Goa Bank Scam: गोवा राज्य बँक घोटाळा! ठोस पुराव्यांअभावी वेळीपांसह सर्व संशयित दोषमुक्त
पणजी: गोवा राज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या बांधकामात झालेल्या कथित ७.७५ कोटींच्या घोटाळाप्रकरणी म्हापसा येथील विशेष न्यायालयाने सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितांविरुद्ध गुन्हेगारी कट, विश्वासघात किंवा फसवणुकीचे पुरेसे पुरावे सादर करण्यात तक्रारदार अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
या प्रकरणाची तक्रार २००६ मध्ये नोंदविली होती. बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या बांधकामादरम्यान माजी आमदार प्रकाश वेळीप आणि इतरांनी संगनमत करून निविदांमध्ये फेरफार केला आणि मंडळाच्या परवानगीविना बांधकामासाठी अधिक पैसे देऊन बँकेची फसवणूक केली, असा आरोप त्यांच्यावर होता.
बँकेच्या दक्षता अधिकाऱ्याने २००६ मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला होता.निरीक्षण नोंदवून न्यायालयाने प्रकाश वेळीप यांच्यासह रमाकांत फळ, लाडू गावकर आणि संदेश प्रभू चोडणकर यांना आयपीसी कलम ४०६, ४०८, ४०९, ४२० आणि १२० (ब) अंतर्गत केलेल्या सर्व आरोपांतून मुक्त केले आहे. राजकुमार देसाई यांचे निधन झाल्याने त्यांच्यावरील कारवाई यापूर्वीच थांबविली होती.
तपास यंत्रणेचे काढले वाभाडे
न्यायाधीश पूजा सरदेसाई यांनी आदेशात म्हटले की, पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने झाला.
तीन वर्षांच्या विलंबानंतर दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रातही संशयितांविरुद्ध कोणताही ठोस नवीन पुरावा आढळला नाही.
दोन संशयित हे संबंधित काळात बँकेचे संचालकही नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप सिद्ध होत नाही.
वाढीव खर्च बोर्डाच्या मान्यतेने झाला होता आणि संशयितांनी स्वतःसाठी आर्थिक लाभ घेतल्याचा कोणताही पुरावा समोर आला नाही.
आरोपपत्रासोबत जोडलेल्या ‘नाबार्ड’च्या ३५ पानांच्या अहवालाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
