

मडगाव: २०५० पर्यंत १०० टक्के नवीकरणीय ऊर्जा साध्य करण्यासाठीचा दीर्घकालीन आराखडा गोव्याने अधोरेखित केला. ग्रीन आणि ब्ल्यू इकॉनॉमीचा समतोल राखून पर्यावरणीय शाश्वततेसह महासागर संसाधनांचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
बेतुल येथे आयोजित चार दिवसीय ‘इंडिया एनर्जी वीक : २०२६’च्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी, संयुक्त अरब अमिरातीचे उद्योग व प्रगत तंत्रज्ञानमंत्री सुलतान अहमद अल जाबेर यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रतिनिधींचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांनी ‘इंडिया एनर्जी वीक’ हा कल्पनांना कृतीत रूपांतरित करणारा जागतिक मंच म्हणून उदयास आला असल्याचे सांगितले. तसेच यजमान राज्य म्हणून गोव्याने शाश्वत विकासासाठीची आपली दृष्टी मांडली.
केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आंतरराष्ट्रीय भागीदारीचा आढावा दिला. यामध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि ब्राझीलची पेट्रोब्रास यांच्यात १२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलासाठी नूतनीकरण करार करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे ७८० दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगितले. संयुक्त अरब अमिरातीसोबत वाढत असलेल्या ऊर्जा सहकार्यावरही त्यांनी भर दिला.
ऊर्जा क्षेत्रातील विविधता वाढवण्याच्या दृष्टीने कॅनडासोबत महत्त्वपूर्ण खनिजे आणि लहान मॉड्यूलर अणुभट्ट्यांवर लक्ष केंद्रित करणारा नवा मंत्रीस्तरीय संवाद सुरू करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. तांत्रिक पातळीवर या कार्यक्रमात स्वदेशी हायड्रोजन-शक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचे अनावरण करण्यात आले. तसेच, एलएनजी जहाजांची निर्मिती करण्यासाठी जपान आणि दक्षिण कोरियातील कंपन्यांसोबत मोठ्या जहाजबांधणी सहकार्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.