पणजी: राज्यात (Goa) सध्या डिजिटल मीटर्स (Digital Meter) बसविण्यावरून विरोध सुरू आहे. गोवा माईल्स (Goa Miles) किंवा ‘ॲप ॲग्रिगेटर्स’वर (App Aggregators) जोपर्यंत बंदी घातली जात नाही तोपर्यंत मीटर्स बसवणार नसल्याच्या भूमिकेबाबत टॅक्सीचालक ठाम आहेत. अशावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त टॅक्सीचालकांना अनोखी भेट दिली. डिजिटल मीटर्स बसविण्याच्या शुल्कात 50 टक्के सवलत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची घोषणा केली. (Goa Taxi: 50 percent discount on digital meter charges)
डिजिटल मीटर्स लागू करण्याचा निर्णय सरकारने घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. काहींनी मीटर्स बसविण्यासाठीची नोंदणी करण्यास सुरवात केली आहे. मीटर्ससाठीचे शुल्क टॅक्सीचालकांना भरण्यास सांगून त्यानंतर ती दोन टप्प्यात परत करण्याची योजना होती. मात्र त्यामध्ये थोडा बदल करण्यात आला आहे.
काहींकडून मीटर्स बसविण्यासाठीची नोंदणी सुरू
सध्या डिजिटल मीटर्ससाठी टॅक्सीचालकांना 11 हजार रुपये शुल्क घेण्यात येत होते व त्यातील 50 टक्के रक्कम मीटर्स बसविल्यावर त्यांच्या खात्यामध्ये तीन आठवड्यांत जमा केली जाणार होती. उर्वरित एका वर्षाने जमा केली जाणार होती. मात्र आता टॅक्सीचालकांना 11 हजारांपैकी फक्त अर्धी रक्कम म्हणजे 5,500 रुपये भरावे लागणार आहेत व ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये एका वर्षानंतर जमा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आज घेणार निर्णय
यासंदर्भात टॅक्सीचालकांशी चर्चा करून त्यावर संघटनेचे मत घेऊन आज त्याचा निर्णय घेतला जाईल. जोपर्यंत ॲप ॲग्रिगेटर्स व गोवा माईल्स ॲप रद्द केला जात नाही तोपर्यंत डिजिटल मीटर्स न बसविण्याची भूमिका कायम आहे असे मत टॅक्सीचालकांचे नेते बाप्पा कोरगावकर यांनी व्यक्त केले.
मीटर्सचा एकूण खर्च
डिजिटल मीटरसाठी जीएसटी सह 11 हजार 234 रुपये आकारले जात असून त्यापैकी 8 हजार 579 ही मीटरची किंमत असून डेटा चार्ज आणि इतर खर्च 2655 रुपये आहे. यापैकी मीटरची किंमत राज्य सरकारने दोन हप्त्यांमध्ये टॅक्सी धारकांना परत देण्याची योजना जाहीर केली आहे. आता यापैकी मीटरसाठीचा पहिला हप्ता राज्य सरकार भरणार आहे.
आर्थिक विवंचनेत...
टॅक्सीचालक कोरोना काळात आर्थिक विवंचनेतून जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील भार कमी करण्यासाठी मी ही सूचना मुख्यमंत्र्याना केली होती. शुल्कात 50 टक्के सवलत दिल्याने टॅक्सीचालकांनी आता डिजिटल मीटर्स बसवावेत असे आवाहन गुदिन्हो यांनी केले. दाबोळी येथील विमानतळावर असलेले टॅक्सी काऊंटर वाहतूक खात्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या विमानतळावर काळ्या - पिवळ्या टॅक्सींना दोन काऊंटर मिळतील, असे ते म्हणाले.
"आता मीटर्स बसविण्यासाठी पूर्ण शुल्क न भरता 50 टक्केच रक्कम भरण्याची सवलत देण्यात आली आहे. ही 50 टक्के रक्कम टॅक्सीचालकांना त्यांच्या परवान्याच्या नूतनीकरणावेळी एका वर्षानंतर परत केली जाणार आहे."
- माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.