खरी कुजबुज: आता तरी होणार का गोवा सरकार ‘स्मार्ट’?

Khari Kujbuj Political Satire: गोव्यातील वीज ग्राहकांवर सरकार ‘स्मार्ट मीटर’ थोपवू पाहत असताना एल्विस गोम्स व इतरांनी या निर्णयाला विरोध करत जागृती मोहीम सुरू केली आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainiak Gomantak
Published on
Updated on

जॉन परेरा कोणीकडे?

फोंड्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते जॉन परेरा यांच्याकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिवंगत रवींचे निकटवर्तीय असूनही त्यांनी भाजपचा रस्ता धरला नाही, काँग्रेसमध्येच राहिले. डॉ. केतन भाटीकर यांना पक्षात आणण्यातही त्‍यांच्‍याच हात असल्याची चर्चा आहे. आता पुढील निवडणुकीसाठी राजेश वेरेकरही मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याने उमेदवारीची चुरस वाढणार हे निश्चित. जॉन हे भाटीकरांच्या गोटातले मानले जात असल्यामुळे, उमेदवारी वेरेकरांना मिळाल्यास जॉन कोणत्या ‘बेंच’वर बसणार, याचीच कुजबूज सध्‍या रंगली आहे. तरीही ‘पक्ष ज्याला तिकीट देईल, त्याच्यासोबत’ हा सुरक्षित अंदाज वर्तवला जातोय; पण राजकारणात ‘सेफ’ काहीच नसते हेही तितकेच खरे! म्हणूनच फोंड्यातील लोक पॉपकॉर्न घेऊन तयार...कारण सामना रंगणार हे नक्कीच! ∙∙∙

आता तरी होणार का गोवा सरकार ‘स्मार्ट’?

गोव्यातील वीज ग्राहकांवर सरकार ‘स्मार्ट मीटर’ थोपवू पाहत असताना एल्विस गोम्स व इतरांनी या निर्णयाला विरोध करत जागृती मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतलेला निर्णय या विरोधकांसाठी एक दिलासा ठरला आहे. योगी सरकारने ‘स्मार्ट मीटर’ बसविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविले आहेत, ते काढून जुने डिजिटल मीटर बसविण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर एल्विसने गोवा सरकारला ‘आता तुमचा विचार बदलणार का?’ असा सवाल केलाय. स्मार्ट मीटर न लावायचा निर्णय घेऊन उत्तर प्रदेश ‘स्मार्ट’ झाला. आता गोवा सरकार तसाच निर्णय घेत आपणही ‘स्मार्ट’ असे दाखवून देणार का? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Smart City: स्मार्ट सिटीचे काम 31 मे पर्यंत पूर्ण होईल - बाबूश | Gomantak Tv

गिरीशचे कौतुक

तमिळनाडूत द्रमुकबरोबर युती केल्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला व त्यामुळे गोव्यातील गिरीश चोडणकरांच्‍या विरोधकांना खुशीच्या उकळ्या फुटल्या. वास्तविक या निवडणुकीनंतर चोडणकर यांची तमिळनाडू व दिल्लीतीलही प्रतिमा उंचावण्यास मदत झाली आहे. याचे कारण चोडणकर यांनीच पक्षश्रेष्ठींना पाठविलेल्या अहवालात द्रमुकबरोबर युती न करता ती अभिनेता विजय यांच्या टीव्हीकेबरोबर करावी असा प्रस्ताव दिला होता. याचे कारण टीव्हीकेची वाढती लोकप्रियता व युवकांचा त्या पक्षाप्रती असलेला ओढा व आकर्षण हेच होते. परंतु द्रमुक ‘इंडिया’ आघाडीचा सदस्य आहे व संसदेत तो काँग्रेसशी साथ करत असल्याच्या कारणावरून पक्षश्रेष्ठींनी द्रमुकला पसंती दिली. पुड्डुचेरीमध्येही टीव्हीकेने मते खेचल्याने काँग्रेसला तेथे एका जागेवर समाधान मानावे लागले. राहुल गांधींनाही या परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांनी आता टीव्हीकेचे अभिनंदन केले आहे. ∙∙∙

भाजप ३० जागा जिंकेल, पण...!

सोमवारी जाहीर झालेल्या पाच राज्यांतील निवडणूक निकालात काही राज्यांमध्‍ये भाजपला चांगले यश मिळाले. या यशावरून गोव्यातील भाजप नेते २०२७च्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष 30 जागा जिंकेल असे सांगत आहेत. यावरून मराठी निर्धार समितीचे काही सदस्य ‘‘भाजप नक्कीच ३० जागा जिंकू शकेल, पण मराठीला राजभाषेचे स्थान दिले तरच. अन्यथा २०१७ची पुनरावृत्ती निश्चित हे त्यांनी ध्यानात ठेवावे’ असे मेसेज फॉरवर्ड करत आहेत. दुसरीकडे ‘भाजपला एवढा आत्मविश्वास असेल तर त्यांना मराठीची गरजच काय?’ असा सवाल भाजपमधील कोकणीप्रेमी करत आहेत. यावर दामू नाईक काय उत्तर देतील बरे! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Smart Village: शिरोडा मतदारसंघामध्ये ‘स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्प सुरू! स्वयंपूर्ण गोवा सीएसआर परिषद २०२४’मध्ये घोषणा

म्हणे, वाघांनी आता अर्ज भरावा!

गोव्यातील वाघांचा विषय आता इतका रंगला आहे की तो सरळ ‘कागदोपत्री वास्तव’ विरुद्ध ‘जंगलातील वास्तव’ असा झाला आहे. सरकार ठामपणे सांगते, ‘वाघ नाहीत’. पण जंगलात आढळणारे वाघांच्‍या पायाचे ठसे, फोटो आणि लोकांचे अनुभव मात्र अगदी उलटच चित्र दाखवतात. त्यामुळे लोकांच्या चर्चेला वळण मिळाले आहे. म्हणे, पुढे सरकारच वाघांना सांगणार, ‘‘पहिल्यांदा अर्ज भरा, मगच अस्तित्व मान्य करू’’. कारण काय तर...कागदावर नाव नसेल तर अस्तित्वच नाही, अशीच काहीशी स्‍थिती सध्‍या दिसतेय, असे मिश्कील टोमणे सुरू आहेत. काहीजण म्हणतात, वाघांनी लवकरच आपले ‘रहिवासी प्रमाणपत्र’ आणि ‘ओळखपत्र’ तयार ठेवावे. नाहीतर उद्या जंगलात राहायलाही परवानगी लागेल! त्यामुळे आता प्रश्न असा उरलाय, वाघ अर्ज भरून अधिकृत होणार की सरकारच अखेर जंगलात जाऊन वास्तव मान्य करणार? ∙

संकेतस्थळांचे दुखणे

वेबसाईटच्या अनुपालनास विलंब झाल्याबद्दल आयटी विभागाकडून अन्‍य विभागांना फटकार लगावली आहे. माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार विभागाने सर्व सरकारी विभाग, महामंडळे, स्वायत्त संस्था आणि संघटनांना दुसरे स्मरणपत्र पाठवले आहे. फेब्रुवारीमध्ये जारी केलेल्या पूर्वीच्या निर्देशाला अनेक विभागांनी प्रतिसाद दिला नसल्याने स्मरणपत्राद्वारे कान टोचावे लागले आहेत. आयटी संचालक कबीर शिरगावकर यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार सर्व विभागांना स्वतःच्या संकेतस्थळांचा तपशील सादर करावा लागणार आहे. भारतीय सरकारी वेबसाईटसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे (जीआयजीडब्ल्यू) पालन करतात की नाही, हेही पाहिले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात शासकीय वेबसाईट्स वारंवार सायबर हल्ले आणि डेटा चोरीचे लक्ष्य ठरल्या आहेत. त्यामुळे आता आयटी विभाग काय पावले उचलणार हे लवकरच समजेल. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Smart Meters: राज्यात सर्वप्रथम राजधानी पणजीतील वीज ग्राहकांना मिळणार स्मार्ट मीटर्स

शिरोडकरांचा सारथी हेल्मेट विसरला!

पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपने देशभर आनंदोत्सव साजरा केला. गोव्यातही सर्वत्र भाजपच्‍या मंत्री, आमदारांनी दुचाकी रॅली काढून या आनंदोत्सवात भर टाकली. त्‍यात मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व मंत्र्यांचा समावेश होता. विशेष म्‍हणजे मुख्यमंत्र्यांचा दुचाकीस्वार हेल्मेट विसरला होता. यू-ट्यूब चॅनलवाले, प्रसारमाध्यमांचे छायाचित्रकार रॅलीचे छायाचित्रण करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी दुचाकीस्वाराला थांबवले आणि त्याला हेल्मेट घालायला लावले. बाजूला प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याही दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान केले होते. परंतु मंत्री सुभाष शिरोडकरांचा जो सारथी (दुचाकीस्वार) होता, त्याला हेल्मेट मिळाले नाही की तो विसरून आला होता हे काही समजले नाही. मात्र, त्यांच्या दुचाकीस्वाराने हेल्मेट न घातल्याचे छायाचित्रांतून सुटले नाही. ∙∙∙

भजनी स्पर्धेचा दर्जा वाढेल?

नेमेचि येतो पावसाळा, नेमेचि श्रावण, नेमेचि कला अकादमीची भजन स्पर्धा. सर्वसाधारण, महिला, बाल अशा तीन गटात ही स्पर्धा होते. भजनातील शब्दोच्चार स्पष्ट व्हावेत म्हणून सहभागी कलाकारांना तज्‍ज्ञांकडून मार्गदर्शन देणे गरजेचे आहे. ‘एका जनार्दनी शरण’ असा उच्चार पचनी पडत नाही. ध-नी, ध-नी म्हटल्यावर ते धैवत निषादाचे नोटेशन तर नाही ना, असा भास होतो. शब्दोच्चार झाल्यावर स्वरोच्चार स्वराच्या मध्य बिंदूवर कसे होतील, हे संगीततज्‍ज्ञांकडून शिकवायला हवं. स्पर्धांचा उरक काढू नये. पखवाज वाद्य तग धरून आहे ते या स्पर्धेमुळे. भजनी कलासुद्धा युवा पिढीमध्‍ये पोषित होत आहे ती याच स्पर्धेमुळे. दर्जा राखायला गवळण म्हणजे

काय, तिचा लडिवाळपणा व

गोडवा हे सर्व युवकांना दिशादर्शकरित्या शिकवायला पाहिजे. कार्यशाळांची औपचारिकता नको. ते काटेकोरपणे अंमलात यायला हवे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Smart Signals in Goa : वाहतुकीवर स्वयंचलित कॅमेऱ्यांची करडी नजर

विराजबाब ‘फॉरवर्ड’

फोंड्यात काही ‘जागृत’ समाजकार्यकर्ते आहेत. त्यातीलच एक म्हणजे विराज सप्रे. फोंड्यातील अनागोंदीवर विराजकडून नेहमीच बोट ठेवले जाते. आता हेच पहा, फोंड्यातील मध्यवर्ती आणि गजबलेल्या ठिकाणी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. त्यामुळे ‘वाहनचालकांनो जरा स्लो चला’ असा फलक लावण्यात आला आहे. पण हाय रे दैवा...हा फलक चक्क उलटा टांगला गेला आहे. आता एक तर हा फलक लावणारा अशिक्षित असावा किंवा बेजबाबदार असावा. मात्र विराजने ही बाब चटकन लक्षात आणून दिली. विराजबाब अलीकडे खूपच ‘फॉरवर्ड’ बनले आहेत म्‍हणे. ∙∙

तो ‘तेली’ कोण?

‘अटल सेतू’वर झालेल्या अपघातात सहा गाड्यांचे नुकसान झाले आणि लगेच चर्चेला उधाण ‘इन्शुरन्स कंपनी आहे ना, ती भरून देईल’. पण खरा प्रश्‍‍न असा आहे की रस्त्यावर तेल कोणी सांडलं?. जर त्या तेलामुळेच अपघात झाला असेल तर मग त्याला शोधून त्याच्याकडून नुकसान भरपाई घ्यायला नको का? काहीजण म्हणतात, जर एखादी गाडी ‘तेल टाकून’ निघून गेली असेल तर ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसेलच. त्‍या वाहनाला थेट बिल पाठवा! लोकांचा सूर स्पष्ट आहे, पोलिस खरोखरच तपास करत असतील तर सीसीटीव्ही तपासा आणि नेमका दोषी शोधा. नाहीतर, तेल आलं कुठून? हा प्रश्न कायम हवेतच राहील. आता उत्सुकता अशी की, पोलिस या ‘रहस्यमय तेलाचा’ उलगडा करणार काय? की शेवटी सगळं प्रकरण ‘अपघात झाला, इन्शुरन्स भरून देईल’ एवढ्यावरच थांबतं? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Smart city mess turns ancient mala spring into eyesore | Goa News | Gomantak Tv

पॉवरफूल संकेत!

केवळ खुर्ची मिळाली व हातात पॉवर असली म्हणजे सगळ्यांनाच कामाचे वरदान प्राप्त होते असे थोडेच आहे.जे काम पॉवरफूल सार्वजनिक बांधकाम खाते असलेल्या माजी मंत्र्याच्‍या कार्यकाळात झाले नाही ते कोणतेच पद नसलेल्या सावर्डे मतदारसंघातील संकेत आर्सेकर यांनी करून दाखविले. असे आम्ही सांगत नाही तर तसे प्रमाणपत्र खुद्ध साबांखाचे माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या सीएमओ टीममध्ये असलेल्या संकेत आर्सेकर यांना दिले आहे. आपल्या गावातील रस्ता आपण मंत्री असताना करू शकलो नाही, तो रस्ता संकेतने करून दाखविल्याचे पाऊसकर यांनी सांगितले. संकेत हे सावर्डे मतदारसंघात एक उभारते युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. मंदिरातील गाभाऱ्यातील देवाचे दर्शन घेण्यापूर्वी गाभाऱ्यातील द्वारपालांचे दर्शन घ्यावे लागते म्हणतात ते मात्र खरे. ∙∙∙

फेस्त संपले, फेरी सुरूच!

म्हापसा शहरात नुकतेच मोठे फेस्त साजरे झाले. त्यानिमित्ताने फर्निचर विक्रेत्यांची मोठी फेरी भरली होती. फेस्त संपले आणि फेरीचे अधिकृत दिवसही संपले. तरीही काही विक्रेते म्हापशाच्या प्रेमापोटी तेथून हलायला तयार नाहीत. अखेर पालिकेने कठोर पाऊल उचलत काहींचे साहित्य जप्त केले. आता हे जप्त केलेले साहित्य परत मिळविण्‍यासाठी पालिकेत विक्रेत्यांच्या येरझऱ्या सुरू झाल्या आहेत. विशेषतः नगरसेवक तर फोनवर बोलून बोलून कंटाळले आहेत. ‘आमचे साहित्‍य द्या हो’ अशी विनवणी ते करत आहेत. पण नगरसेवकही चतुर! ‘कारवाई अधिकाऱ्यांनी केली आहे, त्यांच्याकडेच जा’ असे सांगून ते आपला हात झटकत आहेत. अर्थात, काही दिवसांत पालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काही नगरसेवक निवडणुकीचे गणित मांडून कायद्याला वाकवून मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काहीजण अधिकाऱ्यांची कटकट नको म्हणून सरळ हात वर करत आहेत. थोडक्यात काय तर, या विक्रेत्यांचा अतिरिक्त मुक्काम दंडात्मक कारवाईला निमंत्रण देणारा ठरला आहे, हे मात्र नक्की! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Smart Signals in Goa : वाहनचालकांनो सावधान! गोव्यात मार्चपासून स्मार्ट सिग्नल्स आणि हायटेक कॅमेरे

फोंड्याची ‘कसोटी’

पावसाळा जवळ आला तरी फोंडा तालुक्यातील बहुतांश पंचायतींची मान्‍सूनपूर्व कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. आता ‘नेमेचि येतो पावसाळा’ हे सर्वांना माहीत आहे. दुसरीकडे ‘सरकारी कामे आणि महिनाभर थांबा’ हा प्रकारसुद्धा नेहमीचाच झाला आहे. यंदा तर मे महिन्याच्या मध्यावरच पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत गटारे साफ नसतील, रस्त्याच्या कडेची माती काढली नसेल तर काय होईल देवच जाणे! ∙∙∙

काँग्रेसचा अवसानघातकीपणा

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले व भाजप कार्यकर्त्यांना नवा हुरूप प्राप्त झाला. हा पक्ष जिद्दीने व आक्रमकपणे कार्य करतोय, त्याचे फळ त्यांना पश्‍चिम बंगालसारख्या राज्यात मिळाले. या पार्श्‍वभूमीवर वर्षभरात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीकडे काँग्रेस पक्ष किती गांभीर्याने पाहतो, यावर त्या पक्षाचे या राज्यातील भवितव्य ठरणार आहे. सध्या हा पक्ष युरी आलेमाव यांच्यासारख्या घटकांनी ताब्यात ठेवला असून त्यांच्या ‘स्थिरतावादी’ भूमिकेमुळे पक्षाच्या विस्तारास अडथळे येत आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपने आपली विचारसरणी बाजूला ठेवून देशभर सर्व जिंकणाऱ्या घटकांना पक्षाची दारे खुली केली. गोव्यात युरी आलेमाव यांच्यासह सर्वांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागल्याने त्यांना कोणासाठी दारे खुली करायचीच नाहीत. ते दारे, खिडक्या सर्व बंद करून बसले आहेत व पक्षात खुले वातावरणच राहिलेले नाही.

Khari Kujbuj Political Satire
Smart city does opposite of improvise adapt overcome | Goa News | Gomantak Tv

भायलो आणि भितरलो!

‘भायलो...भितरलो’ हा वाद जे गोमंतकीय लंडन व अन्‍य देशांत स्थायिक झाले आहेत त्यांना लागत नाही का? भारतातील इतर प्रांतातून गोव्यात आलेल्यांना आमचे काही लोक ‘घाटी’ म्हणून हिणवतात. गोंय, गोंयकार व गोंयकारपणाची भाषा करणारे राजकारणी गोव्यात स्थायिक झालेल्या एखादा परप्रांतीय नगरसेवक किंवा पंच अथवा सरपंच झाला तर ‘गोवा संपला हो’, ‘गोवा परप्रांतीयांच्या घशात गेला हो’ म्हणून टाहो फोडतात. मात्र हेच गोंयकार जे लंडनच्या स्विंडन शहरात स्थायिक झाले आहेत, ते तेथे केवळ नोकरीच करत नाहीत तर राजकारणही करतात.यंदाच्या स्विंडन कौन्‍सिल निवडणुकीत चक्क १९ गोंयकार निवडणूक लढवत आहेत. त्यांना तेथील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे. आता गोंयकार विदेशात ‘भायलो’ ठरत नाहीत का? तेथील लोकांना या गोमंतकीयांना ‘भायलो’ म्हणून हिणवले तर? ∙∙∙

भाजप आणि त्‍यांचे गट

‘एक म्यान में दो तलवारे नहीं रह सकती’ असे म्‍हटले जाते. कुडचडे व सावर्डे मतदारसंघात भाजपचे दोन वेगवेगळे गट तयार झाल्याचा दावा काही भाजप समर्थकच करायला लागले आहेत. भाजपच्या आमदार असताना ‘बिग बॉस’ला जवळचे असलेले युवा नेते स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून समांतर कार्यक्रम राबवत आहेत. त्‍यामुळे सामान्य कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. कुडचडे मतदारसंघ महिला अध्यक्षांची व नव्या महिला मंडळ समितीची निवड झाली तर दोन्ही गटांकडून वेगवेगळे अभिनंदन. बंगाल व आसाममध्‍ये भाजप विजयी ठरला तर दोन्ही गटांकडून वेगवेगळे विजयोत्सव साजरे.एक गट स्वत:ला मूळ भाजप गट असल्याचा दावा करत आहे. आता एक गट मूळ भाजप तर काब्राल समर्थक गट कोणता? असा प्रश्न भाजप कार्यकर्ते विचारायला लागले आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com