Goa News: पोर्तुगिजांनी गोव्यातील अनेक मंदिरे नष्ट केली. परकीय राजवटींमध्ये उद्ध्वस्त झालेल्या सर्व मंदिरांचे एक प्रातिनिधिक स्मारक म्हणून शिवकालीन इतिहास असलेल्या दिवाडी बेटावर श्री सप्तकोटीश्वराचे आणखी एक मंदिर उभारण्याचा सरकारचा विचार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी नार्वे येथे केले.
शिवकालीन इतिहास आणि गोमंतकीयांचे राजदैवत असलेल्या नार्वे-डिचोली येथील श्री सप्तकोटीश्वराच्या नूतनीकृत मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच चालना देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या ऐतिहासिक सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.
अन्य प्रमुख मान्यवरांत ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार विजय सरदेसाई, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, महाराष्ट्र विधानसभा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश नाईक, देवस्थान समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज सरदेसाई, नार्वेचे सरपंच सिद्धेश पार्सेकर यांचा समावेश होता.
स्वागत गीत आणि नांदी सादरीकरण झाल्यानंतर छत्रपती शिवरायांवर आधारित आरती झाली. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गोविंद भगत आणि सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. या सोहळ्यानंतर इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच संस्कृती टिकली
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापकच नाहीत, तर ते प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आमचा धर्म आणि संस्कृती आज टिकून आहे, असे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी नार्वे गावात पर्यटनाला चांगले दिवस येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मंदिरांत अक्षय्य ऊर्जा
मंदिरे ही केवळ कार्यक्रमांपुरती मर्यादित नाहीत, तर मंदिरांतून अक्षय्य ऊर्जा मिळते. ती संस्कृतीची केंद्रे असतात, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोव्याला लाभलेले संयमी, तरुण आणि आशादायी नेतृत्व आहे, असेही भोसले यांनी सांगितले.
तळीचाही जीर्णोद्धार
छत्रपती शिवरायांमुळेच गोव्यातील संस्कृती टिकून राहिली. शिवरायांचे गोव्यासाठीचे महान योगदान कोणीही विसरू शकणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद करून, छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आजच्या पिढीने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सावंत यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या मंदिरासमोरील पवित्र तळीचेही लोकार्पण करण्यात आले.
सरदारांच्या वंशजांचा सत्कार
या सोहळ्यात शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह छत्रपती शिवरायांच्या सरदारांच्या वंशजांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यात नितीन मालुसरे, रघोजीराजे आंग्रे, दिग्विजय जेधे, रवींद्र कंक, श्रीनिवास इंदलकर, शिरीषराव चिटणीस, मारुती गोळे, अनिल शेलार, पांडुरंग बलकवडे, राजेंद्र पासलकर, सुभाष मंत्री, शैलेश वरकडे, नंदन शेणवी केरकर, सुरेश वाळवे, गौरीश लाड, विठ्ठल सुखठणकर, दीपाजी राणे सरदेसाई आणि पृथ्वीराज सरदेसाई यांचा समावेश होता.
पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराची पुनर्बांधणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. गोमंतकीय सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवित करणे आणि गोव्याचा खरा इतिहास प्रकाशात आणण्याचा हा महत्त्वाचा निर्णय असून ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. - सिध्देश श्रीपाद नाईक, जि. पं. अध्यक्ष.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.