37th National Games News Update: गावडेंच्या कार्यपद्धतीवर केंद्रीय क्रीडामंत्री असमाधानी, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

आयोजनात अपयश : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सावंत यांच्या नेतृत्वाखाली
37th National Games Goa
37th National Games GoaDainik Gomantak
Published on
Updated on

37th National Games News Update गोव्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद क्रीडामंत्री गोविंद गावडे हे पेलू शकणार नाहीत आणि यजमान या नात्याने राज्याची नाचक्की झाल्याने आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ॲक्शन मोडवर आले आहेत.

क्रीडामंत्र्यांना बाजूला सारून ही स्पर्धा स्वतःच्या नेतृत्वाखाली पार पाडण्याचे त्यांनी ठरविले असून त्यादृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यासही सुरवात केली आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री ठाकूर यांनी गोव्याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी समाधानकारक नसल्याचे दिल्ली भेटीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले आणि क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यशैलीवर आपण समाधानी नसल्याचेही स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यपद्धतीवर सत्ताधारी भाजपसुद्धा प्रचंड नाराज असल्याचे समजते.

या साऱ्या घटनांची आता मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. कला अकादमी प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या गावडे यांना राष्ट्रीय स्पर्धा आयोजनातही महत्त्वपूर्ण भूमिका द्यायची नसल्याचे निश्चित केले असून स्पर्धेसंदर्भात महत्त्वाच्या फाईल्स आता मुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार आहेत.

त्याची कार्यवाहीही होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीची कुणकुण लागल्यामुळे धास्तावलेल्या क्रीडामंत्री गावडे यांनी सक्रिय असल्याचा आव आणताना शुक्रवारपासून बैठकांचा धडाका लावल्याचे सूत्राने नमूद केले.

स्पर्धा दीड महिन्यावर, तरीही आवश्‍यक सुविधांचा अभाव

  • 29 रोजी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील राष्ट्रीय स्पर्धा गीताचे (थीम साँग) अनावरण होते; पण मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर कार्यक्रम लांबणीवर.

  • वादग्रस्त आणि आरोप असलेले खास मर्जीतील प्रशिक्षक संदीप वरळीकर यांची राष्ट्रीय क्रीडा सल्लागार पदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांची महत्त्वाच्या पदी नियुक्तीसाठी खटाटोप.

  • क्रीडा संघटनांना उपकरणे खरेदीसाठी पाच लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय; पण हा निधी कमी असल्याचे निर्दशनास आणून दिल्यानंतर गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे तांत्रिक अडचणी.

  • राष्ट्रीय स्पर्धेची तयारी 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणे गरजेचे. मात्र, कांपाल येथील जलतरण तलाव, पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमचे काम अपूर्ण.

  • बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर नव्याने सिंथेटिक ट्रॅक घातल्यानंतर पावसामुळे स्पर्धा चाचणी घेण्यात अपयश.

  • ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमचे नूतनीकरण कामही रखडले.

  •  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी विविध समित्या, उपसमित्यांची अद्याप नियुक्ती नाही.

  •   प्रतिनिधी अधिस्वीकृती नोंदणी अजूनही सुरू नाही.

पैशांची उधळपट्टी

क्रीडामंत्री गावडे पैशांची उधळपट्टी करत असल्याने मुख्यमंत्री भडकले आहेत. राष्ट्रीय स्पर्धेनिमित्त १४ मे रोजी बोधचिन्ह, तर १८ जून रोजी शुभंकर अनावरण कार्यक्रम भव्यदिव्य झाला.

या दोन्ही कार्यक्रमांवर मिळून तब्बल ४.७८ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती खुद्द गावडे यांनी राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिली. शिवाय १४ रोजीच्या कार्यक्रमात संध्याकाळी नाश्ता, नंतर जेवण यासाठी पंचतारांकित योजना क्रीडामंत्र्यांनी आखली होती आणि सूत्रांच्या माहितीनुसार, एका प्लेटमागे १५०० रुपये दर आकारण्यात आला होता.

या साऱ्या अनावश्यक खर्चाची कल्पना मुख्यमंत्र्यांना देण्यात आली नव्हती, तसेच क्रीडा सचिव यांनाही अंधारात ठेवण्यात आले होते. नंतर माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी १८ जूनच्या कार्यक्रमातून भोजन कार्यक्रम रद्द करण्यास क्रीडामंत्र्यांना भाग पाडले होते, असे सूत्राने स्पष्ट केले.

37th National Games Goa
Accident in Dhargal: धारगळमध्ये दुचाकी-चारचाकीमध्ये टक्कर! अपघातात दोघेजण गंभीर जखमी

क्रीडा संघटनांकडे दुर्लक्ष

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनात मनमानी करता यावी यासाठी सल्लागाराच्या सांगण्यावरून क्रीडामंत्री गावडे यांनी गोवा ऑलिंपिक संघटनेचे (जीओए) अध्यक्ष केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, आयओएत मोठी पत असलेले सचिव गुरुदत्त भक्ता, तसेच सर्व राज्य क्रीडा संघटनांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवले असा आरोप एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मागे केला होता.

राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी गोवा क्रीडा प्राधिकरणाने या सर्व क्रीडा संघटनांना उपकरणे खरेदीसाठी निधी दिला नाही, प्रशिक्षण शिबिरांसाठी पैसा पुरविला नाही, त्यामुळे गोवा यजमान असला, तरी स्पर्धेनिमित्त स्थानिक खेळाडूंची तयारी शून्य आहे.

क्रीडामंत्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे पाहून जीओए शिष्टमंडळाने श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले.

37th National Games Goa
Goa Weather Update: राज्यात यलो अलर्ट; आज मध्यम स्वरूपाचा पाऊस

सरकारी बाबूही कंटाळले...

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या बेशिस्त आणि उधळपट्टीच्या कारभाराला राज्य प्रशासनातील क्रीडा अधिकारीही कंटाळले आहेत, असे सूत्राने सांगितले.

१७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा उद्‍घाटन सोहळ्याच्या वारेमाप खर्चाच्या फाईलवर सही करण्यास गोवा क्रीडा प्राधिकरणाचे तत्कालीन कार्यकारी संचालक अजय गावडे यांनी नकार दिल्यानंतर क्रीडामंत्री गावडे यांनी गतवर्षी ऑक्टोबर अखेरीस अजय यांना पदावरून हटविले.

आणि क्रीडा प्रशासनाची काहीही माहिती नसलेल्या गीता नागवेकर यांच्याकडे ताबा दिला. गोवा क्रीडा प्राधिकरणातील सारी सूत्रे लैंगिक आणि मानसिक छळाचा आरोप असलेल्या प्रशिक्षकाकडे दिली. या प्रशिक्षकाला क्रीडा स्पर्धा आयोजनातील काहीही ज्ञान नसल्याचे सिद्ध झाले आहे.

क्रीडामंत्री गावडे यांच्या लहरी आणि एकांगी कारभाराला कंटाळून माजी क्रीडा सचिव अजित रॉय यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आणि ती मान्यही झाली. रॉय यांनी क्रीडामंत्री गावडे यांच्या कारभाराबद्दल मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट शब्दात तक्रार नोंदविली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com