दाबोळी: नववी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग आज सोमवारपासून सुरू झाले असल्याने विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयांचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला.आज शालेय दिवस परीक्षेने झाला. कोरोना संकटामुळे (Covid 19) जगातील बहुतांश देशातील सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यात शिक्षण संस्थांचाही समावेश होता. राज्यात 2019-20 वर्षाच्या दहावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने शाळा बंद करण्यात आल्या. ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू झाले. शिक्षक शाळांत येऊन ऑनलाईन वर्ग घेत होते. मात्र, राज्यातील (Goa) अनेक भागात मोबाईल रेंजची समस्या असल्याने ऑनलाईन शिक्षण घेताना बहुतांश विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. त्यानंतर कोरोनाच्या भीतीमुळे 2020-21 सालच्या अंतिम वर्षाच्या सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.
नवे शैक्षणिक वर्ष यंदा उशिरा सुरू झाले आहे. या वर्षाच्या पहिल्या सत्रातील परीक्षाही ऑनलाईनच घेण्यात आल्या. राज्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे राज्यभरातील सर्व व्यवहार हळूहळू सुरू झाले. सरकारने परवानगी दिल्यानंतर सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाचे वर्गही सुरू झाले. काही शाळांत दहावीचे वर्गही सुरू आहेत. त्यानंतर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी 9 वी ते 12 वी पर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्याची घोषणा केली. शाळांतील वर्ग सुरू करताना 50 टक्के उपस्थितीनुसार ते व्हावेत, असे आदेश महिन्यापूर्वीच सरकारने काढले होते. त्यानुसार काही शिक्षण संस्थांनी वर्ग सुरू केले होते.नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची शिफारस सर्वांत आधी तज्ज्ञ समितीने केली होती. नंतर कृती समितीने प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याला मान्यता दिली. त्यामुळे सोमवारपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कृती समितीच्या बैठकीनंतर केली होती. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होत असले तरी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरूच राहील. आठवीपर्यंतचे वर्ग दिवाळीपर्यंत तरी सुरू होण्याची शक्यता नाही.
दरम्यान करोनामुळे दीड वर्षापासून विद्यार्थी घरी राहूनच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होते. आता प्रत्यक्ष वर्ग सुरू होत असल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला. करोना संसर्ग वाढू नये यासाठी शिक्षण खात्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सुमारे दिड वर्षभराहून अधिक काळाच्या खंडानंतर वर्ग सुरू झाल्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसले, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा आज परत एकदा शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्याने भरुन आला होता.प्रत्येक शाळेच्या आवारात विद्यार्थी एकमेकांशी संवाद साधताना दिसत होते.शालेय वर्ग परीक्षेने झाल्याने विद्यार्थी गटागटाने राहून आपल्या पुस्तकावर नजर मारताना दिसत होते.परीक्षा असल्याने आज लवकर सुट्टी झाली.
शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी मास्क घालण्यासह सामाजिक अंतर राखण्याची अट घालून आज शाळा सुरू करण्यात आली. करोनापासून संरक्षण होण्यासाठी बऱ्याच अटींचा समावेश सरकारने जारी केलेल्या कोविडविषयक मार्गदर्शक तत्त्वांत करण्यात आला. त्यानुसार मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आज वर्ग सुरू करण्यात आल्याचे नवेवाडे वास्को येथील वाडेनगर इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा देसाई यांनी सांगितले.
शालेय शिक्षक नितीन फळदेसाई यांनी बोलताना सांगितले की, सरकारच्या निर्णयानुसार शाळा सुरू झाली आहे. विद्यार्थी शाळेपासून दूर होते त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मधील दुरावा निर्माण झाला होता. विद्यार्थी शाळेत आल्यामुळे आम्ही शिक्षक वर्ग आनंदित आहोत. दीड वर्षात शिक्षक आणि विद्यार्थी नाळ तुटल्याने विद्यार्थ्यांच्या मानसीक परिस्थितित बदल झाल्याचे दृष्टीपथास पडले. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही शिक्षक वर्ग स्वागत करीत असल्याचे ते म्हणाले.सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आज आम्ही वर्ग सुरू केले असल्याचे फळदेसाई यांनी शेवटी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.