पेडणे: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यवसाय करणाऱ्या टॅक्सी व्यावसायिकांच्या आंदोलनाचा आता मानापमान नाट्याचा अंक सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटण्यासाठी २५ जणांचे जंबो शिष्टमंडळ या आंदोलनकर्त्यांनी पणजीत आणले खरे, पण मुख्यमंत्र्यांनी केवळ १० जणांनाच आपली भेटण्याची तयारी आहे असे सांगितल्याने ते शिष्टमंडळ आता माघारी गेले आहे. यामुळे त्यांच्या आंदोलनाचे पुढे काय होणार असा प्रश्न आज (23 ऑगस्ट) सायंकाळी निर्माण झाला आहे.
या टॅक्सी व्यावसायिकांनी विमानतळावरील पार्किंग शुल्क कमी करावे, प्रवाशांना पोचवण्यास गेल्यानंतर तेथे टॅक्सी थांबवण्याच्या वेळात वाढ करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले होते. या प्रमुख दोन मागण्या सरकारने कालच मान्य केल्या आहेत. पार्किंग शुल्क वाढीव २०० रुपयांवरून ८० रुपये, तर टॅक्सी थांबवून ठेवण्याचा वेळ १० मिनिटे करण्यात आला. यामुळे टॅक्सी व्यावसायिक आंदोलन मागे घेतील असे सरकारला वाटले होते.
पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदारांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, ते आंदोलन थांबवू शकले नाहीत. पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर हे सत्ताधारी भाजपचे, तर मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या मगोचे आमदार आहेत.
आर्लेकर यांनी मुख्यमंत्री पेडण्यात विश्रामगृहावर येऊन आंदोलकांना भेटतील असे परस्पर आश्वासन दिले होते. आरोलकर यांनी थोडा समंजसपणा दाखवत मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घडवून आणतो असे नमूद केले होते. आंदोलकांत मांद्रेचे माजी सरपंच अमित सावंत आहेत.
आंदोलन राजकीय प्रेरीत असल्याचा निष्कर्ष
मांद्रे पोलिस ठाणे उद्घाटन सोहळ्यात आपल्याला सरकारने डावलल्याची मांद्रेचे माजी सरपंच अमित सावंत यांची भावना आहे. या ठाण्याच्या उद्घाटन सोहळ्याच्या पाटीवर आपले नाव कोरले गेले नसल्याने त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही तक्रार केली होती. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरून काल रात्री उशिरा गोव्यात आले.
आज (शुक्रवारी) सकाळी त्यांनी आंदोलनाची माहिती घेतल्यावर त्यांना आंदोलकांत अमित सावंत असल्याचे समजले. त्यामुळे ते आंदोलन राजकीय प्रेरीत असल्याचा निष्कर्ष काढला. काही जणांना (अमित सावंत वैगेरेंना) आमदार होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत असा टोलाही त्यांनी हाणला आणि आंदोलक भेटीसाठी आल्यास चर्चेची तयारी असल्याचे नमूद केले.
त्यानुसार २५ जणांचे शिष्टमंडळ पणजीत थडकले. मात्र, १० जणांनाच प्रवेश देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अटीमुळे ते माघारी फिरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.