गोव्याच्या गौरवशाली इतिहासातील ‘घटक राज्य दिन’ हा एक संस्मरणीय दिवस आहे. याच दिवशी 1987 मध्ये गोवा भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य बनले. 30 मे हा दिवस गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी गोवा आणि देशाच्या इतर भागांतील लोकांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आणि म्हणूनच याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी, आपल्या राज्याचे भाग्य घडविण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या असंख्य गोमंतकीयांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करूया.
त्यांच्या उत्कृष्टतेचा, नाविन्यपूर्णतेचा आणि करुणेचा वारसा पुढे नेत त्यांच्या दूरदृष्टीचा, त्यागाचा आणि चिकाटीचा सन्मान करूया, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. संदेशात ते पुढे म्हणतात, गोव्याने गेल्या दशकांमध्ये विशेषतः शिक्षण, आरोग्य सेवा, विकास, पायाभूत सुविधा इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. गोवा ही शांतताप्रिय आणि समृद्ध भूमी आहे, येथील परंपरा जपल्या पाहिजेत.
येथील नागरिकांनी वारसा जपला आहे. जगातील विविध भागांतून लोक येथे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक गुण पाहण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी येतात. आपण हे सर्व मूळ गुण जपले पाहिजेत आणि आपल्या पर्यटकांचा मुक्काम आनंददायी, आणि संस्मरणीय बनविला पाहिजे. राज्यात नैतिकतेच्या धर्तीवर पर्यटनाची प्रगती होईल, याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. गोव्याने जागतिक दर्जाचा विमानतळ ‘मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हा मोठा पायाभूत सुविधांचा विकास साधला आहे, जो सौर ऊर्जा प्रकल्प, पावसाचे पाण्याचा जतन करण्याचा प्रकल्प आणि अत्याधुनिक सुविधांसह टिकाऊ पायाभूत सुविधांच्या संकल्पनेवर बांधला आहे.
स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचा देशातील इतर राज्यांनी सर्वोत्तम सराव म्हणून अभ्यास केला आहे. रोजगार निर्मितीसाठी एमएसएमई अंतर्गत गोव्यात भारतातील पहिले सागरी क्लस्टर स्थापन करण्यात आले आहे. उद्योग आणि रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तुयें इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर स्थानिक रोजगाराला चालना देत आहे. सरकारने धारगळ, पेडणे येथे अत्याधुनिक आयुष रुग्णालय उपलब्ध करून राज्यात आयुर्वेदाला चालना दिली आहे. १५ जुलै २०२१ रोजी राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला आणि त्या दिवसापासून मी लोकांपर्यंत पोहोचायचे ठरवले होते.
त्यानुसार गोवाभर विविध कार्यक्रम, उपक्रमानिमित्त भेटी देत आहे. राजभवन हे लोकभवन आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी निवारा आणि वृद्धाश्रम संस्थांमधील मुले आणि वृद्धांना वैयक्तिकरित्या त्यांच्या हातात आर्थिक मदत सुपूर्द करण्यासाठी भेट दिली.मी मुलांना आणि वडिलधाऱ्यांना राजभवनात आमंत्रित केले आणि त्यानंतर जागतिक एड्स दिनानिमित्त ४० एचआयव्ही बाधित मुलांनी राजभवनाला भेट दिली, या सर्व कृतींमधून राजभवन सामान्य माणसाच्या सहज संपर्कात असल्याचा संदेश गेला, असेही त्यांनी म्हटले आहे.
समतोल विकास हवा : कुतिन्हो
गोव्याचे शहरीकरण झपाट्याने होत आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यात विकासाच्या प्रत्येक बाबतीत समतोल राखला पाहिजे. निसर्ग आणि गोव्याच्या अस्मितेचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी नगर आणि देश नियोजन कायदा योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे, असे ॲड. क्लिओफातो कुतिन्हो म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.