
कळंगुट: राज्यातील बहुतेक कोकणी तसेच मराठी माध्यमांच्या शाळा सध्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पालक आपल्या मुलांना मराठी, कोकणी शाळांऐवजी जवळच्या इंग्रजी शाळांत पाठवतात. त्यामुळे येथील शाळांची सध्याची हलाखीची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने शिक्षणाचे माध्यमच इंग्रजी करावे, असे आवाहन कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कळंगुटमध्ये केले.
मातृभाषेतूनच शिक्षण देण्याचे उपदेश करणाऱ्यांना त्यांची स्वतःची तसेच त्यांच्या मुलांची मुले कुठल्या प्राथमिक शाळेत जातात ते आधी विचारा, असा उपहासात्मक सवाल यावेळी आमदार लोबो यांनी केला.
दरम्यान, गोमंतकीय विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरच इंग्रजीचे ज्ञान मिळत असेल तर साहजिकच पालक आपल्या पाल्यांना गावातील प्राथमिक शाळेत पाठविण्यास राजी होतील व त्यामुळे स्थानिक कोकणी तसेच मराठी भाषेचे ज्ञान त्यांना प्राप्त करता येईल, असे आमदार लोबो यांनी पुढे सांगितले.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बाळकृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात आमदार लोबो कळंगुटमध्ये बोलत होते.
यावेळी कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा, भाजप गटाध्यक्ष समीर शिरोडकर, पंच आलेक्स कुतिन्हो, डॉमनिक कुतिन्हो, प्रसाद शिरोडकर, माही सिमेपुरुषकर, लतिका पालकर, अंकुश गोवेकर, एकनाथ नागवेकर, राजेंद्र कोरगांवकर, श्री बाबरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर उपस्थित होते.
सुरुवातीला आमदार मायकल लोबो, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नागवेकर यांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. प्रसार शिरोडकर यांनी मानले.
सरकारचे धोरण स्पष्ट: मुख्यमंत्री
आमदार मायकल लोबो यांच्या शाळांचे माध्यम इंग्रजी करण्याच्या मागणीविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता त्यांनी चक्क हात जोडले. त्यानंतर सरकारचे याबाबतचे धोरण सुस्पष्ट आहे, एवढेच एक वाक्य ते बोलले.
वेलिंगकर यांची टीका
‘भाऊसाहेब बांदोडकरांनी सुरू केलेल्या मराठी प्राथमिक शाळा टिकवायच्या असतील तर गोव्यातील संपूर्ण प्राथमिक शिक्षणाचे इंग्रजीकरण करण्याचा सल्ला देत लोबो यांनी शिक्षणतज्ज्ञाचा आव आणला आहे.
भाजपचे पोर्तुगालभक्त आमदार मायकल लोबो यांच्या विधानाने मोठी करमणूक झाली. त्याचबरोबर भाजपमध्ये पावन झालेल्यांच्या विचारांची दिशा यापुढे काय असणार आहे, हेही जनतेच्या लक्षात आलेय, असा टोला प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी लगावला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.