित्यांची दोन वर्षापूर्वी मोडतोड झाली आहे.
तेथील झोपाळे गायब झाले आहेत. तर काही मोडकळीस आले आहेत. त्यामुळे लहान मुलांनी झोका घेण्यासाठी तेथे दोरखंडाचा उपयोग करून झोके घेण्यास आरंभ केला आहे. तसेच तुटलेल्या झोपाळ्यांच्या लोखंडी कांबीला लोंबकळून मुले झोके घेत असल्याचे दृश्य दिसत आहे.
तसेच घसरगुंडी तेथे आहे. तथापि तिच्या तळभागाची मोडतोड झाली आहे. त्यामुळे येथे घसरगुंडी करणाऱ्यांना जखमा होत आहेत. येथील शोभिवंत झाडांचीही दुर्दशा झाली असून त्याकडे मात्र कोणीच लक्ष देत नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच येथील शौचालयही मोडकळीस आले आहे. या ठिकाणी सेक्युरीटी सुद्धा तैनात नाही. एकंदर हे बालोद्यान आहे की, एखादे माळरान आहे हे समजण्यास मार्ग नाही. हे बालोद्यान प्रेमीयुगुलांचे अड्डा बनले आहे. या बालोद्यानाची संरक्षक भिंत मोडकळीस आली आहे. येथे कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. या बालोद्यानाची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी सतत मागणी करण्यात आली होती. तथापि, या बालोद्यानाची दुरुस्ती न करण्यामागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
दरम्यान, उद्यानात खेळण्यासाठी येणारी मुले तुटलेल्या झोपाळ्यांच्या लोखंडी दांड्यांना लोंबकळून आपली हौस भागवीत आहेत. तसेच याठिकाणी असलेली मोठे वृक्ष, माड कर्दनकाळ स्वरुपात उभे आहेत. ते कधी आडवे होणार याची शाश्वती नाही. त्याठीकाणी येणाऱ्यांना ते धोकादायक बनले आहे. कोरोना महामारी पासून थोडीफार उसंत मिळाली असल्याने या बालोद्यानात किलबिलाट सुरू झाला आहे. लहान मुलांना घेऊन पालक बालोद्यानात येतात. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे येथे येणाऱ्यामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
माजी नगरसेवक कृष्णा साळकर यांना या विषयी विचारले असता बालोद्यानाची दुरुस्ती करण्यासाठी झुवारीनगर येथील झुवारी ऍग्रोकेमिकल्स कंपनीने पुढाकार घेतला होता. यापुर्वीही त्याच कंपनीकडून या बालोद्यानात उपकरणे बसविण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीमुळे सदर बालोद्यानाचा यावेळी विकास झाला नाही. सदर बालोद्यान विकसित करण्यासाठी आपण तयार असल्याचे त्या कंपनीने सांगितले आहे. त्यानुसार येत्या दीड महिन्यात या उद्यानाला नवे स्वरूप येणार असल्याचे ते म्हणाले.
नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सांगितले की, सदर बालोद्यान विकसित करणे गरजेचे आहे. लोकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यानुसार लवकरच या बालोद्यानाचे काम हाती घेतले जाईल व तिथल्या अडीअडचणी दूर केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.