
सासष्टी: यंदाच्या पर्यटन मोसमातील हा शेवटचा महिना असला तरी किनारी भागातील काही शॅक मालकांनी आपले शॅक बंद केले आहेत. गोवा शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांच्या म्हणण्यानुसार यंदाचा पर्यटन मोसम आमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा गेला. काही जणांना थोड्या प्रमाणात फायदेशीर ठरला तर काहींना नुकसान सोसावे लागले, असे त्यांनी सांगितले.
यंदाचा मोसम पुष्कळ खर्चिक झालाच, शिवाय समाज माध्यमांमध्ये जशी प्रसिद्धी मिळायला हवी होती तशी पर्यटनाला मिळाली नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. दक्षिण गोव्यातील शॅक मालकांनी सांगितले की, दाभोळी विमानतळाहून काही विमाने मोपा विमानतळावर हलविल्याने सुद्धा आमच्या धंद्यावर परिणाम झाला.
यंदा सरकारने खास करून पर्यटन खात्याने आम्हाला परवाने लवकर दिले त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. त्यामुळे आम्हाला शॅक उभारणी लवकर करणे शक्य झाले. यंदा आम्हाला काही प्रमाणात दिवळी सुटीत येणाऱ्या पर्यटकांपासून फायदा झाला असे त्यांचे म्हणणे आहे. शॅक धंद्यामध्ये जी कमतरता आहे, त्यावर चर्चा करून त्या दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे क्रुझ कार्दोज सांगतात.
किनाऱ्यावरील भटक्या स्वानांचा उपद्रव, शौचालयांची कमतरता, अपुरी विद्युत योजना, सिवेज व कचरा व्यवस्थापनातील उणिवा सारखे प्रश्नांवर तातडीने उपाययोजना गरजेची आहे, असेही कार्दोज सांगतात.
गोव्यातील महागाई खास करून टॅक्सी भाडे, हॉटेल शुल्क, विमानाचा प्रवास खर्च सर्व काही वाढल्याने पर्यटनावर परिणाम झाला आहे, असे पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मत आहे. रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे विदेशी पर्यटक कमी प्रमाणात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
यंदाचा पर्यटन हंगाम स्थिर होता असे मत ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) अध्यक्ष जॅक सुखिजा यांचे म्हणणे आहे. यंदा या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच फायदा झाला असेही म्हणता येणार नाही. पर्यटनातील काही क्षेत्रांमध्ये थोड्यांना फायदा झाला हे नाकारता येणार नाही. यंदा पर्यटक अपेक्षेप्रमाणे वाढले नाहीत. पर्यटक कसे वाढतील याकडे जास्त लक्ष पुरविण्याची गरज आहे. त्याच बरोबर स्थानिकांना फायदा कसा होईल याचे भान सुद्धा राखले पाहिजे असे सुखिजा यांचे म्हणणे आहे. या क्षेत्रांमध्ये दलालीगिरी वाढली आहे, त्यावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही सुखिजा यांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.